

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचा निष्कर्ष काय निघेल, याबद्दल आताच काहीही सांगणे घाईचे ठरेल. मात्र, या यात्रेमुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये थोड्याबहुत प्रमाणात चैतन्य निर्माण झाले आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. राष्ट्रीय राजकारणातले काँग्रेस पक्षाचे महत्त्व अलीकडील काळात अतिशय झपाट्याने कमी झाले आहे. आता तर तृणमूल काँग्रेस, तेलंगणा राष्ट्र समिती सारखे प्रादेशिक पक्ष काँग्रेसवर डोळे वटारत आहेत. ही केविलवाणी स्थिती बदलविण्याचा आटोकाट प्रयत्न राहुल गांधी करीत आहेत. 'भारत जोडो'च्या माध्यमातून एकाचवेळी अनेक उद्दिष्टे साध्य करू, असा राहुल गांधी यांचा विश्वास आहे.
मागील आठ वर्षांत आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी काँग्रेस पक्षाने 'भारत जोडो' यात्रेला सुरुवात केली आहे. कन्याकुमारीहून सुरुवात झालेल्या या यात्रेला आता अकरा दिवस पूर्ण झाले आहेत. 'भारत जोडो' यात्रेतून काँग्रेसला कोणताही लाभ होणार नाही, असे मानणारा एक वर्ग आहे, तर यात्रेमुळे पक्ष कात टाकून नव्या जोमाने उभी राहील, असे मानणारादेखील एक वर्ग आहे. तूर्तास यात्रेचा निष्कर्ष काय निघेल, याबद्दल काहीही सांगता येणे कठीण आहे. मात्र, या यात्रेमुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये थोड्याबहुत प्रमाणात चैतन्य निर्माण झाले आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल.
काँग्रेसचा मुकाबला केवळ भाजपशी नाही, तर तृणमूल, टीआरएस, आम आदमी पार्टीसारख्या अनेक प्रादेशिक पक्षांशीदेखील आहे. देशव्यापी यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणाची समीकरणे बदलविण्याचे यशस्वी प्रयोग याआधी झालेले आहेत. कदाचित त्यापासून प्रेरणा घेत राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत दीडशे दिवसांच्या यात्रेचे नियोजन केले असल्याचे म्हणण्यास वाव आहे.
काँग्रेसमधील परिवारवादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने घाव घालत आहेत. काँग्रेसची वाढ खुंटण्यात परिवारवाद बर्यापैकी कारणीभूत आहे. अशा स्थितीत 'भारत जोडो' यात्रेनंतरही काँग्रेसचे नेतृत्व पुन्हा गांधी कुटुंबातील सदस्याकडेच राहणार असेल तर काँग्रेसला या यात्रेचा फारसा फायदा होण्याची शक्यता नाही.
'भारत जोडो'द्वारे माजी पंतप्रधान पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा वारसा लोकांना सांगितला जात आहे. तथापि, हा वारसा बदलत्या राजकीय परिप्रेक्ष्यात लोकांच्या कितपत गळी उतरणार, हा प्रश्न आहे. एकीकडे 'भारत जोडो' यात्रा सुरू असताना दुसरीकडे गोवा राज्यात काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला. पक्षाचे बहुसंख्य आमदार भाजपला जाऊन मिळाले. गुलाम नबी आझाद यांनी सोडचिठ्ठी देऊन काही दिवसही होत नाही, तोच काँग्रेसला बसलेला हा दुसरा जबर दणका आहे. काँग्रेस आणि त्याच्या नेतृत्वापासून मोहभंग झाल्याचे सांगत प्रमुख नेते पक्षाचा त्याग करीत आहेत. 'भारत जोडो' यात्रेमुळे या स्थितीत बदल होणार काय, हेही पाहण्यासारखे ठरेल.
कधीकाळी अंतर्गत संवाद हा काँग्रेसचा आत्मा होता. पण, मागील काही वर्षांत महत्त्वाच्या विषयांवर पक्षात गंभीरतेने चर्चा झाल्याचे पाहावयास मिळालेले नाही. निवडणुकांतील पराभवानंतर आत्ममंथन करण्यासाठी बोलाविल्या जाणार्या बैठका वगळता कधी इतर विषयांवर पक्षात व्यापक विचारविनिमय झाल्याचे दिसून आलेले नाही. गुलाम नबी आझाद यांनी पक्षत्याग करताना या गोष्टीकडे प्रकर्षाने लक्ष वेधले होते. 'भारत जोडो'पेक्षा 'काँग्रेस जोडो'ची आज नितांत गरज आहे. नाराज काँग्रेसी नेत्यांची समजूत काढून त्यांना प्रवाहात सामावून घेण्याचे आव्हान पक्षासमोर आहे; पण या दिशेनेही काही विशेष होताना दिसून येत नाही. भाजपविरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न म्हणून या यात्रेकडे पाहायचे म्हटले, तर तसेही काही स्पष्ट होत नाही. उलट काँग्रेस आणि विविध विरोधी पक्षांतील दरी दिवसेंदिवस जास्तच वाढत आहे.
एकीकडे काँग्रेसचे नेतृत्व 'भारत जोडो' यात्रेत व्यग्र असताना दुसरीकडे भाजपच्या 'ऑपरेशन कमळ'ला वेग आला आहे. गोवा राज्यात काँग्रेसला भगदाड पाडल्यानंतर भाजपची नजर झारखंडसहित इतर काही राज्यांवर आहे. सद्यस्थितीत भाजप मजबूत स्थितीत असला, तरी आम आदमी पक्षाने मात्र काही ठिकाणी भाजपची झोप उडविलेली आहे. दिल्ली, पंजाबपाठोपाठ गुजरातमध्ये प्रस्थापितांना आस्मान दाखविण्याचा चंग दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बांधला आहे. गुजरातमध्ये काँग्रेस सुस्थितीत नसल्याचा थेट फायदा आम आदमी पक्षाला होऊ शकतो. केजरीवाल यांचा प्रयोग गुजरातमध्ये यशस्वी झाल्यास भाजपसाठी ती मोठी धोक्याची घंटा ठरेल. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या राज्यातच जर 'आप'ने बस्तान बसविले, तर देशाच्या इतर भागांत केजरीवाल यांना आपल्या पक्षाचा विस्तार करण्यात फारसे अडथळे येणार नाहीत, हे वास्तव आहे. गुजरात आणि हिमाचलमधील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आम आदमी पक्षाला दिल्लीत मात्र सध्या असंख्य अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
अबकारी कर घोटाळ्यात अडकलेल्या उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या ठिकाणांवर ईडी आणि सीबीआयने छापे टाकले आहेत. तिकडे बिनखात्याचे मंत्री सत्येंद्र जैन हे हवाला प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत, तर आ. अमानतुल्ला खान यांना वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अलीकडेच अटक केली आहे. केजरीवाल यांचे सुरुवातीचे अनेक साथीदार त्यांच्यापासून विभक्त झालेले आहेत. अशा स्थितीत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना अटक झाली, तर तो केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो. 'आप'च्या राष्ट्रीय विस्ताराच्या त्यांच्या प्रयत्नांना यामुळे खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या शिफारशीनुसार अबकारी कर घोटाळ्याचा सीबीआय तपास करीत आहे. मद्य कंपन्या आणि विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात फायदा पोहोचविल्याचा आरोप मनिष सिसोदिया यांच्यावर झालेला आहे. हे प्रकरण भविष्यात आम आदमी पक्षासाठी 'गले की हड्डी'सारखे बनले, तर नवल वाटायचे काही कारण नाही.