हॉकी : अनोखा आनंद | पुढारी

हॉकी : अनोखा आनंद

हॉकी खेळामध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळाले आहे त्यामुळे हा एक अनोखा आनंद आहे.

अनेकदा आपल्याला कसला आनंद झालाय, तेही स्पष्टपणे सामान्य माणसाला सांगता येत नाही; पण करोडो लोक मनापासून सुखावलेले आपण बघितलेले आहेत. आपल्या आसपासचे लोक आनंदोत्सव साजरा करत आहेत, याचा अर्थच काही चांगले घडलेले आहे, इतकेच सर्वसामान्य लोकांना कळलेले असते. काहीसा असाच अनुभव मागल्या दीड दिवसात अनेक भारतीयांना येत असेल. कारण, हॉकी हा भारतात तितका लोकप्रिय खेळ नाही वा क्रिकेटसारखा घराघरांत पोहोचलेला सुद्धा नाही; पण त्याच खेळामध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळाले आहे आणि त्याचा अर्थच भारतीय खेळाडूंनी काही मोठा पराक्रम जागतिक पातळीवर केलेला असणार, अशीच धारणा त्या आनंदामागे सामावलेली आहे.

जेव्हा अशा अनुभवातून माणूस जात असतो, तेव्हाच त्याला त्या अजाण आनंदाविषयी जाणून घेण्याची तीव्र भावना होत असते. गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला मिळालेले कांस्यपदक त्यासाठीही महत्त्वाचे आहे. कारण, त्यामुळे भारतीयांना आपला क्रीडाविषयक इतिहासही आठवायला मदत होणार आहे.

संबंधित बातम्या

तब्बल एकेचाळीस वर्षांनंतर भारताला अशा जागतिक स्पर्धेच्या या क्रीडा प्रकारामध्ये पदक मिळाले आहे आणि कधीकाळी याच खेळात भारतीय हॉकी संघ अजय मानला जायचा, हा इतिहास आहे. हल्लीच्या पिढीला त्याची माहिती सुद्धा नसेल, तर तिसर्‍या क्रमांकाचे पदक का महत्त्वाचे आहे, त्याचा बोध होऊ शकणार नाही. म्हणूनच या पदकाचे महत्त्व आजच्या काळात अनन्यसाधारण आहे. जेव्हा तुम्हाला आपल्या समाजाचा देदीप्यमान इतिहास आठवू लागतो, तेव्हा आपल्या पूर्वजांच्या त्या पराक्रमाची बरोबरी करण्याची स्वप्ने जागवली जात असतात आणि त्यातूनच नव्या पराक्रमाची आकांक्षा जागी होत असते. प्रयत्नांना चालना मिळत असते. या एका पदकातून आजच्या भारतीय हॉकी संघाने तीच चालना दिली, असे मानणे भाग आहे. कारण, विस्मृतीत गेलेल्या त्या इतिहासाची नवी ओळख एकविसाव्या शतकातल्या भारतीयांना या पदकातून करून देण्यात आलेली आहे.

प्रामुख्याने कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे गतवर्षीचे हे ऑलिम्पिक एक वर्ष उशिरा सुरू झाले आणि त्यातही अनेक निर्बंध व प्राकृतिक अडचणींवर मात करून सर्वच देशांच्या खेळाडूंना या स्पर्धेत उतरावे लागलेले आहे. मुळात अशा स्पर्धात्मक घटनाक्रमात सहभागी होणार्‍यांना सलग सराव करावा लागतो; पण मोकळ्या हवेतही श्‍वास घेण्याची मुभा न देणार्‍या कालखंडात सराव करीत हे शेकड्यांनी खेळाडू टोकियोला पोहोचलेले होते. त्याच्या आरंभीच या विजयाचा शिल्पकार मानला गेलेला श्रीजेशने जणू भविष्यवाणीच केलेली होती आणि ती खरी करून हा संघ मायदेशी परतणार आहे.

