उतरणीला लागलेली शिवसेना खरेच संपेल? | पुढारी

उतरणीला लागलेली शिवसेना खरेच संपेल?

शिवसेनेचे 40 आमदार मूळ शिवसेनेतून बाहेर पडले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेकडे आता विधिमंडळात संख्याबळ आहे ते 16 आमदारांचे! शिवसेनेसाठी विशेषतः पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासाठी ही प्रचंड धक्‍कादायक घटना. नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण आणि आपले सहकारी आमदार शिवसेनेतच आहोत, असे सांगत शिवसेनेवरच दावा केला. या सर्व प्रकाराने शिवसेनेसारखी कडवट लढाऊ सैनिकांची संघटना मुळापासून हादरली. आता शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उभे केले जात आहे. शिवसेना संपली, आता ती उभी राहणे कठीण आहे, असाच सूर समाजमाध्यमांवरून व्यक्‍त होतोय. खरेच असे होईल काय?
शिवसेनेतून आजवर अनेक नेते बाहेर पडले.

छगन भुजबळ, गणेश नाईक आणि नारायण राणे यांच्यासारखे बाळासाहेबांचे खंदे शिलेदार सोडून गेले. राज ठाकरे बाहेर पडणे, हा तर शिवसेनेला बसलेला सर्वात मोठा धक्‍का होता; मात्र यावेळच्या बंडात आणि आधीच्या नेत्यांनी पक्ष सोडणे यात महत्त्वाचा फरक असा की, आधीची बंडखोरी बाळासाहेबांच्या हयातीत झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून शिवसेनेचा पसारा बर्‍यापैकी सांभाळला, वाढवला. राज्यातला महत्त्वाचा पक्ष म्हणून शिवसेनेचे स्थान अबाधित राहिले. सत्तेत सहभाग मिळवताना आघाडी सरकारचे मुख्यमंत्रिपदही शिवसेनेकडे, स्वतःकडे घेण्याची किमया उद्धव यांनी साधली.

शिंदे यांच्या बंडाने शिवसेना नावाचा पन्‍नास-पंचावन्‍न वर्षांचा ब्रँड महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावरून नष्ट होईल, असे होणार नाही. एक मात्र खरे की, या सर्वात मोठ्या बंडामुळे शिवसेनेला उतरती कळा लागू शकते. यापुढे आपण शिवसेनेला पुन्हा उभारी मिळवून देऊ, या उद्धव यांच्या वक्‍तव्यामुळे सध्या तरी शिवसेना उतरणीला लागल्याचे त्यांनीच मान्य केल्याचे स्पष्ट होते. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षावर ताबा मिळवला असला, तरी त्याबाहेरच्या पक्षावर ते प्रभुत्व मिळवतील का, हे आगामी काळात दिसेल. जिल्ह्याजिल्ह्यातले स्थानिक नेते उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहिले, तर मात्र शिंदे यांना शिवसेनेवर ताबा मिळवणे शक्य होणार नाही. मग, शिवसेनेचे होणार तरी काय, असा प्रश्‍न विचारला जात असला, तरी त्याचे उत्तर असे की, राज ठाकरे यांच्या जाण्यानेही जी संघटना कोलमडली नाही, ती आता लगेच संपेल असे नाही. एक खरे की, आघाडी टिकणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो आणि त्याचबरोबर राज्यात आज शिवसेनेचे जे महत्त्वाचे स्थान होते, तेवढे महत्त्व यापुढे उद्धव यांच्या किवा शिंदे यांच्या शिवसेनेला प्राप्त होणार नाही.

संबंधित बातम्या

उद्धव यांच्या नेतृत्वगुणाबद्दल अनेक शंका घेतल्या गेल्या आणि यापुढेही घेतल्या जातील. त्याला अनेक कारणे आहेत. एक तर ज्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्याला आपल्याच पक्षाचे आमदार इतक्या मोठ्या संख्येने नाराज होते आणि ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, हे समजले नाही, हे अविश्‍वसनीय आहे. भले या आमदारांना आमिषे वा भीती दाखवून फोडले, असा दावा शिवसेनेकडून केला जात असला, तरी यात उद्धव यांच्या अपयशाबरोबरच त्यांनीच निवडलेल्या त्यांच्या निकटवर्तीयांचेही अपयश यामागे आहेच.

शिवसेना हा व्यक्‍तीनिष्ठा मानणार्‍यांचा पक्ष असल्याने ठाकरे या नावावर श्रद्धा, निष्ठा सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे. किंबहुना तीच शिवसेनेची ताकद मानली जाते. बाळासाहेब ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच ते प्रसंगी नेत्यांनाही बाजूला सारून थेट शिवसैनिकांशी संवाद साधत. संघटनेवर त्यांची पूर्ण पकड होती. हुकूमत होती. म्हणूनच भुजबळ असो वा राणेंसारखे नेते बाहेर पडल्यावरही बाळासाहेबांनी याच सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जोरावर शिवसेना चालवली. 1995 मध्ये युतीचे सरकार आले तेव्हा बाळासाहेबांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह भाजपच्या प्रमोद महाजन आदी नेत्यांनी धरला होता. मात्र, त्यांनी तो ठामपणे नाकारत ‘रिमोट कंट्रोल’ स्वतःच्या हाती ठेवणेच पसंत केले.

