सच्चा मित्र हरपला | पुढारी

सच्चा मित्र हरपला

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे यांच्या हत्येमुळे संपूर्ण जग हादरले. त्यांच्या जाण्याने भारताने एक सच्चा मित्र गमावला. परंपरेची कास न सोडता जपानला आधुनिकीकरणाच्या मार्गाने घेऊन जाणारे पंतप्रधान म्हणून शिंजो अ‍ॅबे यांची जागतिक पटलावर ओळख होती. त्याचमुळे जपानसारख्या देशाच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा बहुमान त्यांना मिळाला. 2006 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर वर्षभर ते त्या पदावर होते. या काळात भारत दौर्‍यावर आले असताना केलेल्या भाषणातील ‘दोन समुद्रांच्या संगमा’ची त्यांचीकल्पना खूप गाजली. नंतरच्या काळात ही संकल्पनाच भारत-जपान संबंधाचा प्रमुख आधार बनली. 2012 मध्ये सत्तेवर आल्यानंतर राजीनामा देईपर्यंत म्हणजे सुमारे आठ वर्षे सलग ते पंतप्रधानपदावर राहिले. प्रकृतीच्या कारणास्तव ऑगस्ट 2020 मध्ये राजीनामा देऊन ते पदावरून दूर झाले. आजारपणामुळे आपल्या निर्णयक्षमतेवर परिणाम झालेला असता पदावर राहणे इष्ट नसल्याचे कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला होता आणि कार्यकाळ पूर्ण न करू शकल्याबद्दल देशवासीयांची माफीही मागितली होती. ‘अल्सरेटिव्ह कोलाइटिस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या आजाराने शिंजो त्रस्त होते. त्यामध्ये मोठ्या आतड्याला सूज येते आणि पचनतंत्रावर परिणाम होतो. आजारपणाचा देशाच्या विकासावर परिणाम होऊ नये म्हणून पंतप्रधानांनी राजीनामा देण्याचे जागतिक राजकारणातले हे दुर्मीळ उदाहरण होते आणि शिंजो यांनी ते घालून दिले होते. जपानची जागतिक पातळीवरची प्रतिमा उंचावण्यासाठी, तसेच जागतिक पातळीवर सौहार्द निर्माण करण्यासाठी झटणारा नेता म्हणून ते जगाच्या स्मरणात राहतील. देशात आणि जगातही सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणार्‍या नेत्याच्या हत्येची घटना सगळ्यांनाच चक्रावून टाकणारी आहे. माजी पंतप्रधान असले, तरी त्यांच्यासाठी मोजकेच सुरक्षारक्षक तैनात होते, याचे कारणही जपानच्या संस्कृतीमध्ये आहे. तिथे अशा घटना फारशा घडत नाहीत. एखाद्या राजकीय नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्याची घटना तर जपानमध्ये पन्‍नास वर्षांनंतर घडली. बंदूक किंवा तत्सम हत्यारांच्या परवान्यासंदर्भातही जपानमध्ये कठोर नियम आहेत. शिंजो यांच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार हल्लेखोराने स्वतः बनवलेले म्हणजे आपल्याकडील अनधिकृत कट्टे असतात तशा स्वरूपाचे होते. हत्येमागचे नेमके कारण समोर आले नसले, तरी हल्लेखोर तरुणाच्या प्राथमिक जबाबानुसार तो शिंजो अ‍ॅबे यांच्यावर नाराज होता. एखाद्या तरुणाने माजी पंतप्रधानांवर नाराज असणे म्हणजे नेमके काय, हे कळण्यापलीकडचे आहे. कारण, कोणत्याही राज्यकर्त्याला समाजातील सगळ्या घटकांचे समाधान कधीच करता येत नाही. त्यांच्या निर्णयाबद्दल अनेक लोक नाराज असू शकतात, याचा अर्थ संबंधितांना संपवण्याचे कारण नाही.

