लवंगी मिरची : लुडबूड थांबवा, पडझड थांबेल! | पुढारी

लवंगी मिरची : लुडबूड थांबवा, पडझड थांबेल!

काय गरम होतंय हो भाऊसाहेब?
बघा ना तात्यासाहेब. जूनचा पहिला आठवडा संपला, तरी पावसाचं नाव नाही यंदा!
काय दिवस आलेत हो? हवा तेव्हा वारा, पाऊस नाही. भलत्याच वेळी थंडी नाही, तर उष्णतेच्या भीषण लाटा!
आपण म्हणतो, पोरं ऐकत नाहीत; पण निसर्गतरी कुठे ऐकतोय माणसाचं?
म्हणूनच त्याला खूश करायला जागतिक पर्यावरण दिन साजरा करतात की काय?
आपल्या लहानपणी नव्हता नाही असा एखादा दिन?

आपल्या लहानपणी फक्‍त ‘दिन दिन दिवाळी, गायी म्हशी ओवाळी’, हे होतं. आतासारखे रोजचे दिन नव्हते!
तर काय! चहा दिन, कॉफी दिन, टपाल दिन, प्रवास दिन, मैत्री दिन, मातृ दिन, शोधतच असतात बहुधा एकेक नाव.
असं करता करता एका दिवसाला काहीच नाव सापडलं नाही म्हणून पर्यावरण दिन नाव दिलं असेल का?
शक्य आहे; पण पर्यावरणाचा प्रश्‍न आता साधा राहिला नाहीये म्हणतात.
आपल्याला शहरी माणसांना त्याची काय फिकीर?
तसं नाही बरं भाऊसाहेब. जंगलं संपवत आणली माणसाने. यातूनच एखादा वाघ, चित्ता रस्ता चुकून शहरात डोकावतो. वाघ म्हणजे खरा वाघ हं! बायको किंवा बॉस नाही.
हल्ली अधूनमधून बातम्या असतातच. शेतात वाघाचा बछडा सापडला. प्रश्‍न पडतो, हा आपल्यात कसा आला?
तो असंच म्हणत असेल कदाचित.
काय?

की बुवा जंगल हे माझं घर होतं, त्यात ही माणसं कुठून आली?
खरं की! दरडी कोसळण्यामागेपण अशीच कारणं असतील का?
हो. आपण हवे तसे भुयारी रस्ते, बोगदे काढणार. डोंगरदर्‍यांमध्ये लुडबुडणार. मग, ते पडझड करून निषेध नोंदवणार.
त्याशिवाय बघा ना! आपली थंड हवेची गावं हळूहळू गरम होत चाललीहेत.
आसपासची झाडंझुडपं आपणच घालवल्यावर गारवा येणार कुठून आणि कसा?
गावाकडच्या दोन-तीन भरवश्याच्या विहिरी यंदा आटल्या.

संबंधित बातम्या

जमिनीतलं खोलवरचं पाणी अजूनअजून ओढून घेणारी पिकं काढत असतील गावकरी. जमिनीच्या पोटातलं पाण्याचं प्रमाण कमीकमीच होत जाणार ना?
तसा पाण्याचा खडखडाट तरी, नाही तर प्रचंड ढगफुटी, चक्रीवादळं, बेभान पाऊस तरी.
एकेक आक्रीतच घडतंय. डोकं फिरल्यासारखा वागतोय निसर्ग.
कोणी फिरवलं त्याचं डोकं? माणसानेच ना?
आता आधुनिक जगण्याच्या पद्धतीत असं होणारच की!
असं म्हणून चालणार नाही. किती इंधन जाळायचं? किती रसायनं सोडायची? आपल्याला मुरडच घालावी लागेल.
कशी?

पहिली गोष्ट कानाला खडा लावण्याची, ती म्हणजे, या सृष्टीत राहाणारे आपण शेवटचे नाहीहोत. आपल्यानंतर पिढ्या न् पिढ्या इथे असतील, ती आपलीच लेकरंबाळं असतील.
पोरांसाठी किती जीवापाड पैसा वाचवतो ना आपण?
तसंच पर्यावरणही वाचवूया, टिकवूया!
पैसा एकवेळ पोरं मिळवतीलही; पण पर्यावरण ती कुठून मिळवणार? ते काय विकत घेता येतं थोडंच?
नाही ना येत? म्हणूनच म्हणतोय. पर्यावरण दिन हलक्यात घ्यायला नको. आपण त्याची काळजी घेऊ की, तेपण आपल्याला साथ देईल.
– झटका

Back to top button