अजातशत्रूच्या हत्येचे गूढ | पुढारी

अजातशत्रूच्या हत्येचे गूढ

जपानच्या इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे व्यक्‍ती म्हणून शिंजो अ‍ॅबे यांची नोंद आहे. जपानच्या लष्करी आधुनिकीकरणाचा पाया अ‍ॅबे यांनी घातला. ‘क्‍वाड’ गटाची संकल्पनाही त्यांनीच मांडली होती. या सर्वांमुळे चीनच्या डोळ्यांत ते सतत खुपत राहिले. त्यामुळेच या हत्येमागे चीनचा हात असण्याची शक्यता व्यक्‍त होऊ लागली आहे.

जपानची ओळख संपूर्ण जगाला शांतताप्रिय देश म्हणून आहे. जपानची राज्यघटनाच मुळी शांततेचा पुरस्कार करणारी आहे. अशा देशामधले अजातशत्रू म्हणून ओळखला जाणारे नेते म्हणून शिंजो अ‍ॅबे यांच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. जपानच्या संपूर्ण इतिहासात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे व्यक्‍ती म्हणून त्यांची नोंद आहे. एकविसाव्या शतकामध्ये जपानच्या लष्करी आधुनिकीकरणाचा पाया शिंजो अ‍ॅबे यांनी घातला. अशा व्यक्‍तीची भरसभेमध्ये गोळी घालून हत्या केली जाते, ही बाब अत्यंत शोकदायक आणि तितकीच चिंताजनक आहे. जपानच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आले असता त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अ‍ॅबे यांचे व्यक्‍तिमत्त्व सर्वसमावेशक असल्यामुळे जपानमध्ये त्यांचे राजकीय शत्रूही नाहीत. 2020 मध्ये ते पंतप्रधानपदावरून पायउतार झाले तेव्हाही त्यांच्यावर कोणताही दबाव नव्हता वा त्यांची हकालपट्टीही केली नव्हती. आरोग्याच्या कारणांमुळे त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतला होता. दुसर्‍या महायुद्धानंतर जपानमध्ये लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी सातत्याने सत्तेत राहिली आहे. शिंजो अ‍ॅबे हे या पक्षाचे अत्यंत वरिष्ठ नेते होते आणि त्यांचा पक्षामध्येही प्रचंड दबदबा होता. राजकीय जीवनातही त्यांचा कोणी कट्टर वैरी असल्याचे कधी समोर आले नाही. असे असताना त्यांची हत्या झाल्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

जपान हा दुसर्‍या महायुद्धामध्ये पूर्णतः बेचिराख झालेला देश. असे असूनही एकविसाव्या शतकामध्ये जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंत जपानने मजल मारली. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे दुसर्‍या महायुद्धादरम्यान जपानमध्ये लष्करी राजवट होती. त्या लष्करी राजवटीने जर्मनी व इटलीची साथ दिली होती आणि अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्सच्या विरुद्ध युद्ध केले होते. त्यामुळे जपानचे संपूर्ण निःशस्त्रीकरण करण्याची जबाबदारी अमेरिकेवर सोपवली होती. त्यासाठी जपानमध्ये अमेरिकन सैन्य मोठ्या प्रमाणावर होते. अमेरिकेच्याच नेतृत्वाखाली जपानचा आर्थिक विकास झाला. जपानची जी ‘पीस कॉन्स्टिट्युशन’ आहे, जिला शांततेची राज्यघटना म्हणतात ती अमेरिकेच्याच नेतृत्वाखाली आणि अमेरिकेच्याच व्यक्‍तींनी तयार केली होती. या राज्यघटनेमध्ये कलम 9 मध्ये भविष्यात जपानकडे सैन्य नसेल, अण्वस्त्रे नसतील, जपान कधीही इतर देशांना लष्करी मदत करणार नाही अशा काही अटी होत्या. त्यानंतर जपान हा शांतताप्रिय देश म्हणून पुढे आला. संरक्षणावर कोणताही खर्च नसल्यामुळे जपानने प्रचंड वेगाने आपला आर्थिक विकास घडवून आणला.

जपानमध्ये कधीही कोणाही राजकीय नेत्याची हत्या झालेली नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जपानमध्ये असणारे गन लॉ किंवा बंदुकीचे कायदे अत्यंत कडक आहेत. 2021 मध्ये जपानमध्ये केवळ 5 लोक बंदुकीच्या हत्यांमध्ये मरण पावल्याची नोंद आढळते. कारण, तेथे बंदुकीचे परवाने मिळणे हेच खूप मुश्कील आहे.

