पशुधनावरील संकट | पुढारी

पशुधनावरील संकट

कोरोनाचे संकट मागे पडून जनजीवन सुरळीत सुरू झाले असतानाच गायी-म्हशींना होणार्‍या लम्पी त्वचारोगामुळे शेतकर्‍यांच्या पशुधनावर नवेच संकट आले आहे. हा रोग जनावरांना होणारा असला, तरी जनावरे हा शेतीशी संबंधित महत्त्वाचा घटक आणि याच जनावरांपासून मिळणारे दूध प्रत्येकाची गरज असल्यामुळे त्याचे गांभीर्य वाढले. लम्पी रोगाच्या धास्तीमुळे दैनंदिन दूध वापराबाबतही लोकांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत. परंतु, दूध उकळून पिल्यास कोणताही धोका नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. गेले काही आठवडे राजस्थान, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये लम्पीचा प्रकोप सुरू असताना त्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, हा रोग महाराष्ट्रातही आल्यामुळे चिंता वाढली. लोकांच्या मनातील भीती हा एक भाग आहे आणि या रोगामध्ये जनावरे बळी पडत असल्यामुळे शेतकर्‍यांचे होणारे नुकसान हा दुसरा भाग.

दोन्ही बाबी महत्त्वाच्या असून त्यासंदर्भात वेळीच योग्य ती पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जनावरांशी संबंधित गंभीर आजार आल्यानंतर राज्यात पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या शेकडो जागा रिक्त असल्याचे वास्तव समोर आले. सरकारने त्यासंदर्भात पावले उचलण्याचे आश्वासन दिले; मात्र हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्यासारखा आहे. ज्यांची जनावरे या आजारामुळे मृत्यू पावली, त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषांनुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ‘लम्पी’च्या नियंत्रणासाठी आवश्यक लस, औषधी, साधनसामग्री आदी बाबींवरील खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी एक कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेशही देण्यात आला. देशाच्या बहुतांश भागांत चिंतेचे कारण बनलेला हा आजार नीटपणे समजून घेण्याची आवश्यकताही यानिमित्ताने निर्माण झाली आहे. कारण, अनेकदा अज्ञानातून गैरसमज पसरवले जातात आणि त्यामुळे लोकांच्या मनात अनावश्यक भीती निर्माण होते. लम्पी त्वचारोग हा गायी-म्हशींना होणारा देवीसद़ृश विषाणूजन्य आजार.

आजारात जनावरांच्या त्वचा आणि इतर भागांवर गाठी येतात. कॅप्रीपॉक्स या देवीवर्गीय विषाणूमुळे हा आजार होतो. सूर्यप्रकाशामध्ये हा विषाणू निष्क्रिय होतो; मात्र ढगाळ वातावरणामध्ये अंधार्‍या ठिकाणी आणि बाधित गोठ्यात काही महिने विषाणू सक्रिय राहतो. संकरित जनावरे आणि वासरांमध्ये आजाराची तीव्रता आणि मृत्यू दर अधिक असल्याचे आढळून आले. तुलनेने देशी जनावरांमध्ये या आजाराची तीव्रता आणि मृत्यू दर कमी आहे. या रोगामुळे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते, तसेच गुरांच्या प्रजननात अडथळे येत असल्याचे तज्ज्ञांना आढळून आले.

भारतात लम्पी त्वचारोगाच्या विषाणूचा प्रादुर्भाव 2019 मध्ये पश्चिम बंगालमध्ये आढळून आला. त्यानंतर दोन वर्षांमध्ये तो तब्बल पंधरा राज्यांमध्ये पसरला. हा रोग 1929 मध्ये आफ्रिकेत आढळून आला. गेल्या काही वर्षांत जगभरातल्या विविध देशांत त्याचा प्रादुर्भाव आढळून आला. 2015 मध्ये तुर्की आणि ग्रीसमध्ये, तर 2016 ला रशियामध्ये या रोगाने हाहाकार उडवला. जुलै 2019 मध्ये तो बांगला देशात घुसला आणि तिथूनच तो पश्चिम बंगालमार्गे भारतात पसरला. आपल्याकडे प्राण्यांशी संबंधित कोणताही नवा आजार आला की, त्याच्यासंदर्भात गैरसमज पसरवले जातात. कोंबड्यांशी संबंधित असे आजार अधुनमधून येत असतात आणि त्याचा एकूण अंडी आणि चिकनच्या व्यवहारांवर मोठा परिणाम होतो. व्यावसायिकांचे मोठे नुकसान होते, शिवाय अर्थकारणावरही मोठा परिणाम होतो. रोगाची बाधा झालेल्या जिवंत कोंबड्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्न पुन्हा वेगळाच असतो.

आताही लम्पी रोगामुळे दुधाच्या संदर्भाने भीती निर्माण केली जाते. गायीच्या दुधापासून वासराला बाधा होऊ शकते; परंतु माणसांना यापासून धोका नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून दूध उकळूनच पिण्यासंदर्भातील आवाहनही करण्यात आले. वाहतुकीमुळे या आजारास कारणीभूत विषाणू लांब अंतरापर्यंत संक्रमित होऊ शकतात. विषाणू बाधित जनावरांच्या रक्तात किमान पाच दिवस ते दोन आठवड्यांपर्यंत राहतात. अशा जनावरांचे रक्त शोषण करणार्‍या कीटकांमार्फतही रोगप्रसार होतो. जनावराच्या विषाणूने प्रदूषित शारीरिक स्त्रावाचा प्रादुर्भाव वैरण आणि पाण्यात झाल्यास त्यावाटेही रोगप्रसार होऊ शकतो. अशा काही प्राथमिक गोष्टी लक्षात घेऊन सर्व संबंधितांनी काळजी घेण्याचे आवाहन सरकारने तसेच पशुवैद्यक तज्ज्ञांनी केले आहे.

देशातील मोठी लोकसंख्या पशुपालनाच्या व्यवसायात असल्यामुळे तेवढ्या लोकांना या रोगाचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेतीला जोडधंदा म्हणून गुरे पाळणार्‍या लोकांचे जगणेच या रोगामुळे धोक्यात आले असून त्यांना आधार देण्यासाठी सरकारांनी सकारात्मक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात साथीचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचा उपाय योजण्यात आला होता. जनावरांमधील या रोगाचा प्रसार रोखण्यासाठीही त्यासारखीच काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून लांब ठेवण्याची आवश्यकता आहे.

डास-कीटक आदींद्वारे प्रसार होत असल्यामुळे गोठ्यांमध्ये त्यांच्या नियंत्रणासाठीच्या प्रभावी उपाययोजनांची गरज आहे. जनावरांची खरेदी-विक्री सातत्याने सुरू असते आणि एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जनावरे नेली जात असतात, त्यामुळेही रोगाचा प्रसार होत असतो. त्यासंदर्भातही योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. रोगावरील लस तयार झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात त्याची तीव—ता कमी होऊ शकेल. या बिकट स्थितीत पशुधन वाचवण्याचे आव्हान आहे. शेतकर्‍यासमोर आणखी एक संकट उभे ठाकले आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या उपाययोजनांना प्राधान्य दिलेच पाहिजे.

Back to top button