पंकजा मुंडेंचे काय होणार? | पुढारी

पंकजा मुंडेंचे काय होणार?

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल, हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा साहजिकच त्यांच्या कन्या पंकजा यांचेच नाव पुढे आले.

भाजपमध्ये नव्या पिढीने कारभार हाती घेतल्यावर देवेंद्र फडणवीस हे नव्या पिढीचे नेता बनून भाजपची कमान सांभाळू लागले आणि त्यांच्याच समकालीन नेत्यांच्या महत्त्वाकांक्षेलाही धुमारे फुटले. नाथाभाऊ खडसे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर डोळा ठेवून बसले होते. ते राष्ट्रवादीत गेले. विनोद तावडे यांचा पत्ता कापला गेला; मात्र संघाच्या पठडीतून आलेल्या तावडे यांनी मात्र असे काहीही न करता वाट्याला आले ते भोग स्वीकारले. त्याचे फळ त्यांना मिळालेदेखील! पंकजा मुंडे यांनी मात्र अनेकदा आपल्याला योग्य ते स्थान न मिळाल्याची खंत जाहीर वा खासगीत बोलून दाखवली आणि अखेर त्यांना स्वतःच्याच भावाकडून विधानसभेत हार पत्करावी लागली. आपल्या पराभवाला पक्षातूनच खतपाणी घातले गेल्याचे त्या म्हणाल्या होत्या. विधान परिषदेत संधी देऊन त्यांचे पुनर्वसन केले जाईल, अशी आशा त्यांच्यासह त्यांच्या समर्थकांना होती. तेही झाले नाही. पंकजा वेगळ्या वाटेवर जाणार की तावडेंप्रमाणे शिस्त पाळून पक्षनिष्ठा दाखवणार की औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या सल्ल्यानुसार स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करणार, हे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे यांचा राजकीय वारसा त्यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम यांच्याकडे आला. प्रीतम खासदार झाल्या, तर पंकजा आमदार. फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्रिपद मिळाले. महाराष्ट्रातल्या नव्या पिढीची मात्र एकमेकांशी स्पर्धा सुरू झाली. देवेंद्र मुख्यमंत्री होऊ शकतात, मग मी का नाही, असा विचार त्यांचे सहकारीच करू लागले. पंकजांनी जाहीरपणे ‘लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच…’ असे विधान केले आणि त्यानंतर त्यांचा पडता काळ सुरू झाला, असे म्हणतात.

मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काहीच नाही; मात्र त्यासाठी योग्य वातावरण तयार होण्याची आणि संधीची वाट पाहावी लागते. नवख्या पंकजांना तेवढी परिपक्वता नव्हती. त्यामुळेच भाजपसारख्या शिस्तबद्ध पक्षात त्या बाजूला पडल्या. त्यानंतर मात्र आजपर्यंत प्रत्येक वेळी पंकजा मुंडे यांना मागेच राहावे लागले. त्यांना पक्षाने मध्य प्रदेशचे सहप्रभारी केले असले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणातून मात्र बाहेर ठेवले आहे. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळावी, यासाठी पंकजांनी खूप प्रयत्न केले, फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनीही जाहीरपणे तसे सांगितले. विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज होणे साहजिकच होते. त्यांच्या समर्थकांकडून मात्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न झाला. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयावरही हल्ला झाला.

आजच्या स्थितीत पंकजांसाठी शिवसेनेने आपले दरवाजे खुले केल्याचे दिसते. मुंडे घराण्याचे ठाकरे कुटुंबाशी घरगुती संबंध आहेत. उद्धव ठाकरे आपल्याला भावासारखे असल्याचे पंकजांनी म्हटले होते; मात्र अलीकडे शिवसेनेत बदललेल्या परिस्थितीनुसार लगेचच मानाचे पान मिळण्याची शक्यता आहे का, हे पाहावे लागेल. सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. त्यात ओबीसींना जवळचा वाटेल असा पक्ष एकही नाही. त्यामुळे पंकजांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि ओबीसी विशेषतः गोपीनाथरावांनंतर राजकीयद़ृष्ट्या अनाथ झालेल्या वंजारी समाजाला एकत्र आणावे, असा पर्याय त्यांच्या समर्थकांत चर्चेत आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांची जी अभेद्य संघटना उभी केली त्याचेही बळ असेल. नाहीतरी ओबीसींचे लढाऊ नेते सत्तेच्या वळचणीला जाऊन निष्प्रभ झाले आहेत. त्यांची जागा पंकजा घेऊ शकतील काय, हा प्रश्न आहे. भाजपची विधान परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाली, तेव्हा आपण दोन दिवसांनी बोलू, असे पंकजा म्हणाल्या होत्या. अजून तरी त्या गप्प आहेत. त्यांचे मौन नेमके कशात भाषांतरित होईल, हे आता तरी सांगता येणे अवघड आहे.

– उदय तानपाठक

Back to top button