ब्राह्मण सभा आणि ‘पवारांचे कसब’! | पुढारी

ब्राह्मण सभा आणि ‘पवारांचे कसब’!

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुण्यात अचानक ब्राह्मण सभा बोलावली आणि महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या गेल्या. मधल्या काळात राष्ट्रवादीचे काही नेते ब्राह्मण समाजावर घसरले. स्वत: पवारही टप्प्याटप्प्याने ब्राह्मणांवर घसरत आले. त्यातून ब्राह्मण समाजात निर्माण झालेली अस्वस्थता दूर करावी, हा हेतू ही ब्राह्मण सभा बोलावण्यामागे असावा, असा अंदाज होता.

मात्र, पुण्यातील ही बहुचर्चित ब्राह्मण सभा झाली आणि आता ‘पवारांचे कसब’ लिहायला घ्यावे अशी स्थिती समोर आली. म्हणजे, काळाच्या ओघात म्हणा की प्रबोधन चळवळींची निष्पत्ती, ‘ब्राह्मणांचे कसब’ लयाला गेले आणि ब्राह्मणांसकट अठरापगड जातींना खेळवणारे ‘पवारांचे कसब ’ मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि समाजकारणाला अजूनही समजायचे आहे हे लक्षात आले. या ब्राह्मण सभेची पहिली बातमी अशी होती की, खुद्द शरद पवारांनी ब्राह्मण संघटनांना चर्चेसाठी बोलावले आहे.

बैठकीनंतर मात्र पत्रकार परिषदेत पवारांनी विपरीत माहिती दिली. ब्राह्मण संघटनांनीच आपल्याशी संपर्क साधला आणि चर्चेचा प्रस्ताव ठेवला, असे ते म्हणाले. या बैठकीत ब्राह्मणांनी आरक्षण मागितले. ते देण्यास आपण विरोध केलाच; शिवाय इतर समाजांच्या आरक्षणाच्या मागणीला विरोध करू नका, असेही आपण ब्राह्मण संघटनांना समजावल्याचा सूर पवारांनी लावला, तो वस्तुस्थितीला धरून नाही. मुळात राज्यभरातून ब्राह्मण संघटनांनी आपल्याकडे चर्चेला यावे, असे पवारांनाच वाटले. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फोन करून निमंत्रणे दिली. एकट्या पुण्यात ब्राह्मणांच्या 24 संघटना आहेत.

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारठकर यांनी स्वत: हे निमंत्रणाचे फोन केले. त्यात ब्राह्मण महासंघ, आम्ही म्हणजे परशुराम सेवा संघ यांनी निमंत्रण नाकारले. 10 संघटना पवारांच्या ब्राह्मण सभेला उपस्थित असल्याचे सांगितले गेले. त्यांची यादी कुणी तपासली? पंचांगकर्ते मोहन दाते बैठकीला उपस्थित असल्याचे मेसेजेस व्हायरल होऊ लागले तेव्हा आपण या बैठकीला उपस्थित नसल्याचा खुलासा दातेंना फेसबुकवर करावा लागला. आपल्याच परिवारातले 10-11 सदस्य घेऊन अखिल भारतीय पातळीवरचा महासंघ चालविणार्‍या मंडळींनी मग आपले जिल्हाप्रमुखही बैठकीला येतील अशी व्यवस्था केली.

आणखी काही आसनस्थ मंडळी ही तशी राष्ट्रवादीचीच म्हणता येतील इतके त्यांचे पवार पक्षाशी सर्वार्थाने साहचर्य आहे. तात्पर्य इतकेच की, राष्ट्रवादीतील ब्राह्मण आघाडी कामाला लागूनही या ब्राह्मण सभेत समाजाचे प्रतिबिंब उमटेल अशी उपस्थिती नव्हती. तरीही त्या बैठकीत पवार काय बोलतात, काय चर्चा होते याकडे महाराष्ट्र कान लावून बसला होता. बैठकीनंतरचा संवाद मात्र एकतर्फी झालेला दिसतो. पत्रकार परिषद झाली ती फक्त पवारांची.

समोर प्रतिवाद करणारा कुणी नाही, ब्राह्मण सभेसाठी मीडियाला प्रवेश नव्हता. हे सारे पथ्यावर पडल्यागत पवारांनी ब्राह्मण विरुद्ध बहुजन असा आरक्षणाचा नवा वाद ब्राह्मण सभेनंतरच्या पत्रकार परिषदेतून उभा केला. बैठकीत म्हणे पवारांनीच आरक्षणाचा विषय छेडला. तेव्हा ‘आम्ही सारे ब्राह्मण’ पाक्षिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी उठून उभे राहिले आणि म्हणाले, आरक्षण नव्हे, संरक्षण हवे ही आमची मागणी आहे. सरासरी 13 टक्के ब्राह्मण समाज हा सततच्या सामाजिक जातीय अपमानाचा बळी ठरतो आहे; पण पवारांनी ही वाक्यरचना फिरवली. म्हणजे एखाद्याने म्हणावे, मला आंबे नकोत. त्यावर पवारांचे उत्तर आले, तुम्हाला हापूस अजिबात मिळणार नाही. ब्राह्मण सभेतील चर्चा पवारांनी अशी आरक्षणाच्या वळणावर आणली.