बाळासाहेबांनी जी चूक करणे साफ टाळले होते, तीच नेमकी उद्धव यांनी केली. सत्तेचा रिमोट ‘मातोश्री’वर ठेवून सरकार चालवणे हे योग्य झाले असते. उद्धव हे रिमोट न होता, स्वतःच टीव्ही झाले आणि रिमोट कंट्रोल गेला शरद पवार यांच्या हाती! ‘मातोश्री’चे जे स्थान होते, ते ‘सिल्व्हर ओक’ला प्राप्त झाले. पवार यांचे हे स्थान इतके बळकट होते की, अधिकारी ब्रिफिंगसाठी ‘सिल्व्हर ओक’वर जात होते, असे म्हणतात. आज शिंदे गटात सामील झालेले सर्वच आमदार पवार आणि राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा घाट घातला होता, असा आरोप करत आहेत. त्यात तथ्य आहे, असे म्हणावे लागेल. याचे कारण असे की, शिवसेनेचे आमदार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात लढूनच निवडून आले आहेत. त्यामुळेच केवळ सत्तेसाठी याच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला, तेव्हाच शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता होती.

पवार हे शिवसेना संपवत आहेत, राष्ट्रवादी ही शिवसेनेच्या घराला वाळवीसारखी पोखरत आहे, असा आरोप शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी केला. त्यात तथ्य आहे, असे पवार यांचा राजकीय इतिहास पाहिला, तर लक्षात येईल. महाराष्ट्रातले शेकाप, जनता दल यासारखे छोटे पक्ष व काँग्रेस पक्ष त्यांनी साथीला घेऊन संपवले, तसेच शिवसेनेचे होईल अशी सार्थ भीती शिवसेनेच्या आमदारांमध्ये आहे. हीच खदखद पुढे अनेक कारणांमुळे वाढत गेली, तरी तिची सुरुवात आघाडीत सहभागी होतानाच झाली होती. एक तर काँग्रेसचे राजकारण अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणावर चालते. राष्ट्रवादीही एका विशिष्ट समाजाचे राजकारण करत असल्याचा आरोप वारंवार होतो. उलट बाळासाहेबांनी शिवसेनेत जातीपातीचा विचार न करता अनेकांना उमेदवारी दिली. पुढे ते हिंदूंचे संरक्षक म्हणून प्रस्थापित झाले. त्याचा राजकीय फायदा भाजपलाही झाला. हिंदूकेंद्रित राजकारण राष्ट्रीय स्तरावर करणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख बनली. तिचा पाया महाराष्ट्रात तरी बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते घातला गेला होता, हे विसरता येणार नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यात हिंदुत्वाचा समान धागा आहे.

शिवसैनिकांनी उद्धव यांचे नेतृत्व बाळासाहेबांवरचे प्रेम आणि ठाकरे या नावावरची निष्ठा यामुळे स्वीकारले असले, तरीही उद्धव यांना बाळासाहेबांसारखा स्वतःचा करिष्मा तयार करण्यात यश आले नाही. शिवाय त्यांचा पक्षाच्या निम्नस्तरावरच्या कार्यकर्त्यांशी कनेक्ट राहिला नाही. आता याचे खापर त्यांच्या भोवतीच्या चेलेचपाट्यांवर फोडले जात असले, तरी ते संपूर्ण खरे नाही. स्वतः उद्धवही त्यास जबाबदार आहेत, हे मान्यच करावे लागेल. ड्रॉईंगरूम पॉलिटिक्स करण्यात उद्धव वाक्बगार मानले जातात; मात्र शिवसेना हा अशा राजकारणावर नव्हे, तर नेत्याबद्दलच्या आपुलकीच्या भावनेवर, निष्ठेवर चालणारा पक्ष आहे, हे त्यांना उमगले नाही किंवा त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले, असे म्हणावे लागेल.

उद्धव मुख्यमंत्री झाले, तेव्हा शिवसैनिकांना आपले सरकार आल्याचा आनंद दिसेल असे वाटले होते; पण तसे झाले नाही. दुर्दैवाने कोव्हिडची महामारी आणि नंतर स्वतःच्या आजारपणामुळे उद्धव यांना राज्यात फिरता आले नसले, तरी हे आपले सरकार असल्याचे शिवसैनिकांना वाटत नाही, याचे दर्शन शाखाशाखांवर चक्‍कर मारली, तरी जाणवत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या नावाचा करिश्माच नव्हता, हे दिसत होते. असे असले, तरी शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची, असा सवाल विचारला जाईल, तेव्हा ठाकरे या नावाशिवाय शिवसेनेचा विचारही सामान्य शिवसैनिकांच्या मनात येणार नाही. स्वतः एकनाथ शिंदे यांनाही त्याची पुरेपूर कल्पना असल्याने त्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वा त्यावरील निष्ठा सोडलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळातील पक्ष फोडला आहे. कुणाचा गट खरा, यावर आता कोर्टकचेर्‍या होतील; मात्र उद्धव यांना आता ‘पुनःश्‍च हरिओम’ म्हणून शिवसेनेची पुनर्बांधणी करावी लागेल. विस्कळीत झालेला पक्ष एकत्र आणावा लागेल. शिवसैनिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना समजून घ्याव्या लागतील. आपल्या भोवतीचे कोंडाळे बाजूला सारून हे करावे लागेल. अनेकांच्या तोंडाला आवर घालावा लागेल. तसे झाले, तरच बाळासाहेबांसारखा पक्ष पुन्हा उभारता येईल. नाही तर उतरणीला लागलेली शिवसेना परत उभारी घेणे अवघड आहे.

राजरंग
उदय तानपाठक

Back to top button