वर्चस्वशाली भाजप | पुढारी

वर्चस्वशाली भाजप

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप हा पक्ष सर्वात जास्त जागा मिळविणारा पक्ष म्हणून पुढे आला आहे. याबरोबरच पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी 30 टक्क्यांपेक्षा जास्त आणि 44 टक्क्यांपर्यंत गेलेली आहे. या निवडणूक निकालांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चारही राज्यांमध्ये भाजपचे वर्चस्व निर्माण झालेले आहे. केवळ पंजाबमध्ये सत्तांतर झाले आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांपैकी उत्तर प्रदेशचा निवडणूक निकाल हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण, उत्तर प्रदेशात प्रत्येक निवडणुकीत सत्तांतर घडत गेले होते. परंतु, या निवडणुकीत भाजपने सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील जनमत पक्षाच्या विरोधी जाऊ दिले नाही. भाजपला या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील वर्चस्वशाली पक्ष अशी प्रतिमा निर्माण करता आली. असे निवडणूक निकालावरून दिसते. निवडणूक निकालावरून भाजपच्या वर्चस्वाची चार सूत्रे पुढे येतात.

एक, भाजप हा पक्ष नवीन निवडणूक संस्कृती आणि नवीन तत्त्वज्ञान आत्मसात केलेला पक्ष आहे. निवडणूक जिंकण्याची संस्कृती भाजपने घडविलेली आहे. या गोष्टीचे आत्मभान काँग्रेस पक्षाला किंचितसेदेखील येत नाही. त्यामुळे काँग्रेस हा पक्ष भाजपशी सत्तास्पर्धा करण्यात अपयशी ठरत आहे. दोन, भाजपच्या मतांमध्ये सातत्याने वाढ होत राहिलेली आहे. उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत 2012 मध्ये भाजपला पंधरा टक्के मते मिळाली होती. 2017 मध्ये भाजपला जवळपास चाळीस टक्के मते मिळाली होती, तर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. म्हणजेच, केवळ जागा नव्हे, तर जागा आणि मते या दोन्ही संदर्भात भाजप हा पक्ष वर्चस्वशाली झालेला आहे. तीन, भाजपने नवीन सामाजिक आधारांचा शोध घेतलेला दिसतो. पुरुषांच्या तुलनेत भाजपला महिला मतदारांनी जास्त पसंती दिलेली दिसते.

नवीन सामाजिक आधार हे आकांक्षी समूह आहेत. या समूहांना भाजपने पक्षाशी जोडून घेतले आहे. पक्षाच्या अंतर्गत उच्च जाती आणि अतिमागास वर्ग असा संघर्ष असूनदेखील त्यामध्ये तोल सावरण्याचा प्रयत्न भाजपने केलेला आहे. या कामात त्यांना यश आले आहे. चार, लाभार्थी वर्ग ही नवीन वर्गवारी भाजपने राजकारणात आणली आहे. भाजप लाभार्थीला भाजपचा मतदार म्हणून अधोरेखित करण्यात यशस्वी झाला आहे. ही भाजपची चार सूत्रे हिंदुत्वापेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे भाजपने हिंदुत्वाबरोबर विकास, अतिमागासांचे नेतृत्व, लाभार्थी वर्ग म्हणजे मतदार, सुरक्षा म्हणजे महिलांचे जीवन अशी नवीन मिथके घडविली आहेत.

ही मिथके पोलादी स्वरूपाची आहेत. या मिथकांना प्रतिस्पर्धी पक्षाकडून फार मोठे आव्हान मिळाले नाही. कारण, उत्तर प्रदेशात सपाला भाजपपेक्षा दहा टक्के मते कमी आहेत. म्हणजेच भाजपने दहा टक्के मते जास्त मिळवली आहेत, तसेच उत्तराखंडात काँग्रेसपेक्षा चार टक्के मते भाजपला जास्त मिळाली आहेत. मणिपूरमध्ये काँग्रेसच्या तुलनेत भाजपच्या मतांची टक्केवारी जवळपास दुप्पट आहे. गोव्यामध्ये काँग्रेसच्या तुलनेत भाजपला दहा टक्के मते जास्त मिळाली आहेत. यावरून स्पष्ट दिसते की, भाजप हा वर्चस्वशाली पक्ष या निवडणुकीत ठरलेला आहे.

