लोकशाहीतील राजघराण्यांचे यशापयश | पुढारी

लोकशाहीतील राजघराण्यांचे यशापयश

अखेर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच्या चर्चेपेक्षा जास्त चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप या माघारीनंतर सुरू झाले. संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फसवणूक केल्याचे सांगत थेट त्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले.

निवडणुकीत घोडेबाजाराला वाव मिळू नये यासाठी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होत असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. संभाजीराजे यांनी स्वराज्य हा नवा राजकीय पक्ष स्थापन केला असून, 2024 च्या निवडणुकीआधी महाराष्ट्र पिंजून काढून पक्षविस्तार करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. राजेंच्या या भूमिकेनंतर शाहू महाराजांनी केलेल्या विधानावरून नवाच वाद सुरू झाला; पण राजेंच्या उमेदवारीची घोषणा आणि नंतरच्या माघारनाट्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे समर्थकांनी ‘राज्यसभा नको आता अख्खा महाराष्ट्रच हवा,’ असा सूर सोशल मीडियावर लावला आहे.

राजघराण्यातील व्यक्तीने अपक्ष नव्हे, तर कोणत्या तरी राजकीय पक्षाचे सदस्यत्त्व स्वीकारूनच लोकशाहीतील राजकीय कारकीर्द जारी ठेवली. ग्वाल्हेरच्या राजमाता विजयाराजे सिंधीया, वसुंधरा राजे यांची राजकीय कारकीर्द पूर्वीच्या जनसंघाकडून आणि पुढे भाजपकडून तर माधवराव शिंदे आणि त्यांचे चिरंजीवही काँग्रेसमधून राजकीय कारकीर्द घडविताना आपण पाहिले. महाराष्ट्रातील सातारा गादीचे वारसदार उदयनराजे, त्यांचे काका अभयसिंहराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांचीही राजकीय कारकीर्द गाजली. राजेशाही संपल्यानंतरही जनसामान्यांच्या मनात राजघराणी आणि त्यांचे वारसदार यांच्याविषयी कमालीचा आदर असतो आणि तो आदर आपल्याकडे वळवण्यासाठी राजकीय पक्ष अधीर असतात.

भाजपकडून संभाजीराजेंना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीने आपले उमेदवार म्हणून त्यांचे स्वागत केले. मात्र, आघाडीतील कोणत्या पक्षाचे ते उमेदवार असतील, हे निश्चित झाले नव्हते. शिवसेनेकडे अतिरिक्त मते असल्याने त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा मागितला. मात्र, त्यासाठी शिवबंधन बांधावे लागेल, अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली. त्यास नकार देऊन संभाजीराजेंनी निवडणुकीतून थेट माघारच घेतली. मात्र, हे करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असा आरोप केला. संभाजीराजेंना मराठा तरुणांकडून समाजमाध्यमावर पाठिंबा मिळत असतानाच त्यांचे वडील शाहू महाराज यांनी वेगळीच भूमिका घेऊन शिवसेनेची संभाव्य कोंडी टाळली.

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजघराणी कमीजास्त काळासाठी चमकून गेली. उदयनराजेंचे नाव देशभरात परिचित असले, तरी त्यांचे वडील प्रतापसिंहराजे यांनी सातारा नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केला होता. यशवंतराव चव्हाण तर खासदारकीचा उमेदवारी अर्ज भरण्याआधी अदालत वाड्यावर जाऊन सुमित्राराजेंचा आशीर्वाद घेत असत. पुढे इंदिराजींनी यशवंतरावांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी सुमित्राराजेंनाच गळ घातली, तेव्हा त्यांनी स्पष्ट नकार दिला. उदयनराजे भोसले हे थेट देशाच्या राजकारणापर्यंत मजल मारून आले.

युती सरकारच्या काळात राज्यमंत्रिपद आणि पुढे खासदारकीही त्यांना मिळाली. त्यांच्या लोकप्रियतेचा सर्वांनाच फायदा हवा असला, तरी ते कधी कोणती भूमिका घेतील याची खात्री कुणालाच देता येत नाही. त्यांच्याच चुलत घराण्यातले अभयसिंहराजे भोसले हे मात्र काळाची पावले ओळखून योग्य वाटचाल केल्याने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री झाले, 1991 मध्ये उदयनराजेंनी पहिल्यांदाच रयत पॅनल स्थापन करून सातारा नगरपालिकेत अभयसिंहराजेंना आव्हान दिले. पुढे 1996 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे अपक्ष लढले आणि पराभूत झाले.

त्यांच्या उमेदवारीमुळे सातारा मतदारसंघात पहिल्यांदाच काँग्रेसचा पराभव झाला आणि शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर विजयी झाले, हा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजघराण्यांनी आपापला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. गडचिरोलीचे धर्मरावबाबा अत्राम अनेक वर्षे आमदार, तर एकदा राज्यमंत्री होते. नागपूरचे भोसले घराणे, कोकणातले शिवरामराजे भोसले, अक्कलकोटचे भोसले, कोल्हापूर जिल्ह्यातले विक्रमसिंह घाटगे, सातारा जिल्ह्यातले विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक-निंबाळकर अशी सरदार आणि राजघराण्यातली नावे महाराष्ट्राच्या राजकारणात आपापल्या भूमिका घेऊन आली. आता संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आहे. ते स्वतःचाच पक्ष घेऊन राजकारणात आले आहेत. त्यांना यश किती मिळेल, हे काळच ठरवेल!

– उदय तानपाठक

Back to top button