किलबिलाट राहावा म्हणून… | पुढारी

किलबिलाट राहावा म्हणून...

एप्रिलपासून देशाच्या अनेक भागांत प्रचंड उष्म्याची लाट सुरू आहे. या उष्म्यामुळे आपण तर हैराण झालो आहोतच; परंतु सातत्याने चढत्या-उतरत्या तापमानामुळे पक्षी हैराण झाले आहेत. आपण मनात आणले, तर आसपासच्या पक्ष्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत जीवदान देऊ शकतो आणि त्यासाठी त्यांना अन्न आणि पाणी मिळावे अशी व्यवस्था करू शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत रस्त्याकडेला सार्वजनिक नळाच्या पाण्यात किंवा जिथे पाणी साचले आहे, त्यात खेळणारे पक्षी पाहिले असतील. वास्तविक, दरवर्षी वाढत चाललेल्या तापमानाने पक्ष्यांना भीषण उष्म्यापासून बचावाचे असे उपाय शिकवले आहेत. ज्या काळात शहरांच्या अवतीभवती गच्च झाडी असे, या झाडांना भरपूर फळे लगडत असत.

प्रदूषणाचे प्रमाण कमी होते त्यावेळी पक्ष्यांना कोणत्याही हंगामात अशा प्रकारच्या उपाययोजनांची गरज भासत नव्हती. त्यावेळी पक्षी एका झाडावरून दुसर्‍या झाडावर बागडताना केवळ उन्हाळा आणि थंडीपासूनच स्वतःचा बचाव करीत होते असे नव्हे, तर आपल्या किलबिलाटाने इतरांच्या मनातही आशेची पालवी निर्माण करीत होते. परंतु, आधुनिक जीवनशैली आणि विकासाच्या वादळाने केवळ माणसासमोरच नव्हे, तर या पृथ्वीवर राहणार्‍या सर्व प्राण्या-पक्ष्यांसमोर, कृमी कीटकांसमोर प्रचंड संकटे निर्माण केली. वास्तविक, विकासाच्या शर्यतीत माणसाने स्वतःच्या अस्तित्वाचीही फिकीर केली नाही आणि इतरांच्याही! याच कारणामुळे उन्हाळ्याचा प्रकोप दरवर्षी वाढत चालला आहे आणि त्याचा परिणाम मानवासह इतर सजीवांवरही होत आहे.

आग ओकणारा उन्हाळा, प्रचंड उष्मा आणि तहान यामुळे 2016-17 मध्ये चेन्नईत शेकडो पक्ष्यांचा जीव गेला होता. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही 2018-19 मध्ये अनेक पक्षी अतिरिक्त उष्म्यामुळे मरण पावले होते. आता तर दरवर्षीच उष्णतेची लाट आणि तहान यामुळे शेकडो पक्षी मरण पावल्याच्या बातम्या देशाच्या वेगवेगळ्या भागांतून ऐकायला मिळतात. परंतु, याला आपल्यापैकी अनेकजण संकट किंवा धोका मानायला तयार नाहीत.

पक्ष्यांच्या बाबतीत आपला देश एकेकाळी प्रचंड संपन्न होता. परंतु, आजकाल आपल्याकडे पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती सातत्याने लुप्त होत चालल्या आहेत. जागतिक तापमानवाढीचे संकट आटोक्यात आणले नाही, तर एक दिवस आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट केवळ आपल्या मोबाईल रिंगटोनमध्येच ऐकावा लागेल. काही वर्षांपूर्वी पक्ष्यांना अन्नाचीही एवढी टंचाई भासत नव्हती. कारण, शेतीभाती, बागबगीचे आदी ठिकाणी त्यांना अन्न उपलब्ध होत असे. त्यामुळेच जे ठिकाण त्यांना आवडेल तेथे ते स्वतःसाठी अन्न उपलब्ध करून घेत होते. परंतु, अलीकडच्या काळात मातीमध्ये आणि परिसरामध्ये कीटकांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झाली आहे. हेच पक्ष्यांचे प्रमुख अन्न होते. वास्तविक, उत्पादन वाढविण्यासाठी आणि पीक वाचविण्यासाठी सध्या पिकांवर इतक्या प्रचंड प्रमाणात कीटकनाशकांचा मारा केला जातो की, परिसर आणि मातीमधील कीटक मरून जातात. परिणामी, पक्ष्यांना आपले अन्न मिळतच नाही.

परिस्थिती बिघडत चाललेली असताना आपण भोवतालच्या थोड्या-फार पक्ष्यांचा जीव तरी छोट्या-छोट्या प्रयत्नांमधून वाचवू शकतो. तापत्या उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी आणि अन्नाच्या टंचाईचा सामना अधिक प्रमाणातच सहन करावा लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या या दिवसांत घराच्या अंगणात, बाल्कनीत, टेरेसमध्ये, छपरावर, बगिच्यात किंवा कार्यालयाच्या आसपास ज्या-ज्या ठिकाणी शक्य असेल, त्या-त्या ठिकाणी पाण्याची भांडी आपण भरून ठेवू शकतो. एखाद्या भांड्यात किंवा जमिनीवर गहू, बाजरी, तांदूळ, सूर्यफुलाच्या बिया ठेवू शकतो. यामुळे पक्ष्यांचे पोट भरू शकेल आणि त्यांची तहान भागू शकेल. जसजसे तापमान कमी होईल, पाऊस पडण्यास सुरुवात होईल, जमिनीतून हिरवे कोंब फुटतील, झाडांना फळे लागतील तेव्हा पक्ष्यांचे जीवनसुद्धा पूर्वपदावर येईल.

आपल्याकडे पक्ष्यांच्या असंख्य प्रजाती सातत्याने लुप्त होत चालल्या आहेत. जागतिक तापमानवाढीचे संकट आटोक्यात आणले नाही, तर एक दिवस पक्ष्यांचा किलबिलाट केवळ आपल्या मोबाईल रिंगटोनमध्येच ऐकावा लागेल.

– रंगनाथ कोकणे,
पर्यावरण अभ्यासक

Back to top button