आई, आई गं, निर्मलामावशी काय म्हणताहेत ते पाहिलंस का?
काय म्हणतेय रे धरणगावची निमामावशी, एवढा ओरडून सांगतोयस ते?
मी दिल्लीच्या निर्मलामावशींचं म्हणतोय आई. ती माझी एकट्याची नाही, सगळ्यांचीच मावशी म्हणायची ना?
हो का? मला कशी आठवत नाही? थांब तुला फोटोच दाखवतो. वाचूनही दाखवतो.
तुझ्याबरोबर हिलाही ऐकण्यासारखं आहे तिचं म्हणणं. अगं ए, ऐकलंस का? काय? तुमच्याच पोटपूजेची सोय करत्येय, तर मध्ये मध्ये किती वेळा हाका मारता हो? माझ्याशिवाय दुसरं कोणी आहे का इथे तुमचे चोचले पुरवणारं?
तेच म्हणतेय मावशी. कामं होणं महत्त्वाचं. केंद्र आणि राज्य यांच्या कामांमध्ये नेहमी एकसूत्रता असावी.
सध्या आहे तसा बेबनाव नसावा. बेबनाव कोण माजवायला बसलंय?
सगळी ढोरमेहनत मीच तर करत आहे रात्रंदिवस! करायलाच हवी. आम्ही आमचे संसार चोख केले. खूप राबलो त्यासाठी. आता तुमचं तुम्ही बघा. असं नुसतं म्हणता तुम्ही. सुखाने बघू देता का मला?
मी ठेवलेल्या मोलकरणींशी पटवून घेता का कणभर तरी?
तुला मुळी कामं करवून घेताच येत नाहीत नोकरांकडून. म्हणून मला मध्ये पडावं लागतं. ए बायांनो, लगेच भांडायला का लागलात? निर्मलामावशी याबद्दलच तर सांगताहेत.
राज्यांनी केंद्राचं ऐकावं. एकमेकांत सामंजस्य राहील, असे व्यवहार करावेत. त्याशिवाय देश सुरळीत चालणार कसा?
तुझं पुरे रे मावशीपुराण. पुरतं ऐकून तर घ्या. मावशी म्हणताहेत, विकासाच्या खूप योजना केंद्राने आखल्या आहेत; पण त्यांची चांगली अंमलबजावणी व्हायला राज्यांचं सहकार्य मिळायला हवं. सहकार्याचं तर तुम्ही बोलूच नका हो. सहकार्यातला 'स'सुद्धा आईंना समजलेला नाहीये आजवर. साधं मी पोहे करावे म्हटलं की, यांना उप्पीट हवंसं वाटणार! बघा बाई, म्हणजे आता मुलाच्या संसारात आईला मनाजोगतं खायलाही मिळणार नाही म्हणा की! अगोबाई! उपासमार का होत्येय तुमची?
तरीच एवढ्या वाळलात अलीकडे. अशिया इकॉनॉमिक डायलॉग मधल्या मावशींच्या भाषणाबद्दल बोलत होतो गं मी. त्यावरून थेट पोहे-उप्पीटावर कुठे आलात तुम्ही? कमाल आहे तुमची दोघींची आहे ना? पटतंय ना? मग, एकदातरी कोणाची तरी एकीची बाजू घ्या. दरवेळेला गुळमुळीतपणा चालतो तुमचा. मग काय ममतादीदींनी मागे केलं होतं तसं करायचं?
स्वतः मिटिंगला उशिरा यायचं ते यायचं आणि वर चीफ सेक्रेटरीची बदली केली, तर त्याला आपल्या पंखाखाली घ्यायचं. पुन्हा केंद्राच्याच नावाने खडे फोडायचे. मी नाही बाई त्यांच्यासारखी कांगावखोर. मी वेळेला सरळ तोंडावर बोलते. तशी सवय आपल्याकडे इतरांना आहे बरं का!