राष्ट्रीय पातळीवर ‘आप’चा उदय

आम आदमी पक्षाचा उदय राष्ट्रीय पातळीवर झाला आहे. आम आदमी पक्षाने दिल्लीनंतर पंजाबमध्ये चांगल्या जागा आणि चांगली मते मिळविलेली आहेत. यामुळे एका अर्थाने भाजपला विरोध करणारे नेतृत्व आम आदमी पक्षातून उदयास आले आहे. आम आदमी पक्षाचा राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून उदय झाला आहे. याबद्दलच्या चार महत्त्वाच्या घडामोडी या निवडणूक निकालात दिसतात. एक, आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. म्हणजेच जागांच्या बरोबर मतांची टक्केवारीदेखील चांगली आहे.

दोन, दिल्लीनंतर पंजाब, हरियाणा या एका हिंदी भाषिक पट्ट्यात आम आदमी या पक्षाचा उदय झालेला आहे. यामुळे दिल्ली, हरियाणा आणि पंजाब अशा सलग पट्ट्यातून भाजप विरोधी ताकद दिसणार आहे. तीन, राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयाला येण्यासाठी आम आदमी या पक्षाला गोवा व उत्तराखंड या राज्यांमध्ये देखील चांगली मतांची टक्केवारी मिळालेली आहे. चार, आम आदमी पक्षाकडे दिल्लीमध्ये सत्ता होती. त्यांनी तेथे सुशासनाचा प्रयोग राबविला. त्या प्रयोगाला पंजाबमध्ये स्वीकारले गेले. विशेषतः काँग्रेस पक्षाची आम आदमी ही संकल्पना जनतेने नाकारली. पंजाबमधील जनतेने सरळ सरळ आम आदमी पक्षाची आम आदमी ही संकल्पना स्वीकारली. यामुळे काँग्रेस पक्ष पंजाबमध्ये जवळपास निवडणूक प्रक्रिया समजून घेण्यास अपयशी ठरलेला दिसतो.

सामाजिक न्याय

पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक समान वैशिष्ट्य म्हणजे नव्वदीच्या दशकात उदयाला आलेली सामाजिक न्यायाची संकल्पना पूर्णपणे नाकारली गेली आहे. याबद्दलची चार उदाहरणे निवडणूक निकालात स्वच्छपणे दिसतात. एक, समाजवादी पक्षाने सामाजिक न्याय या गोष्टीवर भर दिला होता. परंतु, समाजवादी पक्ष आणि भाजप या दोन पक्षांत जवळपास दहा टक्के मतदानाचे अंतर दिसते. म्हणजेच सामाजिक न्याय या संकल्पनेचा पराभव झालेला आहे. दोन, बहुजन समाज पक्ष हा हिंदुत्वाच्या बालेकिल्ल्यात वाढलेला पक्ष होता. परंतु, या निवडणूक निकालामध्ये बसपला केवळ बारा टक्क्यांच्या आसपास मते मिळालेली आहेत. 2017 मध्ये बसपला बावीस टक्के मते मिळाली होती. म्हणजेच, ही मोठी घसरण झालेली दिसते. यामध्ये सामाजिक न्यायाच्या संकल्पनेची देखील घसरण झालेली दिसते.

तीन, पंजाबमध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार चेन्नी होते. त्यांनी स्वतःचे वर्णन आम आदमी असे केले होते. परंतु, या पातळीवर देखील सामाजिक न्यायाचा मुद्दा नाकारला गेला आहे. चार, मणिपूर हे राज्य एका अर्थाने मागास राज्य आहे. तेथे सामाजिक न्यायाची गरज जास्त होती. परंतु, मणिपूरच्या जनतेला काँग्रेसप्रणीत आघाडी सामाजिक न्यायावर आधारलेली वाटली नाही. यामुळे मणिपूरमध्येदेखील सामाजिक न्यायाची संकल्पना मतदारांनी नाकारली
आहे.

– प्रकाश पवार 

Back to top button