सर्व्हरला घरघर, टोलचा झोल | पुढारी

सर्व्हरला घरघर, टोलचा झोल

आता लवकरच सुट्ट्या सुरू होणार. मग, प्रवासाचे, भटकंतीचे काही प्लॅन करताय की नाही?
बघू काय जमतंय ते.
आता काहीही जमवणं सोपंय. घरबसल्या ऑनलाईन बुकिंग करायची, नाही तर सरळ गाडी काढून सुटायचं.
दोन्हीही अवघड होत चाललंय. काहीही ऑनलाईन करावं, तर कधी कुठला सर्व्हर डाऊन होईल सांगता येत नाही. रेल्वे बुकिंग असो, नाही तर महसूल भरण्याची झटापट. महसुलाची सगळी कामं सर्व्हर डाऊनमुळे कशी लटकलीयेत बघताय ना? एक दस्त वेळेवर पुढे सरकेना झालाय!

आता कुठेही लाखो यूजर्स एकदम लॉगिन व्हायला निघाले, तर तसं होणारच ना?
भले! मग, तेवढ्या क्षमतेचे सर्व्हर आधीच बसवायला नको? दिवसचे दिवस रखडून एकेक साईट उघडेना झाल्यावर, प्रत्येक सर्व्हरला घरघर लागल्यावर लोकांनी काय करावं?

मग, आपण आपापल्या गाड्या काढून सरकावं की पुढे. आता लगेच पेट्रोलच्या महागाईचं रडगाणं लावू नका हं!
नाही लावत. शेवटी पेट्रोलचा दर हा आंतरराष्ट्रीय मामला आहे; पण त्या टोलच्या झोलचं काय करावं माणसानं?
असेल तो टोल भरावा.
आणि त्यात मनमानी असेल तर?
वाटत्ये का तशी मनमानी?
आता तुम्हीच बघा म्हणजे झालं. सगळं टोल वसुली करणार्‍या कंपन्यांच्या मर्जीवर चाललेलं! ती महामार्ग प्राधिकरणं की काय आहेत, ती तरी आपलीच ना?

संबंधित बातम्या

हा काय प्रश्न झाला? आपल्या हितासाठी बनलेली.
मग, ती रस्त्यावर प्रवाशांचे खिसे कापायला बसल्यासारखी कामं का करतात? पूर्वी रस्त्यांवर राजरोस दरोडेखोर तरी असायचे. मस्तपैकी सुरेबिरे दाखवून लुटायचे. आता डाके घालायचे नाके केलेत. टोल नाके म्हणतात त्यांना!
रस्त्यांची कामं तुम्हालाच चोख हवी ना लेको?
हवीतच.

करोडो रुपये खर्चून कामं सुरू केली ती काय उगाच?
पण, मग कामं पूर्ण झाल्यावर टोल वसुली करा. कामं चालू असताना, अर्धवट असताना टोल घेतला असलात, तर परत करा!
तुम्ही काय खेड शिवापूर संघर्ष समितीचे मेंबर झालायेत की काय?
नाय बा. माझ्याकडे एम.एच. बारा किंवा चौदा पासिंगची गाडी पण नाहीये. तेव्हा मागे पुणे-सातारा रस्त्यावर रद्द केलेला आमचा टोल का सुरू केला, असं मी म्हणायचा प्रश्न येत नाही.
अच्छा! म्हणजे मुंबई-पुणे अपडाऊनवाले का तुम्ही? एक्स्प्रेस वे वर रिटर्न टोलची सुविधा नाही म्हणून कुरकुरणारे? रिटर्न टोल बर्‍यापैकी स्वस्त पडत असेल नाही?

असणारच. पण, ते सोडलं तरी पण कधीही प्रवासाला गेलं की, टोल खर्चाचा चिमटा बसायचा तो बसतोच ना! जलद पोहोचून पेट्रोलचे पैसे वाचवायचे ते टोलवर घालायचे, असंच चालतं ना शेवटी!
अहो, जग कुठल्याकुठे चाललंय! एकेक नमुनेदार रस्ते बनवतंय. त्या सोयी फुकटात कशा हो मिळतील?
फुकटात कोण मागतंय? पण, नियमवार तरी करावी टोलबाजी. नाही तर टोल वसुली कंपन्या गब्बर होताहेत आणि टोल भरणारे गाड्या रस्त्यावर आणतांना दहादा विचार करताहेत, असं व्हायचं!

– झटका

Back to top button