

एवढ्या घाईने कुठे निघालात? सिनेमाला वाटतं?
नाही हो, वाचनालयात!
आज अचानक तिकडचा फेरा? एवढ्या उत्साहात?
खूप दिवसांनंतर आज तिथे नवी पुस्तकं येणारेत. नवं पुस्तक हातात घेऊन कुरवाळायला फार बरं वाटतं हो मला.
असेल, पण त्यासाठी एवढं रुमालाने नाक-तोंड गुंडाळून का जाताय?
वाचनालयामधली पुस्तकांची शेल्फं धुळीने भरलीयेत ना, पुस्तकं शोधतांना ती धूळ फारच नाका-तोंडात जाते.
पुस्तकांची शेल्फं का धुळीने भरलेली?
काय करणार? ग्रंथालय कर्मचारी पुरेसे नाहीयेत.
का बुवा?
मुळात ग्रंथालय कर्मचार्यांचे पगार थोडे. तेही अनेकांचे थकल्येत दोन-दोन वर्षांचे. काहींनी दुसरीकडे मिळतील ती कामं घेतलीयेत पोटासाठी. काही नाइलाजाने गावी गेल्येत. किती झालं तरी पुस्तकाची पानं जेवणाच्या पानावर वाढता येतात का? कोरोनामुळे दीड-दोन वर्षं वाचनालयं बंदच होती. जी कशीबशी चालू ठेवली होती, तिथे नवी पुस्तकं येत नव्हती. पार अनास्था चाललीये हो ग्रंथालयांची!
आताच्या ताज्या अर्थसंकल्पात तरी मिळालं असेल ना आर्थिक पाठबळ?
कुठलं आलंय? हा एक अर्थसंकल्प राहू दे. गेल्या नऊ वर्षांमध्ये ग्रंथालय अनुदान वाढवलंच नाहीयेे.
काय सांगता?
वाढवणं विसरा, उलट कोरोना काळात अंदाजपत्रकातलं अनुदान कमीच केलं सरकारने.
नाइलाज असणार हो. कोरोनाने इतर खर्चांचा बोजा फार वाढला असणार सरकारवरचा!
म्हणून काय वाचनालयांचा बळी द्यायचा? पुस्तकं संपावर जात नाहीत, आंदोलन करत नाहीत म्हणून त्यांच्याकडे सारखं दुर्लक्ष करायचं का?
तुम्ही अगदी हा जीवन-मरणाचा प्रश्न असल्यासारखं पोटतिडिकीने बोलताय.
आहेच की हा प्रश्न कोणाच्यातरी जीवनमरणाचा. राज्यात साडेबारा हजार सार्वजनिक वाचनालयं सरकारी अनुदान घेतात. त्यांच्यात सुमारे एकवीस हजार कर्मचारी आहेत. त्यांनी कुठे जावं सांगा बरं?
मागणी करावी सरकारकडे.
केली खूपदा. अनुदान दुप्पट करा, वर्षाचे अडीचशे कोटी करा, असा लकडा लावला; पण लक्षात कोण घेतो?
असं झालंय का सगळं? माझं बरंय, पूर्वी क्रमिक पुस्तकं वाचली थोडी. आता फक्त एकच पुस्तक वाचतो.
अरे वा! कोणचं पुस्तक? एवढं पुन्हा-पुन्हा वाचता ते?
बँकेचं. जग बँकेच्या पुस्तकावरच चालतं ना शेवटी?
असेल; पण त्यात गोळा केलेले पैसे वापरून छान जगावं कसं हे आपल्याला कोण सांगतं?
खरंच! कोण सांगतं?
अहो, वाचनालयांमधली पुस्तकं. कथा, कादंबर्या, कविता, प्रवास वर्णनं, चरित्र! वाचाल तेवढं कमी आहे.
होय काय? एवढा टायम कुठून काढणार हौ? पोटापाण्याचा झमेला काय थोडा आहे?
त्याचाच ताण पुस्तकं कमी करतात बघा. मी तर प्रार्थना करतोय, वाचनालयांवर सरकारची कृपा होऊ दे! आम्हाला पूर्वीसारखं भरघोस वाचायला मिळू दे! तेव्हाच कोरोना खराखुरा गेला असं वाटेल आम्हाला.
असं म्हणता? असं तर असं!
तुम्हालाही असंच वाटेल. फक्त तुम्ही ठरवायला हवं. पुस्तकं वाचून जगायचं की पुस्तकावाचून? एकदा पुस्तकांची चटक लागली की, जन्माचे अडकताय की नाही, बघाच!
लवंगी मिरची