छोटासा झटका भी जोरसे लगे! | पुढारी

छोटासा झटका भी जोरसे लगे!

अहो, पंखा बंद काय केलायत? इथे उकडून उकडून जीव जातोय!
मान्य आहे; पण असे रात्रंदिवस फुल्ल पंखे चालवले तर अचाट वीज बिलाच्या धक्क्याने मरू पुढे-मागे. आता तूच ठरव, याने मरायचं की त्याने!

तुम्ही अतीच करता बाई! महाराष्ट्र भारनियमनमुक्त होणार, असं ऐकायला मिळतंय बातम्यांमध्ये.
वीज स्वस्त केल्याचंही ऐकलं असशील. दरात केली होती किंचितशी कपात; पण ती म्हणजे एकादशीच्या घरी शिवरात्र पाहुणी गेल्याची अवस्था.

आधीच उन्हाळ्याने माझं डोकं उठलंय. नाही तिथे नाही त्या म्हणी वापरून पुरतं फिरवून टाकू नका ते! खरं म्हणजे आपण घरी एअरकंडिशनर घ्यायला हवाय.

संबंधित बातम्या

बापरे! किती वाढीव वीज बिल येईल, या कल्पनेनेच घाम फुटलाय मला! दोन महिन्यांत विजेची मोठी दरवाढ होण्याची चिन्हं आहेत.
मुळात आता तरी कुठे स्वस्त आहे वीज? फक्त वॉचमनच्या खोलीला तेवढी स्वस्त आहे वाटतं?
त्याला मुद्दाम वीज स्वस्त देण्याइतकं काही वीजमंडळ उदारबिदार नाहीये. त्याचं घर एका खोलीचं, विजेचा वापरच कमी, म्हणजे महिन्याला 200 युनिटपेक्षाही कमी, म्हणून त्याला एका युनिटला साडेसात रुपये, सध्याचा सर्वात स्वस्त दर दिलाय; पण लवकरच हाही वाढणार.

आणि आपल्याला वीज केवढ्याला पडते?

ते तर विचारूच नकोस. साडेसात ते साडेतेरा रुपये प्रतियुनिट असे वेगवेगळे दर आहेत वेगवेगळ्या गटांना.
कमालच आहे. बाकी बहुतेक गोष्टी, मोठ्या प्रमाणावर खरीदल्या की स्वस्त मिळतात, व्होलसेल रेटमध्ये. मग, वीज तेवढी जास्त वापरणार्‍यांना महाग कशी?

वीज हा माल नाहीये, सेवा आहे म्हणून. बाकी वीजसेवा ही सर्वात बेभरवशी झालीये.
नाही तर काय? परवा मी घाम गाळून, धान्यं भाजून, भाजणी दळायला नेली, तर निम्मी दळून होतेय तेवढ्यात वीज गेली. वैताग सगळा!
तुला पीठाची चिंता वाटतेय; पण विजेच्या खेळखंडोब्याने ऐन परीक्षा सीझनमध्ये गावांमध्ये मुलांचे अभ्यास होत नाहीहेत. कृषिपंप बंद पडल्याने शेतांचं नुकसान होतंय. हॉस्पिटलांमधली जीवरक्षक यंत्रं नीट वापरता येत नाहीहेत.
एकीकडे रोज विजेवरची नवीनवी यंत्रं शोधून, बाजारात विकायला आणून त्यांची सवय लावता आणि दुसरीकडे वीज द्यायला खळखळ करता. अजबच आहे सगळा प्रकार.

हंऽऽ विजेचं व्यवस्थापन राज्याला हवं तेवढं नीट जमलं नाहीये खरं!
मग कृषिपंपांना वीजजोडणी, शेतकर्‍यांना वीजमाफी अशा बातम्या येतात त्या कशा?
मध्येमध्ये असा माफक औदार्याचा झटका दाखवावा लागतो; पण फार दूरवरचा विचार नसतो त्यामागे! एखाद वेळेस तू नाही का अचानक माझ्या आईबद्दल चांगलं बोलत? येतो तुलाही चांगुलपणाचा झटका.
माझ्यावर घसरवू नका हं विजेचा मुद्दा! आज जेवणात एखादा पदार्थ कचकचीत खारट किंवा जहाल तिखट करून मी दणका देऊच शकते तुम्हाला.

प्रश्नच नाही. छोटा झटकाही जोराने बसवू शकण्याची किती पॉवर तुझ्यात आहे, हे काय मला माहीत नाही? त्यापेक्षा आपण आपली प्रार्थनाच करूया की, राज्यातल्या विजेचं नियोजन चांगलं होवो!

– झटका

Back to top button