मराठी भाषेतील वैशिष्ट्ये आणि भाषेचे गुण यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे उच्चशिक्षण अभ्यासक्रमातील पुस्तकी आशय शिकण्या – शिकवण्यासाठी लागणारा वेळ प्रचंड प्रमाणात वाचेल. हा वाचलेला वेळ, प्रात्यक्षिके, औद्योगिक अनुभव, संशोधन अशा कामात कारणी लागू शकेल.
अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे उच्चशिक्षण अभ्यासक्रम मराठीतून शिकण्या-शिकवण्यासाठी जो आशय निर्माण करावा लागेल. त्या आशयात मराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत किंवा अमराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत, असे दोन पर्याय चर्चेत आहेत. यातील पहिला पर्याय हा लांबचा, थोडासा कष्टाचा, अवघड मार्ग आहे. दुसरा पर्याय सहजसाध्य, कमी कष्टाचा, सोपा वाटणारा मार्ग आहे. पहिल्या मार्गाने गेल्यास हे उच्चशिक्षण खरोखरच मराठीतून देता-घेता येईल. दुसरा मार्ग स्वीकारल्यास ते मराठीतून दिलेले घेतलेले उच्चशिक्षण नसेल तसेच भाषिक अनागोंदी वाढण्यास ते कारणीभूत ठरेल.
मराठीच काय पण कोणत्याही भाषेतील शब्दांचे मुळात अवघड शब्द आणि सोपे शब्द असे वर्गीकरण होतच नाही. शब्दांचे वर्गीकरण अगोदरपासून परिचित शब्द किंवा अपरिचित शब्द असे होऊ शकते. परिचित शब्द सोपे भासतात आणि अपरिचित शब्द अवघड भासतात. शब्दांचा उच्चार, शब्दांचे वाचन आणि लेखन या संदर्भात गुंतागुंतीच्या मुद्द्यावर शब्द अवघड किंवा सोपे ठरवता येणार नाहीत. असे असले तरी शब्दांच्या उच्चार, वाचन, लेखन या क्रियांसाठी लागणारा वेळ मात्र या संदर्भात कळीचा मुद्दा ठरू शकेल. अशा कळीच्या मुद्द्यावर मराठी शब्द वेळ वाचविण्यास अधिक उपयुक्त आहेत. मुळाक्षर आणि जोडाक्षर यांना प्रत्येकी एक अक्षर मानल्यास असे आढळते की, बहुसंख्य मराठी शब्द एक ते पाच अक्षरी आहेत, सहा अक्षरी मराठी शब्द पाचशेहून कमी असतील, सात अक्षरी मराठी शब्द शंभरहून कमी तर आठ अक्षरी किंवा त्याहून अधिक अक्षरी मराठी शब्द दहा देखील सापडत नाहीत.
मराठी शब्द अशा प्रकारे लहान असल्याने 12 वी रसायनशास्त्राच्या 565 पानांच्या इंग्लिश पुस्तकाचे मराठी रूपांतर 330 पानांचे झाले! इंग्लिश पुस्तकातील अक्षरे लहान आकाराची तर मराठी पुस्तकातील अक्षरे मोठी व टप्पोरी आहेत. सरासरी 1000 इंग्लिश शब्दांचे मराठी रूपांतर सरासरी 445 शब्दांचे होते. वरील आठ पुस्तकांच्या इंग्लिश आणि मराठी प्रती माझ्याकडे उपलब्ध आहेत.
वरीलप्रमाणे शब्द संख्येत आढळणार्या फरकाहून मोठा फरक अक्षर संख्येत आढळतो. आठ अक्षरी "Velocity' चे मराठी रूपांतर दोन अक्षरी वेग असे होते. चौदा अक्षरी "Fertilization'चे मराठी रूपांतर तीन अक्षरी 'फलन' असे होते. अक्षरांप्रमाणेच फरक इंग्लिश आणि मराठी वाक्यांत आहे. When a force is applied on a body, an acceleration is produced in that body या पंधरा शब्दांच्या आणि साठ अक्षरी अशा रोमन लिपीतील इंग्लिश वाक्याचे मराठी रूपांतर 'वस्तूवर बल लावल्याने तिच्यात त्वरण निर्माण होते' या सात शब्दांच्या आणि एकवीस अक्षरी देवनागरी लिपीतील मराठी वाक्यात होते.
इंग्लिशमध्ये सक्तीने वापरावे लागणारे a, an, the, of, at, in, on सारखे शब्द मराठीत विभक्ती प्रत्यय पद्धत असल्याने सुट्या स्वरूपात वापरावे लागत नाहीत. 99 टक्केहून अधिक मराठी वाक्ये त्यांच्या संगत (corresponding) इंग्लिश वाक्यांच्या तुलनेने निम्म्याहून कमी लांबीची असतात. लेखन, टंकलेखन आणि संगणक स्मृती या तीनही बाबतीत मराठी आशय त्याच्या संगत इंग्लिश आशयापेक्षा कमी जागा व्यापतो. कागद, शाई, ऊर्जा बचतीसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी हे फार महत्त्वाचे आहे.
या फरकामुळेच एकाच परीक्षा मंडळाशी जोडलेल्या समान अभ्यासक्रम व समान आशयाची पाठ्यपुस्तके शिकवण्यासाठी मराठी माध्यम शाळांना रोज साडेचार तास शाळा भरवूनही वर्षाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी एक महिना पूर्ण करता येतो तर इंग्लिश माध्यम शाळांना तोच अभ्यासक्रम त्याच आशयासह शिकवायला रोज सहा ते आठ तास शाळा भरवूनही शैक्षणिक वर्ष संपले तरी पूर्ण करता येत नाही.
याचा अर्थ असा की, देवनागरी लिपीतील मराठी तांत्रिक शब्द अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे उच्चशिक्षण अभ्यासक्रम शिकण्या – शिकवण्यासाठीच्या आशयात वापरल्यास उच्चार, वाचन यांचा वेग रोमन लिपीतील इंग्लिश आशयाचा उच्चार व त्याचे वाचन या तुलनेत किमान साडेचार पट होईल, तर लेखनाचा तसेच टंकलेखनाचा वेग किमान अडीच पट होईल. या सर्वांचा विचार करता अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे उच्चशिक्षण अभ्यासक्रमातील पुस्तकी आशय शिकण्या – शिकवण्यासाठी लागणारा वेळ मराठी भाषेतील वरील गुणांमुळे प्रचंड प्रमाणात वाचेल. हा वाचलेला वेळ, प्रात्यक्षिके, औद्योगिक अनुभव, संशोधन अशा कामात कारणी लागू शकेल. मराठीला ज्ञानभाषा म्हणतात याचे कारण मराठीचे वरील गुणच आहेत.