ब्राह्मणांनी इतर समाजांच्या आरक्षणाला या बैठकीत विरोध केला, आम्हाला नाही, तर कुणालाही आरक्षण नको, अशी भूमिका ब्राह्मणांनी मांडली. मात्र, मागास घटकांना आरक्षण द्यावे लागेल, असे आपण ब्राह्मण सभेला सांगितल्याचे पवार म्हणतात. इतरांच्या आरक्षणाला विरोध नको, असे आवाहनदेखील ब्राह्मण सभेला केल्याचा आव शरद पवारांनी आणलेला दिसतो. यातून शरद पवार स्वत:ची जपलेली प्रतिमा घासून, पुसून पुन्हा लख्ख करू पाहताना दिसतात. पवारांचे कसब कसे ते पाहा. या महाराष्ट्राचे आपणच जाणते राजे. एक अस्वस्थ झालेला ब्राह्मण समाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जात नाही.

पाच वर्षे संपूर्ण राजशकट हाकणारे आणि कोणत्याही क्षणी पुन्हा सत्तेवर येण्याची विजिगीषू वृत्ती बाळगणारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेदेखील जात नाही. या 3 टक्के म्हणा की 5 टक्के समाजाने संपर्क साधला तो फक्त शरद पवारांशी! पवार हेच आजच्या महाराष्ट्राचे जणू गोब्राह्मणप्रतिपालक, पवार हेच सकलजनांचे नायक, बहुजनांचे आधारू वगैरे आहेत, असा संदेश समस्त महाराष्ट्रात जाईल, अशीच संधी या ब्राह्मण सभेच्या खटाटोपातून पवारांनी निर्माण केली. त्यासाठी ब्राह्मणांनीच आपल्याशी संपर्क साधला ही पहिली थाप, ब्राह्मणांनी आरक्षण मागितले आणि आपण त्यांना स्पष्ट नकार दिला ही दुसरी थाप आणि ब्राह्मणांनी इतर समाजांच्या आरक्षणाला विरोध केला ही आणखी तिसरी पवारफुल्ल थाप. अशा तिहेरी थापा मारण्याचे कसब पवारांनी नंतरच्या पत्रकार परिषदेत दाखवले.

ब्राह्मण सभा भरवायची, समस्त ब्राह्मणांना आरक्षणविरोधी ठरवायचे आणि हातात तलवार घेत आपण बहुजनांच्या आरक्षणासाठी कसे लढत आहोत याचा दिखावा निर्माण करायचा, यातला हा प्रकार. बहुजनांच्या प्रश्नांची चाड फक्त आपल्यालाच आहे आणि आपणच ते सोडवू शकतो, असे भ्रमयुग पवार सतत जपत आले आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा पेच पवारांनीच दीड-दोन दशके चिघळत ठेवला. शेवटी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच सुचवलेला नामविस्तार करत आपणच हा प्रश्न कसा सोडवला, अशी नोंद सतत करत राहणे हा पवारांच्या या भ्रमयुगाचा मोठा दाखला म्हणता येईल. याचाच एक भाग म्हणून या ब्राह्मण सभेकडे पाहावे लागते.

ही ब्राह्मणसभा भरवून पवारांनी ब्राह्मण समाजातील कथित अस्वस्थता वाढवली की दूर केली, हा देखील प्रश्नच आहे. कारण, सभेची पाने उठली आणि पवारांनी ब्राह्मणांना आरक्षणविरोधी ठरवत नवा वाद उभा केला. तो कुणाच्या पथ्यावर पडणार आहे? आम्ही केलेल्या ताज्या पाहणीनुसार, राज्यात 24 हजार गावांमध्ये ब्राह्मणांचे एकही घर नाही. उर्वरित गावांमध्ये एक-एक, दोन-दोन घरे शिल्लक आहेत. या स्थलांतरातून राज्यातील 40 हून अधिक विधानसभा मतदारसंघांत 10 ते 12 टक्के मते आज ब्राह्मणांची आहेत; ज्यातल्या 20 विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार आजही आहेत.

पुढील काळात शिवसेनेच्या बदललेल्या भूमिकेमुळे ब्राह्मण मते त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता आहे. पुण्यासारख्या ठिकाणी हा टक्का 15 च्या पुढे जातो. ज्या अर्थी एकट्या पुण्यात ब्राह्मणांच्या दोन डझन संघटना काम करतात, त्या अर्थी हा समाज एकगठ्ठा मतदान करणे कुठेही शक्य नाही; परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या समाजावर अलीकडे जे अश्लाघ्य हल्ले चढवले त्यातून ब्राह्मण राष्ट्रवादीविरोधात एकवटू नयेत व महाविकास आघाडीला त्याचा फटका बसू नये असा विचार पवारांनी केला आणि आणखी दुही माजवणारी ब्राह्मण सभा त्यांनी निमंत्रण देऊन भरवली.

शहरांमध्ये स्थलांतरित झालेले ब्राह्मण खासगी नोकर्‍या आणि उद्योगांत स्थिरावले आहेत. आज महाराष्ट्रातील 47 टक्के ब्राह्मण समाज व्यवसायात आणि 50 टक्के खासगी नोकर्‍यांत आहे. 75.5 टक्के ब्राह्मणांचे उत्पन्न मात्र तीन लाखांच्या आत आहे. असे असले तरी आरक्षण हा या समाजाच्या चिंतेचा विषय कधी नव्हता आणि नाही. ब्राह्मण सभा भरवून तो निर्माण केला हेच पवारांचे कसब!

विश्वजित देशपांडे
अध्यक्ष, परशुराम सेवा संघ

Back to top button