इस्रो चे शानदार यश | पुढारी

इस्रो चे शानदार यश

एक भू-अवलोकन उपग्रह, दोन लहान उपग्रह अंतरिक्षात भूस्थिर कक्षेत स्थापित करून ‘इस्रो’ने नव्या वर्षातील पहिले यश नोंदविले. यावर्षी ‘इस्रो’च्या आणखीही अनेक मोहिमा प्रस्तावित आहेत आणि त्या यशस्वी होतील, याची खात्री आहे. चंद्रयान-3 मोहिमेचे काम ‘इस्रो’कडून वेगाने सुरू आहे.

ईओएस-04 हा भू-अवलोकन उपग्रह, तसेच इन्स्पायर सॅट-1 आणि आयएनएस-2 टीडी हे दोन लहान उपग्रह अंतरिक्षात भूस्थिर कक्षेत स्थापित करून भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्थेने (इस्रो) नव्या वर्षातील पहिले यश नोंदविले आहे. 25 तास आणि 30 मिनिटांच्या उलट गणतीनंतर पीएसएलव्ही-सी 52 या उपग्रह प्रक्षेपकाने पहाटे 5 वाजून 59 मिनिटांनी उड्डाण केले. ‘इस्रो’ने दिलेल्या माहितीनुसार प्रणोदन तसेच उष्णतेपासून बचाव करणारे कवच अलग करण्याची आणि उपग्रहांना कक्षेत स्थापित करण्याची प्रक्रिया ठरल्या वेळेनुसार झाली. सुमारे 17 मिनिटे आणि 34 सेकंदांच्या उड्डाणानंतर तिन्ही उपग्रहांना 529 किलोमीटर ध्रुवीय कक्षेत व्यवस्थित नेण्यात आले आणि ज्या कक्षेत त्यांना प्रस्थापित करण्यात आले ती लक्षित कक्षेच्या खूपच जवळ होती. ‘नासा’ या अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या पाठोपाठ यशस्वी मानली जाणारी ‘इस्रो’ ही संस्था नव्या वर्षातील पहिल्याच उड्डाणात यशस्वी झाली आहे.

ईओएस-04 उपग्रह कृषी, जंगले आणि वृक्षारोपण, मातीतील आर्द्रता, तसेच जलविज्ञानाबरोबरच पुराच्या वेळचे नकाशे तयार करण्यासाठी सर्व प्रकारच्या हवामानासाठी उच्च गुणवत्ता असलेली छायाचित्रे प्रदान करेल. प्रिंट तसेच परीक्षणासाठी उद्योगांशी भागीदारीबरोबरच अंतरिक्षाचे क्षेत्र खुले करण्याचे देशाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने ईओएस-04 हे एक छोटेसे पाऊल आहे. ईओएस-04 हा एक रडार इमेजिंग सॅटेलाइट आहे. त्याचे वजन 1,710 किलोग्रॅम आहे. हा उपग्रह दहा वर्षे सेवा देऊ शकेल. बंगळुरूच्या यू. आर. राव उपग्रह केंद्रातून प्रक्षेपित केलेला हा उपग्रह 2,280 वॅट ऊर्जा निर्माण करतो. पीएसएलव्ही हा प्रक्षेपक आपल्यासोबत इन्स्पायर सॅट-1 हा उपग्रहसुद्धा अंतरिक्षात घेऊन गेला. भारतीय अंतरिक्ष विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने (आयआयएसटी) कोलोरॅडो विद्यापीठाच्या वायुमंडलीय आणि अंतरिक्ष भौतिकशास्त्र प्रयोगशाळेच्या सहकार्याने हा उपग्रह तयार केला आहे. दुसरा उपग्रह म्हणजेच आयएनएस 2-टीडी हा एक तंत्रज्ञान प्रदर्शक उपग्रह आहे.

इन्स्पायर सॅट-1 उपग्रहाचे उद्दिष्ट वायुमंडलातील गतिविज्ञान, तसेच सूर्याच्या कोरोनल उष्मीय प्रक्रियांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे हे आहे. त्याचे वजन 8.1 किलोग्रॅम आहे. आयएनएस-2 टीडी हा 17.5 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह असून, त्यातील उपकरणाच्या स्वरूपात एक थर्मल इमेजिंग कॅमेरा असल्याने हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान, आर्द्रता असलेली जमीन तसेच जलाशयांच्या पृष्ठभागावरील तापमान, वनस्पती (पिके आणि वने) आणि तापमानजनित जडत्व (दिवस आणि रात्र) या घटकांच्या आकलनासाठी सहकार्य करेल. पीएसएलव्ही अंतरिक्ष वाहकाचे हे 54 वे उड्डाण असून, 6 पीएसओएम-एक्सएल (स्ट्रॅप ऑन मोटर्स) सोबत पीएसएलव्ही-एक्सएल कॉन्फिगरेशनचा वापर करण्यात आलेली ही 23 वी मोहीम आहे.

‘इस्रो’ने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच त्या वर्षीची पहिली मोहीम यशस्वी केली होती. त्या मोहिमेत एकाच वेळी 19 उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थापित करण्यात आले होते. त्यातील ब्राझीलचा अमाझोनिया-1 हा सर्वांत मोठा उपग्रह होता. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ‘इस्रो’ची एक मोहीम पूर्ण होऊ शकली नव्हती. सध्या ‘इस्रो’ ही उपग्रह प्रक्षेपण सर्वांत कमी खर्चात करणारी संस्था म्हणून विश्वविख्यात झाली आहे. मंगळयानाचे यश आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविण्याचा प्रयत्न यामुळे जगात ‘नासा’च्या खालोखाल सर्वांत विश्वासार्ह अंतरिक्ष संशोधन संस्था म्हणून ‘इस्रो’चा लौकिक झाला आहे. यावर्षी ‘इस्रो’च्या आणखीही अनेक मोहिमा प्रस्तावित आहेत आणि त्या यशस्वी होतील, याची खात्री आहे. चंद्रयान-3 मोहिमेचे काम ‘इस्रो’कडून वेगाने सुरू आहे. याच गतीने ‘इस्रो’ यशस्वितेची एका पाठोपाठ एक शिखरे पादाक्रांत करतच राहील.

– प्रा. विजया पंडित

Back to top button