मी मोठेपणी मध्यमवर्गीय होणार! | पुढारी

मी मोठेपणी मध्यमवर्गीय होणार!

का हो आबुराव? उदास वाटताय!
दोन-तीन दिवस हाच विचार मला छळतोय, आपल्याला लहानपणापासून नीट शिकवलं गेलं नाही.
काय नीट शिकवलं नाही?

जीवनध्येय हो. आठवतंय? आपल्याला नेहमी एक प्रश्न विचारला जायचा की, तुम्ही मोठेपणी कोण होणार?
बरोबर! निबंधाला, वक्तृत्वाला, परीक्षेत, पाहुण्यांसमोर, केव्हाही हेच तर विचारायचे आपल्याला. पोरा हो, तुम्ही मोठेपणी कोण होणार?
आणि आपण काय उत्तर द्यायचो? डॉक्टर नाही तर इंजिनिअर होणार. लगेच सगळे टाळ्या वाजवायचे.
म्हणजे बघा, आधी पाचधा वर्षं शिक शिक शिकायचं. पुस्तकं, गायडं, क्लासेस यांच्यावर बापाचा घामाचा पैसा घालवायचा आणि एवढं करून पुढे हजारो डॉक्टर, इंजिनिअरांच्या रांगेत टाचा घासत फिरायचं. कसले भिकेचे डोहाळे होते हो हे?
मग, यापेक्षा वेगळं काय शिकवायला हवं होतं?

या सगळ्या उपद्व्यापापेक्षा एका शब्दात महत्त्वाकांक्षा संपवता आली नसती? मुलांना नुसतं सांगायचं, ‘केव्हाही म्हणा, मी मोठेपणी मध्यमवर्गीय होणार!’
हे वेगळं म्हणायला कशाला हवंय? आपण तर असतोच की जन्मजात मध्यमवर्गीय.
तसलं मध्यमवर्गीय नकोय व्हायला. संजय राऊतांसारखं मध्यमवर्गीय होण्याची महत्त्वाकांक्षा प्रत्येकाने धरायला हवी.
ते? ते ई.डी.च्या कारवाईने हैराण आहेत.
ते कशानेही हैराण होत नाहीत. ते दुसर्‍यांना हैराण करतात. आताच बघाना. मुळात कुठल्या त्या पत्राचाळीच्या हजार कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी ही कारवाई चाललीये.
हजार कोटी म्हणजे एकावर किती शून्य असतात हो?

कंटाळा येईपर्यंत शून्य काढत राहिलात की होतील हजार कोटी. ठीक आहे? हैराणीमागच्या मुद्द्याचा पॉईंट बघा बाबुराव. या संशयावरून ईडीने टाच आणलेली मालमत्ता आठवा, पालघरमधली जमीन, दादरचा आठ-धा कोटींचा फ्लॅट, किहीममधले प्रत्येकी दोन कोटी रुपयांचे भूखंड. तेपण एक-दोन नाही, आठ! कल्पना करा, आठ-आठ भूखंड. एवढी एकाची मालमत्ता? एका आयुष्यातली?
दुसर्‍याच्या पैशावर कधी जळू नये आबुराव. लक्ष्मी चंचल असते. कोणाला मिळते, कोणाला मिळत नाही.
मिळते तर मिळते; पण कशी मिळते? तर म्हणे, जीवतोड मेहनत करून, निढळाचा घाम गाळून! बाबो, किती क्युसेक घाम गाळावा लागला असेल हो एखाद्याला एवढा ऐवज गिळताना, सॉरी, मिळतांना?

हो ना. तरी ते सारखे बोलताहेत, भ्रष्टाचाराच्या रूपाने एक रुपया आल्याचं सिद्ध झालं, तर सगळी संपत्ती भाजपला देऊन टाकू म्हणून.
बोलण्याचं काही विशेष नाही हो! राजकीय हेतू, दबावतंत्र, मराठी लोकांवर डूख अस काय काय बोलतात ते.
मी तेवढं पुढे ऐकायला जातच नाही. आपण त्यांच्या मध्यमवर्गीयपणावर फिदा आहोत, बस्स! साधा मराठी मध्यमवर्गीय असण्यामुळे एवढं घबाड मिळणार असेल, तर घराघरातल्या पोरांना इथून पुढे हेच शिकवावं. कोणी इतर काही फालतू शिकायबिकायची गरज नाही. तसली हमालीची स्वप्नं पाहिलीत तर याद राखा. सर्व पोरांनी एकच स्वप्न बघायचं. एकच उत्तर द्यायचं. मी मोठेपणी कोण होणार? मी मध्यमवर्गीय होणार.

चला, आता जाऊ तिथे हेच सांगू, हेच बोधवाक्य फळ्याफळ्यावर लिहू. मी मोठेपणी फक्त मध्यमवर्गीय होणार! एकदा तसा झालो की, माझे सर्व वर्गातले सर्व प्रश्न सुटणार!

– झटका

Back to top button