वाचन संस्कार रुजवण्यासाठी… | पुढारी

वाचन संस्कार रुजवण्यासाठी...

संगणक, दूरचित्रवाणी, सिनेमा, इंटरनेट, रेडिओ यांचे आक्रमण तीव्र होत जाणार असले, तरी त्यांच्याशी जुळवून घेत पुस्तकांच्या संगतीला दुसरा पूर्ण पर्याय होऊ शकणार नाही.

वाचनाने माणूस प्रगल्भ होतो. अलीकडील काळात वाचनसंस्कृती लोप पावत आहे, असा सूर सातत्याने ऐकायला येतो; परंतु माझ्या मते वाचनसंस्कृती कमी होत नसून वाचकांची अभिरुची बदलत चालली आहे. जीवघेण्या धावपळीच्या स्पर्धेत अन्न वस्त्र, निवारा या गरजांपेक्षाही आज ज्ञान आणि ज्ञानाचे भांडार असलेल्या खजिन्याचे पुस्तकाचे महत्त्व कमी झालेले नाही. आज पुस्तकांवर पर्यायी विभागाचे अतिक्रमण होत असले, तरी वाचनस्रोताला ते पूर्ण पर्याय होऊ शकत नाहीत. आजचे जग माहितीच्या ज्ञानाचे आहे. त्यामुळे ज्ञान हीच संपत्ती ही स्थिती सर्वदूर प्रस्थापित होत आहे. या ज्ञानाच्या विविध प्रवाहांच्या स्रोतांपैकी पुस्तक हा एक भाग आहेच. संगणक, दूरचित्रवाणी, सिनेमा, इंटरनेट, रेडिओ ही सगळी साधने सर्व अंगांने अंगावर येत आहेत. त्यांचे आक्रमण येत्या काळात आणखी तीव्र होत जाणार असले, तरी त्यांच्याशी जुळवून घेत पुस्तकांच्या संगतीला दुसरा पूर्ण पर्याय होऊ शकणार नाही. मात्र, याकरिता पुस्तकांना बदलत्या अभिरुचीची चाहूल ओळखावी लागणार आहे.

चांगले साहित्य कोणते, असे विचारले, तर ते तुम्हाला थकविते, अस्वस्थ्य करते आणि शेवटी आनंदही देऊन जाते. वाचकांना हलवित, झुलवित, छळीत शेवटी प्रसन्नतेचा शिडकावा करत ते कुठे तरी आतमध्ये शहाणपणाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम करत असते. आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या काळात अशा पुस्तकांच्या शोधात असलेले वाचक या नव्या बदलाच्या लेखनाच्या मागे आहेत. या वाचकांची बदलती अभिरुची वाढविण्यासाठी अनुभवसंपन्न लेखनही मिळत गेले पाहिजे.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला. वाचनामुळेबालमनावर संस्कार होताना विचारांना चालना मिळावी, यासाठी वाचनाची प्रेरणा निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. आज बालसाहित्य या प्रकाराकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नाही. हा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. सुसंस्कृतपणा वाढण्यास मदत करणार्‍या अनेक प्रवाहांपैकी लेखन, वाचन हा एक मार्ग आहे. यातून बालमनावर चिरंतन संस्कार घडत असतो. नव्या ज्ञान-तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आपली एकविसाव्या शतकातील वाटचाल सुरू झाली असली, तरी वाचनाचे महत्त्व कधीही कमी होत नाही, संपत तर नाहीच. जीवनातील विविध क्षेत्रे, ज्ञानाची कवाडे किलकिली करण्यास वाचनाचीच मदत होत असते. बालकांच्या जीवनात वाचन संस्काराचे महत्त्व त्यामुळेच टिकून राहणार आहे. बालकांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी सकस आहाराची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भावनिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी उत्तम संस्कारांची आवश्यकता असते. हा संस्कार कुटुंब, परिसर आणि उत्तम वाचनातून होत असतो.

आताच्या मुलांची वाचन क्षमता आणि लेखन क्षमता धोक्याच्या पातळीपर्यंत घटली आहे. मुलांना वाचन-लेखनाकडे वळवण्यासाठी आजचे बालसाहित्य पुरेसे होत नाही. अशा परिस्थितीत इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात नव्या उमेदीने मुलांचे मानसशास्त्र जाणून त्यांना आकर्षित करणारे साहित्य निर्माण करण्याची कामगिरी लेखकांना करायची आहे. त्यांना आवडतील असे नवे नायक शोधले पाहिजेत. आपण जे बालसाहित्य लिहितो, ते मुलांना कितपत आवडेल, याचा विचार सर्व लेखकांना करावा लागणार आहे. आजचे जे सर्वसामान्यांचे जगण्याचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यांनाही बालसाहित्याने स्पर्श केला पाहिजे. ज्ञानाची कास धरून विज्ञानाने प्रयोगशीलता कशी वाढीस लागेल, हाही विचार लेखकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या संगतीने करावा लागणार आहे. हे सारे होत असताना माणसातील माणूसपण हरवून जाणार नाही, माणसातील करुणा बधिर होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. हे सगळे जबाबदारीचे आहे. त्यासाठी तरुण लेखकांनी कंबर कसून जबाबदारीने लेखन केले पाहिजे.

– बाबा भांड, ज्येष्ठ साहित्यिक

Back to top button