राज्यसभेत बाजी कोणाची?

राज्यसभेत बाजी कोणाची?
Published on
Updated on

राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. यासोबतच खासदारांच्या राजीनाम्यामुळे तेलंगणामधील एका जागेवर 30 मे रोजी आणि ओडिशातील राज्यसभेच्या एका जागेसाठी 13 जून रोजी पोटनिवडणूक होत आहे. एकंदरीत येत्या काही दिवसांत 15 राज्यांमधील राज्यसभेच्या 59 जागांसाठी मतदान होईल. यापैकी एक अपक्ष सोडला, तर 31 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए), तर त्यातील 25 जागा सध्या भाजपकडे आहेत. यातील 7 ते 9 जागा यावेळी एनडीएला गमवाव्या लागू शकतात.

यूपीएचे या 59 मध्ये 13 सदस्य आहेत. यात काँग्रेसचे 8, द्रमुकचे 3, शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी 1 खासदार आहे. या निवडणुकीत यूपीएला 2 ते 4 जागांचा फायदा होऊ शकतो. या 59 जागांपैकी समाजवादी पक्षाकडे 3, बिजू जनता दलाकडे 4, बहुजन समाज पक्षाकडे 2 आणि तेलंगणा राष्ट्र समितीकडे 3 खासदार आहेत. वायएसआर काँग्रेस, अकाली दल आणि राष्ट्रीय जनता दलाकडे प्रत्येकी एक खासदार आहे. अशा प्रकारे सध्या इतर पक्षांच्या खासदारांची संख्या आहे पंधरा. राज्यसभा निवडणुकीत इतर पक्षांना 3 जागांचा फायदा मिळू शकतो.

उत्तर प्रदेशात 11 जागांसाठी निवडणूक होत आहे. बसपकडे सध्या 2 आणि काँग्रेसकडे 1 जागा आहे; मात्र या तीनपैकी दोन जागा भाजपकडे जाऊ शकतात. अशा प्रकारे 2 जागांच्या फायद्यासह भाजप यावेळी आपले 7 उमेदवार उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवू शकतो. सपाला गतवेळेप्रमाणे तीन खासदार वरिष्ठ सभागृहात पाठवता येतील. उर्वरित 11 व्या जागेसाठी चुरस असून ती भाजपच्या खात्यात जाऊ शकते.

महाराष्ट्रातून राज्यसभेचे 6 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यापैकी 3 जागा भाजपकडे आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी 1 जागा आहे. आकड्यांच्या आधारावर यावेळी भाजपला महाराष्ट्रात एक जागा गमवावी लागू शकते. भाजपचे 2 उमेदवार जिंकू शकतात. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी परस्पर समन्वयाने निवडणुका लढविल्या, तर काही अपक्ष आमदार घेऊन 4 जागा जिंकून एका जागेचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो. तमिळनाडूत राज्यसभेच्या 6 जागांपैकी द्रमुककडे 3 आणि अण्णा द्रमुककडे 3 आहेत; मात्र यावेळी राज्यातील सत्ताधारी द्रमुकला एक अधिकची जागा मिळू शकते.

बिहारमध्येही एनडीएला एक जागा गमवावी लागेल. भाजप पूर्वीप्रमाणेच दोन खासदार आरामात जिंकतील. परंतु, भाजपचा मित्रपक्ष जेडीयू एकच जागा जिंकू शकतो. त्यामुळे एका जागेचा फायदा आरजेडीला मिळून त्यांचा आकडा दोनवर जाऊ शकतो. आंध्र प्रदेशात 4 पैकी 3 जागा भाजपकडे आहेत; पण वायएसआर काँग्रेस या सर्व जागा जिंकू शकतो. तेलंगणात दोन जागा सत्ताधारी टीआरएसच्या ताब्यात आहेत आणि संख्याबळाच्या आधारे ते त्या राखतील. याशिवाय डॉ. बंडा प्रकाश हे विधान परिषदेवर गेल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त जागेवर 30 मे रोजी पोटनिवडणूक होईल. ही जागाही टीआरएस मिळवेल.

कर्नाटकात भाजप गतवेळेेप्रमाणे दोन उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतो; तर काँग्रेसचा एक उमेदवार आरामात निवडणूक जिंकू शकतो. चौथ्या जागेसाठी कुणाकडेही पुरेसे आमदार नसल्याने चुरस असणार आहे. राजस्थानमध्ये सध्या चारही जागा भाजपकडे आहेत. भाजपचे 1 आणि काँग्रेसचे 2 खासदार राज्यसभेत जाऊ शकतात, तर अपक्ष आमदारांच्या बळावर काँग्रेस तिसरी जागाही जिंकू शकते. मध्य प्रदेशात मागील वेळेप्रमाणे भाजप 2 आणि काँग्रेस 1 जागा जिंकू शकते. ओडिशातील तिन्ही जागा बिजू जनता दलाकडे आहेत. त्या ते राखतील. बीजेडी खासदार सुभाषचंद्र सिंह यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवरही बीजेडीचा विजय निश्चित आहे. पंजाबमध्ये दोन्ही जागा 'आप'कडे जातील. झारखंडमध्ये दोन्ही जागा भाजपकडे असून, यावेळी एक जागा सत्ताधारी आघाडी मिळवू शकते. छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस या दोघांच्याही खात्यात 1-1 जागा जाऊ शकते. एकंदरीत देशभरातील 59 जागा आणि त्या-त्या राज्यातील परिस्थिती पाहता राज्यसभा निवडणुकीत यंदा भाजप आणि एनडीएचे नुकसान होणार, अशी चिन्हे आहेत.

राज्यसभेच्या 57 जागांसाठी 10 जून रोजी मतदान होणार आहे. यातील 31 जागा रालोआकडे असून त्यातील 25 जागा सध्या भाजपकडे आहेत. यंदा या सर्व जागा राखणे ही एनडीएसाठी कसोटी असणार आहे. यूपीएकडे 13 जागा असून यंदा यामध्ये 2 ते 4 जागांची वाढ होईल, असा निरीक्षकांचा होरा आहे.
– विनायक सरदेसाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news