ब्लड रिपोर्ट : प्लास्टिक पॉझिटिव्ह! | पुढारी

ब्लड रिपोर्ट : प्लास्टिक पॉझिटिव्ह!

डॉक्टर, माझं रक्त तपासलंत? काय आला रिपोर्ट?
फारसा बरा नाही आला.तुमचं रक्त शुद्ध नाहीये.
काय सांगता डॉक्टर? अहौ, गेल्या सात पिढ्यांमध्ये खानदानी आहोत आम्ही. सगळी लग्नं पत्रिका बघून, ठरवून, उच्च कुळामध्ये होतात बरं आमच्यात.
रक्तात फारच अशुद्धता मिसळलीये तुमच्या! चक्क प्लास्टिकचे कण सापडल्येत.
छे छे! मी हात धुतल्याशिवाय काही खात नाही. शक्यतो हातानेही काही खात नाही. चमचेच वापरतो.
देशात सगळीकडेच चमचे फार माजल्येत.
देशाचं सोडा, रक्ताचं सांगा. पॅथ रिपोर्ट काय आहे?
पॅथेटिक आहे.
मी चमच्याने खातो, बाटलीतलं पाणी पितो, तरीही?
चमचे कसले वापरता?
प्लास्टिकचे.
पाण्याच्या बाटल्या?
प्लास्टिकच्या.
हे सगळं प्लास्टिकच्या पिशवीतून नेत असाल ना?
प्रश्नच नाही. त्या कापडी पिशव्या, धातूच्या बाटल्या, भरा, धुवा, पुन्हा पुन्हा वापरा, त्यांना शंभर लोकांचे हात लागणार, सांगितलंय कुणी?
पण, त्याऐवजी सगळं ब्रह्मांड प्लास्टिकमय करा, असं तरी कोणी सांगितलंय का?
बस्का डॉक्टर! बाहेर प्लास्टिकचा वापर बोकाळलाय याचा जाब मला विचारणार का आता? तरी बरं, मी इतका स्वच्छताप्रेमी आहे. मुलाच्या खेळण्यातल्या पोपट-चिमण्याही आठवड्यात एखाददा धुऊन, उन्हात वाळवून ठेवतो. त्या बेट्याला खेळणी तोंडात घालायची सवय आहे ना?
केवढा आहे तो?
सव्वा वर्षाचा.
तरी आतापासूनच दिसेल ते गिळायला बघतोय? भविष्य उज्ज्वल आहे त्याचं.
मग? मुलगा कोणाचा आहे? एकसे एक इंपोर्टेड खेळणी आणतो मी त्याच्यासाठी!
ती पण प्लास्टिकचीच असणार, नाही का?
ऑफकोर्स. ती वजनाला हलकी आणि दिसायला मस्तपैकी रंगीत-संगीत असतात. मुलं पटकन उचलतात.
आणि तोंडात घालतात. अशानेच माणसाच्या रक्तात प्लास्टिक जायला लागतं हो.
रक्तातच येतंय ना? मग ठीक आहे. आपल्याकडे गायींच्या, डुकरांच्या पोटातून किलो-किलो प्लास्टिक पिशव्या बाहेर काढतात. त्यापेक्षा हे जरा तरी परवडलं.
कोण म्हणतं असं?
असाच आपला एक अंदाज.
चुकीचा आहे तो. हे जे मायक्रो किंवा नॅनो प्लास्टिक कण रक्तात सापडताहेत हे भयंकर ठरणार आहेत पुढे.
नाही नाही. मुलगा खेळणी डायरेक खात नाही काही. फक्त चोखतो, चघळतो.
त्यातूनच जातात काही अतिसूक्ष्म कण पोटात. आपण बघा. दूध, तेल, आइस्क्रीम हे सगळं प्लास्टिकच्या पिशव्यातून, कपांमधून घरी आणतो. प्लास्टिकमधूनच ते थंड किंवा गरम करतो. बाकी बशा, चमचे, सुर्‍या, कात्र्या हे प्लास्टिकचंच वापरतो खाताना. रात्रंदिवस कानाशी प्लास्टिक कव्हरातला फोन धरतो. पेनं, छत्र्या, रेनकोट, डबे, बाटल्या, बूट-चपला या प्रत्येकात एक ना एक प्रकारचं प्लास्टिकच वापरतो. एवढं सर्वव्यापी प्लास्टिक शरीरात गेल्याशिवाय राहील का?
म्हणून काय त्याची सोय गमावायची?
सोय असावी, सोस नसावा. तिकडे अ‍ॅमस्टरडॅममधल्या एका विद्यापीठाने याचाच अभ्यास सुरू केलाय. माणसाच्या रक्तात एवढं प्लास्टिक सापडण्याचे गंभीर परिणाम होणार म्हणताहेत ते. त्यावरून तरी धडा घ्या. अगदी आवश्यक असेल तेव्हाच प्लास्टिक वापरा. प्लास्टिक कितीही रंगीबेरंगी असलं, तरी रक्त लालचुटुकच हवं की नाही राहायला?

झटका

संबंधित बातम्या
Back to top button