

काय मामा, घेतला का तिसरा?
नाय बा!
का?
उगा डोक्याला शॉट देऊ नका हो जावई. आता आम्ही फार महत्त्वाच्या कामात गढलोय.
कुठलं एवढं महत्त्वाचं काम काढलंत?
यंदा वारीला जावं म्हणतोय. दोन वर्षं झाली वारी नाही, विठुरायाचं दर्शन नाही. तिरडी मोडली त्या कोरोनाची, इस्कोट होईल त्याचा. आता यंदा वारी होतेय म्हणताना कसं संचारलंय बघा अंगात.
ते ठीक आहे; पण त्याच्याआधी तिसरा घेतला का? त्या कोरोनाचा डोस हो. मी बजावून गेलो होतो तुम्हाला.
विसरलं म्हणा की कामाच्या रगाड्यात.
तिसरा न् विसरा करताय? मग मी देतो आठवण करून. उद्याच्या उद्या जाऊन घ्या आधी तो बूस्टर डोस.
त्याची काही गरज नाही.
हे तुम्हीच ठरवलंत? मग डोस घ्या, घ्या म्हणणारे सगळे डॉक्टर, शास्त्रज्ञ वेडेच म्हणायचे का?
मला काय करायचंय त्याच्याशी? मी काही त्या डोसच्या डोंबलावर पैसे टाकणार नाही. मागचे दोन आपले फुकटात होते, ते घेतले ना आम्ही? मग बास आता.
मागचे घेतले म्हणजे काय उपकार केलेत का? कोणावर केलेत? सरकारवर?
तसं आम्ही काही म्हणतोय का? एवढं होतं तर हा डोसपण फुकटात द्यायचा होतात. काही गटांना आहे फुकट. पोलिसांना, ज्येष्ठ नागरिकांना वगैरे! पण सगळ्यांना सरसकट मोफत देणं आता परवडणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांना फ्री का? मग होतोच आहे मी वर्षभरात वयाने ज्येष्ठ. तेव्हा घेतो हवं तर. आता आधी यंदाची वारी.
तिथे हजारो माणसं जमणार. एक आजारी असला तर अनेकांना लागण होणार.
पांडुरंगाला काळजी.
मागच्या कोरोना थैमानात नव्हती का पांडुरंगाला काळजी?
राहू द्या हो तुमचं. पैसे खर्चून जीवाला ताप करून घ्यायला जायला लावू नका म्हणजे झालं. आधी मुळी कोरोना संपलाच आहे! मास्कची सक्ती गेलीच आहे ना?
भले! म्हणजे मास्कची सक्ती काढून सरकार तुमची सोय बघायला गेलं तर तुम्ही त्या सरकारच्याच डोक्यावर बसता.
राहिलं. उतरतो डोक्यावरून खाली; पण तुम्ही सारखे लस, लस करून डोक्यात जाऊ नका बुवा. जावई माणूस म्हणून जास्त काही बोलता यीना झालंय.
बोलू नकाच. करा फक्त. घेऊन टाका तो बूस्टर. विकत घ्यावा लागला तरी घ्या. कोरोनाला एवढं हलक्यात घेऊ नका मामा. पुढे आपल्यालाच महागात पडेल.
आमच्यापेक्षा पोरांचं बघा की राव.
बघितलंय तर. 12 ते 18 वयातल्यांसाठी झालं, आता 5 ते 12 वाल्यांसाठी मान्यता दिलीये; पण मोठी माणसंच जुमानत नाहीत. तब्बल 18 जिल्ह्यांमध्ये एकाही व्यक्तीने बूस्टर डोस घेतला नाहीये .
आरोग्यमंत्र्यांचा जालना जिल्हासुद्धा त्यातच येतो. आता बोला. पुन्हा कोरोनाची लाट आली तर सरकारने काय डोकं फोडायचं?
आर् र् र् र्! एवढा गोंधळ झालाय म्हणता? मग घेतो बूस्टर कधीतरी सवडीने.
तो तर घ्याच; पण पांडुरंगालाही प्रार्थना करा, 'तिसरा न् विसरा'मधून लोकांना बाहेर काढा आणि सर्वांना डोस घ्यायची बुद्धी द्या माऊली.
– झटका