बाबा, यंदा माझ्या होळी-धुळवडीचं बजेट वाढवायला हवं हं तुम्ही!
का हो चिरंजीव?
महागाई किती वाढलीये बाबा!
खरं की काय? मला माहीतच नव्हतं.
रंग, पिचकार्या, फुगे सगळंच महागलंय.
मग, सगळं थोडं थोडं आणा.
मुख्य म्हणजे पेट्रोल हो बाबा! काहीच्या काहीच वाढलेत पेट्रोलचे भाव.
मग, गावभर पळवू नयेत ना गाड्या!
गावभर नै कै, आम्ही फक्त आमच्याच टेरीटरीत फिरतो. आमचे वेगवेगळ्या ग्रुप्सचे झोन फिक्स असतात. तुमच्या 'उलटीपालटी'सारखे बदलत नसतात आमचे प्रभाग वरचेवर!
माहितीहेत तुझे प्रभाग. नुसती 'भागंभाग' चालते तुझी.
मग, त्यांच्यात तरी काय वेगळं चाललेलं असतं? सोयीचे प्रभाग बनवण्यासाठी केवढी 'भागंभाग' चालली होती यंदा? लक्षात घ्या, निवडणुकीसाठी नाही; पण निदान धुळवडीला तर अंगभर रंग लावून, ओल्या कपड्यांमध्ये, गावभर बाईकवरून फिरावंच लागतं आम्हाला!
वर मोठमोठ्याने कोकलावंही लागतं. काय त्या किंचाळ्या? ते बेसूर गाणं, उगाच हसणं खिदळणं? प्याप्याप्याप्या हॉर्न वाजवणं?
वर्षातून एकदा तसं एन्जॉय करायला मिळतं तर करू द्या ना बाबा!
एन्जॉय करायचं म्हणजे भटकायचं आणि अचकट विचकट बोलायचं, असं वाटतं का रे तुम्हाला? मला नाही चालणार.
अचकट विचकट बोलण्याची तर मोठी परंपरा आहे बाबा आपल्याकडे. ताळतंत्र सोडून बोलणारे राजकारणी तर रोज बातम्यांमध्ये दिसतात. कोणी कोणाच्या 'बुडाला' जाळ काढतं, कोणी कोणाची 'अंडीपिल्ली' बाहेर काढतं. चारचौघांत बरं दिसतं का असं कोणाचं बूड, कोणाचा शेंबूड काढणं? शब्दांचं सोडा एकवेळ, राजकारणात माणसांच्या मागून 'म्यावम्याव, कावकाव' असे आवाजही काढतात म्हणे. आम्ही धुळवडीत म्यांवम्यांव तरी करत नाही बाबा!
सणाच्या नावाखाली तुम्ही लोक नको ते पेय पिता आणि मग तुम्हाला भास व्हायला लागतात एकेक! हे बरोबर आहे का मला सांग?
बस्का? बाबा, कोणीही काहीही प्यायलो तरी आम्हाला नंदी दूध पितो, मारुती पाणी पितो असे भास तरी होत नाहीत ना? आपल्याकडे तसेही होतात लोकांना. एकदम पळापळ सुरू होते लोकांची दगडी मूर्तींना दूध पाजायला जायची.
तो भक्तीचा प्रश्न आहे रे! ती एक वेगळी नशाच म्हणायची; पण तिच्यापोटी माणसं फार तर आरत्या, भजनं म्हणतील. तुम्ही धुळवडीची संधी साधून घाणसाण, चावट बोलता, शिवीगाळीपर्यंत जाता. ते कसं चालेल?
तुमच्यात थेट पत्रकार परिषद घेऊन शिवीगाळ चालते. ते चालतं तुम्हाला? अगदी बोबड्या शब्दांमध्ये, म्हातार्याकोतार्या लोकांनी केलेलही चालतं? मग, आम्ही निदान तरुण आणि होतकरू तरी आहोत. आमचे हौसमौज करायचे दिवस तरी आहेत बाबा! तरी आम्ही एकच दिवस तसे वागतो. तुमच्या राजकारणात बारा महिने धुळवड सुरू आहे बर्का. चिखलफेक म्हणा, दुसर्यांच्या तोंडाला काळं फासणं म्हणा, बोंबा मारणं म्हणा, बारमाही धुळवड ठरावी अशी राजकारणाची परवड चाललीये तुमच्यात! जो तो रंग उधळतोय. मग, मला रंग नुसते खेळायला द्यायला काय हरकत आहे बाबा?
काही नाही. पुरे पंचनामा. त्यापेक्षा मीही म्हणतो, 'सख्या चला बागांमधी, रंग खेळू चला!'