अ‍ॅबे यांचे कोणाशीही वैमनस्य नसल्यामुळे या हत्येमागे एखादा आंतरराष्ट्रीय कट असण्याची शक्यता व्यक्‍त होऊ लागली आहे. त्यामागे काही कारणेही आहेत. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर रशियावर अत्यंत अपमानास्पद परिस्थिती उद्भवली होती. त्यातून रशियाला बाहेर काढण्यासाठी पुतीन अत्यंत खंबीरपणाने उभे राहिलेे. रशियाच्या पुनरुज्जीवनाचे जनक म्हणून पुतीन यांच्याकडे पाहिले जाते. रशियाचे लष्करी आधुनिकीकरण घडवून आणणे, रशियाला गतवैभव प्राप्त करून देणे यासाठी पुतीन यांनी प्रचंड सायास केले. तशाच प्रकारे शिंजो अ‍ॅबे यांनी संपूर्ण आयुष्य जपानसाठी खर्ची घातले. जपानमध्ये लष्करी आधुनिकीकरणाचा पाया शिंजो अ‍ॅबेंनी घातला. जपानकडेही अण्वस्त्रे असली पाहिजेत, अशी सर्वप्रथम मागणी अ‍ॅबे यांनी केली. याचे कारण चीन आणि जपान यांच्यात सेनकाकू बेटावरून युद्ध परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. आशिया-प्रशांत क्षेत्रातील चीनच्या आक्रमक विस्तारवादाचे मनसुबे सर्वांत प्रथम अ‍ॅबे यांनी ओळखले. या आक्रमकतेला रोखण्याची मागणी त्यांनी जागतिक समुदायापुढे मांडली. त्यामुळे शिंजो अ‍ॅबे हे चीनच्या डोळ्यांत नेहमीच खुपत राहिले. अ‍ॅबे यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात जपान आणि चीन यांच्यातील संंबंध अतिशय तणावपूर्ण बनले होते. जपानच्या लष्करी आधुनिकीकरणाबाबत चीनची नेहमीच करडी नजर राहिली. जपान हा अमेरिकेचा मित्र देश आहे. दक्षिण कोरियाबरोबरही जपानचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. उत्तर कोरिया हा चीनचा मित्र देश. त्यामुळे लष्करीद‍ृष्ट्या सक्षम असलेला जपान दक्षिण कोरियाच्या मागे उभा राहिला, तर तो अर्थातच उत्तर कोरियासाठी व पर्यायाने चीनसाठी धोका आहे. या पार्श्‍वभूमीवर अ‍ॅबे यांना संपवण्याचा कट चीन पुरस्कृत एखाद्या गटाने केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चीनच्या वाढत्या विस्तारवादाला आणि आक्रमकतेला वेसण घालण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या चार देशांचा सहभाग असणारी जी क्‍वाड नामक संघटना उदयाला आली तिची पायाभरणी शिंजो अ‍ॅबे यांनी केली होती. 2007 मध्ये त्यांनीच या संघटनेची संकल्पना प्रथम मांडली. आज क्‍वाडच्या पुनरुज्जीवनामुळे आणि तिच्या वाढत्या बैठकांमुळे चीन अस्वस्थ आहे. अ‍ॅबे यांच्या कार्यकाळातच जपानने पहिल्यांदाच भारताबरोबर अणू सहकार्य करार केला. अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या देशाबरोबर जपानने पहिल्यांदाच असा करार केला. जपानी नागरिकांचा विरोध असूनही अ‍ॅबे यांनी हे पाऊल उचलले. त्यामुळे अ‍ॅबे हे चीनच्या द‍ृष्टीने खलनायकच होते. म्हणूनच या हत्येमागे चीनचा हात असण्याच्या शक्यता धुडकावून लावता येणार नाहीत. अ‍ॅबे यांच्या हत्येनंतर चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ने व्यक्‍त केलेली प्रतिक्रियाही महत्त्वाची आहे. अ‍ॅबे यांच्या हत्येचा फायदा घेत त्यांचे उत्तराधिकारी आशियामध्ये ‘नाटो’च्या प्रवेशाला बळकटी देऊ शकतात, असे यामध्ये म्हटले आहे. अर्थात, या हल्ल्याबाबतची जबाबदारी अद्यापपर्यंत तरी कोणीही स्वीकारलेली नाही. परंतु, लवकरात लवकर या हत्येमागचे सत्य समोर आले पाहिजे.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक

Back to top button