जागतिक पातळीवर असहिष्णुता कमालीची वाढू लागली आहे. आपल्यापेक्षा वेगळे मत असलेले लोकही असू शकतात आणि त्यांचे म्हणणे मांडण्याचा त्यांना अधिकार आहे, हीच गोष्ट मान्य केली जात नाही. त्यातून अशा घटना घडतात. जगभरात वाढू लागलेल्या या असहिष्णुतेचा शिरकाव जपानसारख्या शांतताप्रिय देशात झाला, ही यातील दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. पुराणमतवादी पिढीचे प्रतिनिधी अशी शिंजो यांची ओळख. परंतु, त्यांचे परराष्ट्र धोरण जपानला प्रगतीच्या नव्या मार्गावर नेणारे होते. त्यांनी जागतिक पातळीवर जपानची प्रतिमा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अ‍ॅबे यांच्यामुळेच जपान हा जगातील तिसर्‍या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून उभा राहू शकला. जागतिक पातळीवर त्यांनी अमेरिकेसोबतचे संबंध अधिक द‍ृढ बनवले. लोकशाही आणि भांडवलशाही अशा दोन्ही राष्ट्रांशी असलेले संबंध बळकट करताना त्यांनी जपानला नव्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. व्यावहारिक द‍ृष्टिकोनातूनच त्यांनी आपली धोरणे पुढे नेली. 2012 मध्ये सत्तेवर आल्यानंतर त्यांनी सहा निवडणुका जिंकल्या. त्यातील तीन खालच्या सभागृहाच्या आणि तीन वरच्या सभागृहाच्या होत्या. 2013 मध्ये जपानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना त्यांनी केली. 2014 मध्ये त्यांनी गोपनीयतेसंदर्भातील नवा कायदा केला आणि जपानच्या आत्मरक्षा दलांना सामूहिक सुरक्षा मोहिमांमध्ये भाग घेण्यास परवानगी दिली. अ‍ॅबे यांच्या काळात जपानच्या संरक्षण खर्चात वार्षिक 13 टक्क्यांनी वाढ झाली. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांनी घनिष्ठ संबंध निर्माण केले होते. जपानने संरक्षणावरचा खर्च वाढवण्यासाठी असलेला दबाव झुगारण्यात त्यांनी मुत्सद्देगिरीने यश मिळवले आणि सोबतच अमेरिकेसोबतच्या व्यापारी संबंधांवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. परराष्ट्र धोरणामधून त्यांनी वेळोवेळी मुत्सद्देगिरीचे दर्शन घडवले. अ‍ॅबे यांचे भारताशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. 2006-2007 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्या काळात त्यांनी भारताचा दौरा करून संसदेत भाषण केले होते. 2012 नंतरच्या दुसर्‍या कार्यकाळात त्यांनी तीन वेळा भारताला भेट देऊन आपल्या भारताप्रतीच्या प्रेमाचे दर्शन घडवले. भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्पाला केलेले सहकार्य आणि वाराणसीच्या घाटावर त्यांनी केलेली गंगा आरती यामुळेही भारतीयांच्या मनात त्यांनी विशेष स्थान निर्माण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांचे विशेष मित्रत्वाचे संबंध होते. अ‍ॅबे यांच्या काळात भारत-जपान यांच्यातील संबंध एका वेगळ्या उंचीवर पोहोचले. 2014 मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे बनणारे ते पहिले जपानी पंतप्रधान होते. मे 2014 मध्ये निवडणुकीला सामोरे जाणार्‍या सरकारकडे या दौर्‍याचे यजमानपद होते. त्याअर्थाने विचार केला, तर यूपीए आणि एनडीए या दोन्ही सरकारांच्या काळात भारताने त्यांचा सन्मान केला. भारताशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध ठेवल्याबद्दल 2021 मध्ये त्यांना पद्मविभूषण या दुसर्‍या क्रमांकाच्या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूचे भारतवासीयांना मोठे दु:ख झाले ते खुल्या दिलाचा खंबीर सहकारी गमावल्याचे!

Back to top button