कशी वाढतेय ‘गंगाजळी?’ | पुढारी

कशी वाढतेय ‘गंगाजळी?’

प्रा. डॉ. अश्‍वनी महाजन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

परदेशी चलनाचा साठा वाढविण्यासाठी परदेशी गुंतवणूक, खासगी कंपन्यांनी घेतलेली परदेशी कर्जे आणि भारतीयांकडून मायदेशी पाठविलेली रक्‍कम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

परदेशी चलनाच्या गंगाजळीत गेल्या तीन दशकांपासून सातत्याने भर पडत असली, तरी गेल्या अठरा महिन्यांत झालेली वाढ लक्षणीय आहे. 3 जानेवारी 2020 रोजी ही गंगाजळी 431 अब्ज डॉलर एवढी होती. 3 जुलै 2021 पर्यंत परदेशी चलनाचा साठा 611 अब्ज डॉलरवर जाऊन पोहोचला. तीस वर्षांपूर्वी 1991 मध्ये भारतात अशी स्थिती उद्भवली होती. ज्यावेळी आपल्याकडे केवळ सात दिवसांच्या आयातीची बिले देण्याइतकेही परकीय चलन उपलब्ध नव्हते. आज आपला परदेशी चलनाचा साठा आगामी 15 महिन्यांच्या आयातीची बिले भागविण्याइतका सक्षम आहे.

देशात परदेशी चलनाचा साठा योग्य प्रमाणात नसेल, तर परकीय कर्जांची मुद्दल आणि व्याज चुकते करण्यात अडचणी निर्माण होण्याचा धोका असतो. 1991 मध्ये आपल्याला तो धोका पुरेपूर जाणवला होता आणि आपल्याकडील सोने इंग्लंडमध्ये गहाण ठेवण्याची वेळ आली होती. अर्थतज्ज्ञांच्या मते, परदेशी चलनाचे भांडार हे देशासाठी विम्याची भूमिका बजावते. देशावर कधीच कुठल्या देशासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये, यासाठी हे भांडार आवश्यक असते. हे अर्थतज्ज्ञ चीनच्या परदेशी चलनसाठ्याशी भारतीय चलनसाठ्याची तुलनाही करतात. चीनकडील परदेशी चलनाचा साठा भारताच्या पाचपट अधिक आहे. चीनचा परदेशी चलनाचा साठा जास्तीत जास्त वस्तू आणि सेवांची निर्यात, तसेच कमीत कमी आयात असल्याने व्यापारी शिल्लक खूपच अधिक असल्यामुळे वाढला आहेे.

संबंधित बातम्या

भारतातील परदेशी चलनाच्या साठ्यात झालेली वाढ ही मुख्यत्वे प्रत्यक्ष आणि पोर्टफोलियो गुंतवणुकीमुळे झाली आहे. कारण, सामान्यतः आपल्याला परदेशी व्यापारात तूटच सहन करावी लागते. त्यामुळेच परदेशी चलनाचा साठा वाढण्याच्या स्रोतांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. या स्रोतांमधून मिळालेल्या परदेशी चलनाचे दूरगामी परिणाम काय होतील, याकडेही पाहायला हवे. परदेशी चलन मिळविण्यासाठी सर्वांत उत्तम मार्ग व्यापारी शिल्लक हाच आहे, याविषयी अर्थतज्ज्ञांमध्ये मतैक्य आहे. आयातीपेक्षा निर्यात अधिक झाली, तर त्या मार्गाने मिळालेले परदेशी चलन हे सर्वांत उत्तम पर्याय आहे. चीनमध्येही असेच झाले आहे. परंतु, हेच परदेशी चलन उधार घेऊन प्राप्त झाले असेल, तर तो सर्वांत निकृष्ट पर्याय आहे.

परंतु, शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीच्या माध्यमातून परदेशी चलन आले असेल, तर त्याचेही अनेक दुष्परिणाम आहेत. यामुळे शेअर बाजारांमध्येच नाही, तर विनिमय दरातही उलथापालथ होते. त्याचा परिणाम देशासाठी अहितकारक असतो. दुसरा दुष्परिणाम असा आहे की, हे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देशात घेऊन जातात आणि सोबतच त्यांच्या मालमत्तांचे मूल्य वाढते.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एकंदर 281 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात केली आहे आणि त्यामुळे 31 मार्च 2021 पर्यंत त्यांच्या संपत्तीचे एकूण मूल्यांकन 607 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेे. याखेरीज 64.28 अब्ज डॉलरचा लाभांश त्यांनी कमावला. 607 अब्ज डॉलरचे शेअर्स किंवा बाँड्स कधीही विकून ते परत जाऊ शकतील आणि आपल्या देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत पुन्हा खडखडाट होऊ शकेल. त्यामुळेच पोर्टफोलियो गुंतवणुकीला ‘हॉट मनी’ असेही म्हणतात.

अर्थात, परदेशी चलनाचा साठा वाढविण्यासाठी परदेशी गुंतवणूक, खासगी कंपन्यांनी घेतलेली परदेशी कर्जे आणि भारतीयांकडून मायदेशी पाठविलेली रक्‍कम या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. परंतु, या सर्व स्रोतांचा प्रभाव एकसमान नसतो. भारतीयांनी पाठविलेल्या रकमा पुन्हा देशाबाहेर जाण्याची शक्यता फारशी नसते. परंतु, प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूकदार असोत किंवा पोर्टफोलियो गुंतवणूकदार हे सर्वचजण मोठ्या प्रमाणावर पैसा देशाबाहेर घेऊन जातात. गेल्या दहा वर्षांत (2010-11 ते 2019-20) या परदेशी गुंतवणूकदारांनी 390 अब्ज डॉलर रक्‍कम आपापल्या देशात परत नेली आहे.

यापरदेशी गुंतवणूकदारांवर कर आकारण्याचा प्रयत्न ज्या-ज्यावेळी केला, त्या-त्यावेळी त्यांनी सरकारला आणि देशाला ब्लॅकमेल करून हे प्रयत्न हाणून पाडलेे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी एका विशिष्ट ‘लॉक इन पीरिअड’ची तरतूद करता येणे शक्य आहे. त्याचबरोबर त्यांना हा पैसा परत न्यायचा असेल, तर त्यावर कर लावण्याचीही तरतूद केली जाऊ शकते. टोबिन नावाच्या अर्थतज्ज्ञाने अशा कराची सूचना केली होती. त्यामुळे याला ‘टोबिन टॅक्स’ असेही म्हणतात. आज देशाची परदेशी चलनाच्या गंगाजळीची परिस्थिती उत्तम असताना अशा उपायांचा वापर करून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना शिस्त लावली जाणे शक्य असून, त्यासाठी हीच योग्य वेळ आहे.

Back to top button