गगनाला गवसणी

गगनाला गवसणी
Published on
Updated on

पोहोचलो बुवा एकदाचा. आता मस्तपैकी चहा पाजा. त्याशिवाय थकवा जायचा नाही.

कशाने थकलात एवढे?पत्ता शोधून शोधून.मोटारीतनं आलात ना? मग, असे पायपीट केल्यासारखा अंगभर थकवा का दाखवताय?

निम्म्या वाटेत गाडीचं जी.पी.एस. बंद पडलं. मग काय, मैलभर पुढे आणि दोन मैल मागे असा झाला प्रवास. त्यात नो एन्ट्री, डेड एंड, उजवीकडे खणून ठेवलेलं, डावीकडे वळायला बंदी, असली लाख नाटकं आपल्या रस्त्यांची. हैराण होतो चालवणारा.

त्यांच्या मदतीसाठीच जी.पी.एस. असतं ना? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम. दुनियेतल्या सगळ्या ठिकाणांकडे जाण्या-येण्याचे रस्ते, खाणाखुणा दाखवण्याची सोय.

प्रश्नच नाही. वाटेत कुठे रस्ते विचारायला नको. चुकायला नको. पूर्वी जायचो आपण तसे विचारत, विचारत. अहो काका, पंपहाऊस कुठेय? डावीकडची तिसरी गल्ली? असं चालायचं नाही आपलं?

तर काय! शिवाय 'खालच्या अंगाला जावा' 'वरला सरका' अशी उत्तरं यायची. आता मात्र जी.पी.एस. नसलं तर काय होईल, कल्पनाच करवत नाही.

का? त्याच्याऐवजी 'गगन' येईल की हाताशी पुढे-मागे. गगन?

विदेशी जी.पी.एस.चा तेवढाच भरवशाचा देशी अवतार. 'इस्रो'ने बनवलाय! 'इस्रो' म्हणजे अवकाश संशोधन वाली संस्था ना? ती आता ट्रॅफिकचं पण बघते? छे हो. पत्ता अचूक दाखवणं हे जीपीएसचं एक काम. मुळात ही सगळी यंत्रणा दिशा दाखवणारी, अंतरं सांगणारी यंत्रणा असते. म्हणजे माझ्या बायकोसाठी उपयुक्त असणार. तिला साधं डावं, उजवं सांगता येत नाही पटकन. पूर्व-पश्चिम तर दूरच राहिलं.
मी करीन ती पूर्व, हे नक्कीच कळत असेल ना तिला?

मग, बायकांना संसार करायला पुरतं बरं का एवढं ज्ञान; पण देशाला म्हणाल, तर युद्धकाळात संरक्षणासाठी अशा दणकट यंत्रणा लागतातच. आणि त्यात अमेरिका सर्वात प्रगत, नाही का?

इतकी वर्षं अमेरिका, जपान आणि युरोपमध्येच होतं हे तंत्रज्ञान; पण आता हम भी कुछ कम नही बरंका! उद्या कोणा बड्या देशाने रुबाब केला, त्यांचे सॅटेलाईट वापरायला बंदी घातली, तरी आपलं काहीही अडायला नको. आपलं हक्काचं 'गगन' आहे आपल्यासाठी.
पण, फारच गहन असेल ना त्याचं कामकाज समजणं?

एवढं अशक्य नाही समजायला. मुळात 'गगन'साठी 2008 पासून तीन उपग्रह प्रक्षेपित केलेत 'इस्रो'ने. ते जी माहिती पाठवतील ती साठवणारी केंद्रं देशभरात स्थापन केली आहेत. ती नागरिकांपर्यंत माहिती पुरवतील.

कसं का करेनात, आपली सोय होईल. नुसती आपलीच नाही, सागरी प्रवासाची, विमान प्रवासाची, मोबाईल संपर्काची, काही संशोधनाची पण सोय होणार. मुख्य म्हणजे आपलं बड्या देशांवर अवलंबून राहणं, लाचारी करणं थांबणार. आहे की नाही मोठी गोष्ट? आहे तर. इस बातपे चाय हो जाय?जरुर. नुस्ता चहाच कशाला? नाश्ताही घ्या की! इतपत तोंड भरून आपलं कौतुक आपणच करायला हवं ना?

– झटका 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news