‘एमआयएम’चा फुगा

‘एमआयएम’चा फुगा

महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएम या पक्षाभोवती राजकीय चर्चा फिरत राहावी, एवढी या पक्षाची ताकदही नाही आणि तेवढे जनसमर्थनही या पक्षाला नाही. परंतु; प्रमुख राजकीय पक्षांनाच एमआयएमभोवती राजकीय चर्चा फिरण्यात आपले हित दिसत असल्यामुळे या चर्चेमध्ये हवा भरण्यात येत आहे. परिणामी एमआयएमचा फुगा महाराष्ट्राच्या राजकीय अवकाशात असा काही फिरत आहे की, जणू महाराष्ट्राच्या सत्तेचा फैसला या पक्षाच्या हातात आहे! कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर एमआयएम पक्षाची चर्चा होत असते.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने समाजवादी पक्ष आणि काँग्रेसला जे नुकसान पोहोचवले, पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत केली, त्या पार्श्वभूमीवर या चर्चेने उचल खाल्ली आहे. एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या खासगी भेटीसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे गेले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेससमोर त्यांनी आघाडीसाठी प्रस्ताव ठेवल्याचे समोर आले आणि त्यानंतर राजकीय पतंगबाजी सुरू झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीचा प्रस्ताव फेटाळला आहे. एमआयएम ही भाजपची 'बी टीम' असून, त्यांनी भाजपविरोधी असल्याचे सिद्ध करून दाखवावे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून देण्यात आली. काँग्रेसच्या अशा प्रतिक्रियेमुळे तो पक्ष एमआयएमला सोबत घेण्यास तयार असल्याचा संदेश गेला. शिवसेनेने मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही युतीचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला. मात्र, एकूण एमआयएम पक्षाचे राजकीय चारित्र्य लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने या सगळ्या प्रकारावरून आघाडीला आणि विशेषतः शिवसेनेला खिंडीत गाठणे स्वाभाविक होते आणि त्यांनी ते गाठलेही.

आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेना भाजपच्या टार्गेटवर आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडून हिंदुविरोधी पक्षांशी आघाडी केल्याची टीका केली जाते. हिंदुत्वाशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचे प्रयत्न भाजपचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेते करतात. अशा स्थितीत एमआयएमशी आघाडीची चर्चा हवेतली असली तरी भारतीय जनता पक्षाला त्यामुळे संधी मिळाली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याचे प्रयत्न अपेक्षेप्रमाणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागले.  त्याचमुळे शिवसंपर्क अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाचा परखडपणे समाचार घेतला.

एमआयएम अर्थात 'मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन' हा पक्ष म्हणजे इतर पक्षांसाठी 'धरले तर चावते आणि सोडले तर पळते' अशी अवस्था आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सुमारे दहा ते बारा टक्के असलेले मुस्लिम मतदार अनेक ठिकाणी निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे मुस्लिम मतदानासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करीत असतात. याचा अर्थ सारेच मुस्लिम मतदार या पक्षाच्या पाठीशी आहेत असेही नाही. दशकभरापूर्वी शेजारच्या आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात आगमन झालेल्या या पक्षाने मराठवाड्यात प्रस्थापित पक्षांना दिलेल्या धक्क्यांमुळे त्याची चर्चा सुरू झाली. अल्पसंख्याक हे काँग्रेसचे पारंपरिक मतदार असल्यामुळे त्याचा फटका स्वाभाविकपणे काँग्रेस-राष्ट्रवादी यांना बसू लागला. एमआयएम पक्षाचे बिहारमध्ये पाच आणि तेलंगणामध्ये सात आमदार आहेत. आणि तेवढ्या बळावर हा पक्ष राष्ट्रीय पातळीवर सतत चर्चेत राहतो.

एमआयएमला भारतीय जनता पक्षाची 'बी टीम' म्हटले जाते. कारण, या पक्षाने भारतीय जनता पक्ष किंवा संघपरिवाराच्या धार्मिक मुद्द्यांना थेट विरोध करून धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी मदत केली. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत कर्नाटकातला हिजाबचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात असदुद्दीन ओवैसीच आघाडीवर होते, त्याचा अंतिमतः फायदा भाजपलाच झाल्याचे निकालावरून दिसून आले. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएमने काँग्रेस पक्षाचे नुकसान केले. 40 टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार असलेल्या जागांवर ओवैसींच्या या पक्षाने पाच जागा जिंकल्या आणि दहा जागांवर राजद-काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांना पराभूत करायला हा पक्ष कारणीभूत ठरला. बिहारमध्ये राजद-काँग्रेस महाआघाडीला सत्तेपासून वंचित ठेवण्यामध्ये ओवैसींनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराष्ट्रातही एमआयएम आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादीला नुकसान पोहोचवले आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत एमआयएमच्या दोन जागा आहेत आणि औरंगाबादमधून त्यांच्या पक्षाचे इम्तियाज जलील संसदेत गेले आहेत. टक्केवारीबाबत बोलायचे तर सव्वा ते दीड टक्का मते मिळवणारा हा पक्ष सातत्याने राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहतो, यावरून अन्य राजकीय पक्षांनी आणि राजकीय विश्लेषकांनी हा फुगा किती फुगवला आहे, ते लक्षात येऊ शकते. मराठवाड्यात मुस्लिम समाजाची लोकसंख्या सरासरी 25 टक्के आहे. काही ठिकाणी ती 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आहे. मराठवाडा हैदराबादपासून भौगोलिकद़ृष्ट्या जवळ असल्यामुळे आणि मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण तुलनात्मकद़ृष्ट्या अधिक असल्यामुळे एमआयएमने त्या मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश केला. मराठवाड्यातील नगरपालिका व महानगरपालिकांच्या माध्यमातून त्यांनी हातपाय पसरले आहेत.

सुरुवातीच्या काळात मुस्लिम समाज एमआयएमच्या धार्मिक चेहर्‍याला भुलला; परंतु हळूहळू त्यांचे खरे स्वरूप लक्षात आल्यामुळे अनेक ठिकाणी मुस्लिम मतदारांनी त्यांच्यापासून फारकत घेऊन अन्य पर्याय निवडले. या सगळ्याचे नीट आकलन असले तरीसुद्धा काही घटकांना एमआयएमला चर्चेत ठेवण्यात रस असतो आणि त्यातच त्यांचे राजकीय हित असते. या पक्षाचा बागुलबुवा आपणच उभा करायचा आणि भीती दाखवायची, असा हा राजकीय डाव आहे. उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बोट पकडून महाविकास आघाडीत या पक्षाने प्रवेश केला तरी आश्चर्य वाटायला नको. एरव्ही आपल्या जगण्याशी संबंधित प्रश्नांसाठी संघर्ष करणार्‍या जनतेचे निवडणुकीच्या काळात मात्र प्राधान्यक्रम बदलतात. महागाई, बेरोजगारीसारखे जगणे मुश्कील करणारे अनेक प्रश्न असतानाही धार्मिक ध्रुवीकरण निर्णायक ठरत असते, त्याचमुळे एमआयएमसारख्या पक्षांचा फुगा वर वर जात असतो!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news