चोरीचा मामला

चोरीचा मामला
Published on
Updated on

अरे, आबुराव? आज अवेळी इथे?
आलोवतो जरा कामाला. काम झालं, तुम्ही भेटलात, चला, जरा बसस्टॉपवर गप्पा मारत बसूया सावलीत.
स्टॉपवर? बसूया. सावलीत? शक्य नाही.
का हो?

त्या आपल्या नेहमीच्या बसस्टॉपची शेड चोरीला नाही का गेली?
काही तरी काय सांगता? एवढी मोठी लोखंडी शेड चोरीला कशी जाईल?
गेलीये. येऊन बघा तिकडे.
दुरुस्तीसाठी काढून नेली असेल हो खात्याने.

खात्यानेच नेली असणार, यात शंका नाही; पण तुम्हाला वाटत्ये तशी सरकारी खात्याने नव्हे, चोरून खाणार्‍या खात्याने.
कबूल आहे. शेडला हात घातल्यावर इशार्‍यासाठी वाजायला अलार्म नसणार, कुलूपबंदीही नसणार; पण शेडचोराला काय, शेड उपटून नेता येणार आहे? का घडी करून खिशात कोंबून नेता येणार आहे?
ते त्याच्या खिशाच्या आकारावरून ठरेल. खिसे म्हणून पोतीच शिवली असली शर्टाला, तर?
ते सोडा. बिहारमध्ये जुने लोखंडी पूल चोरीला जातात खुशाल, त्याचं काय?
आज काय माझ्या फिरक्या घ्यायचंच ठरवून आलात की काय?

नाही हो. परवाचीच गोष्ट नाही का? पाच की सात एप्रिलची? बिहारमधल्या सासारामजवळ अमियावर नावाच्या एका खेड्यात भरभक्कम 500 टन वजनाचा लोखंडी पूल होता. जुना म्हणजे पार जुना. गेला की चोरीला!
पूल कसा जाईल? त्याला काय पाय आहेत का चाकं? काही तरी भुताटकी असेल हो! बिहारमध्ये फार आहेत तसले प्रकार.
छे! छे! तसल्या अंधारातल्या गोष्टी नव्हत्या या. दोन दिवस जेसीबी आणून, गॅस कटर्स वापरून शिस्तीत कापून, बांधून नेला सगळा माल चोरट्यांनी!

बरं, एवढा उद्योग करताना खबरदारी काय घेतली? तर, आपण या ड्युटीवर नेमलेले सरकारी कर्मचारी आहोत, असं भासवलं. काय आयडियाची कल्पना लढवलीये ना?
सगळा ऐवज नाहीसा झाल्यावर सरकारला जाग आली. शिक्षा करून काय करणार? दोन इंजिनिअरांना सस्पेंड केलं. पूल गेला तो गेलाच.
एवढ्यातल्या एवढ्यात पुण्यात जी. टी. एल. कंपनीचे दोन मोबाईल टॉवर पण चोरीला गेल्याचं वाचलं. ते काय होतं हो?
असणार असेच काही तरी उद्योग. मागे झेड. पी.च्या विहिरीपण अशाच चोरीला गेलेल्या, खुद्द आपल्या महाराष्ट्रातून.
बाबो, पाणी चोरण्याचे प्रकार खूप ऐकल्येत. नळ तर चोरण्यासाठीच असतात; पण डायरेक्ट विहिरीच चोरायच्या म्हणजे अगदी डोक्यावरून पाणीच गेलं म्हणा की!

बाकी चंदनचोरी, वाळूचोरी, मीटर चोरी, वीजचोरी यांचं तर आता आपल्याला काही वाटेनासं झालंय; पण चोरीशास्त्राची ही एवढी प्रगती जाणवली नव्हती यापूर्वी.
प्रगती? की अधोगती? एक मात्र नेहमीच असतं, 'सापडला तो चोर, नाही तो शिरजोर' आणि आपल्याकडल्या चोर्‍यांमध्ये कोणीच कधीच सापडत नसतो. हातांची लंबेलांब साखळीच असते कोणत्याही चोरीत.

जेवढी चोरी मोठी तेवढे मागचे हात जास्त. त्यामुळे असले चोरीचे मामले असेच बहरत राहणार. चला, बसस्टॉपवर, उन्हात तर उन्हात, बाकावर बसू तरी!
हां, बाक शिल्लक असलं तर बसू! चोरीच्या मामल्यात कुठवर काय जाईल, हे काय सांगता येतं?
– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news