उपांत्य फेरीत बाद झालेल्या संघामध्ये कांस्यपदकासाठी लढत होते आणि म्हणूनच अंतिम फेरी हुकलेल्या संघात हा सामना झालेला होता; पण 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यापासून भारताला पुढले पदक हुलकावण्या देत राहिलेले होते. अन्य विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारताला कुठले तरी पदक जिंकण्याचा सिलसिला सुरू राहिला, तरी जो खेळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारताची मक्‍तेदारी मानला जात होता, त्याच खेळातले कुठलेही पदक भारताला जणू खिजवत होते वा हुलकावण्या देत होते. या खेळातून निवृत्त होणार्‍या किंवा त्याच क्रीडा प्रकारात नव्याने प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला, ही स्पर्धा व ती पदके खुणावत राहिलेली होती. याही संघातला दीवार मानला जाणारा गोलकीपर श्रीजेश फक्‍त तितकेच लक्ष्य ठरवून टोकियोला गेलेला होता. तिकडे रवाना होण्यापूर्वी त्याने एका माध्यमाला मुलाखत देतानाही त्याची स्पष्ट कबुलीच दिलेली होती. पदके खूप मिळाली आहेत; पण ऑलिम्पिकचे कुठले तरी पदक नसावे, ही बोचरी सल आहे.

आठ वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून आणणार्‍या भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक हॉकीप्रेमीला ही त्रुटी बोचत राहिली असल्यास नवल नव्हते. श्रीजेश तर संघाचा एक घटक होता. मागल्या स्पर्धेत त्यानेच संघाचे नेतृत्व केलेले होते आणि कप्‍तानपदी नसला तरी मनातली बोच कमी झालेली नव्हती.

बुधवारचा तो पराक्रम त्याच्याच अभेद्य बचावामुळे शक्य झाला. कदाचित जर्मनीला त्याचाच खूप राग आला असेल. एक जाहिरात आठवते. ‘भैया ये दिवार टूटती क्यू नही?’ जर्मन खेळाडूंनी ती बघितली नसेलही; पण त्यांच्या मनातली भावना त्यापेक्षा अजिबात वेगळी नसेल. कारण, तुलनेने अटीतटीचा सामना रंगला आणि भारताला बचावात्मक खेळ करावा लागत असताना दोन्ही संघांच्या प्रयत्नांमध्ये अभेद्य भिंत बनून उभा राहिला, त्याचे नाव श्रीजेश असेच होते.

भारतीय बचावफळी प्रत्येकदा अभेद्य राहिली, ती श्रीजेश या गोलकीपरमुळे. म्हणूनच अवघ्या संघाने त्याला विजयानंतर डोक्यावरच उचलून घेतले. गोलकीपर मैदानात धावत नाही, चेंडूचा पाठलाग करीत नाही; पण शत्रूचे हत्यार होऊन तोच चेंडू अंगावर येतो, तेव्हा त्याला रोखून निष्क्रिय करण्याची जबाबदारी एकट्या गोलकीपरवर असते. अगदी सामान्य भाषेत सांगायचे, तर गोलकिपर बालेकिल्ला राखणारा असतो आणि बाकीचा संघ किल्ल्याच्या बाहेर पडून आक्रमकपणे लढत असतो.

शत्रूच्या बालेकिल्ल्यावर हल्ला करायला जात असतो; पण डाव उलटला, तर निर्णायक जबाबदारी गोलकिपरवर असते. तिथेच सगळा खेळ फिरत असतो. त्यातच श्रीजेशने व भारतीय संघाने चमत्कार व इतिहास घडवला आहे. त्या विजयाची पताका फडकत ठेवून अधिक उत्तुंग करण्याचे स्वप्न भावी खेळाडू व पिढ्यांसमोर ठेवले आहे. म्हणूनच त्यातला अनोखा आनंद आपण अनुभवत आहोत.

Back to top button