आमच्या लक्षात आलंय…!

आमच्या लक्षात आलंय…!
Published on
Updated on

'या खुनांमध्ये आरोपी कोण होते?', 'हे खून कुणी केले?', 'ती आत्महत्या नव्हती, तर खून होता, बलात्कार करून खून केला', 'घोटाळा करून यांनी जमीन घेतली', 'आमच्या घरात डोकावता काय?' 'यांच्या कुंडल्याही आमच्याकडे आहेत'… निवडणूक ज्वर चढू लागल्याने एकमेकांची प्रकरणे बाहेर काढण्यात बेभानपणाने मग्न झालेली ही मंडळी आहेत. समोरच्याचे कपडे काढत असताना आपलेही काढले जाताहेत आणि दोघेही नागडे होतोय, याचे भान कुणालाच नाही; पण आम्हा सर्वसामान्यांना अनेक गोष्टी पक्क्या लक्षात येऊ लागल्या आहेत. आमच्या लक्षात येऊ लागलेय की, दोन्ही बाजूंकडची मंडळी गुंड आहेत. सर्वांचेच हात रक्ताने माखलेत. सर्वांचेच कपडे भ्रष्टाचाराच्या-गैरकारभाराच्या चिखलाने काळे कुळकुळीत झालेत. सारे एकाच माळेचे मणी आहेत.

…आमच्या लक्षात आलंय… जनतेचे खरे, वास्तव प्रश्न सोडवण्यात कुणालाच स्वारस्य नाहीये. जनतेचे प्रश्न तर सोडाच; पण आपण जी प्रकरणं काढतोय त्या प्रकरणांमागे जनहिताचा कळवळा वगैरे काहीच नाहीये. दुसरा आपल्यापेक्षा कसा वाईट आहे, हे सांगण्यासाठीचे ते तोंडी लावणं आहे. जुन्या गैरप्रकारांची-भ्रष्टाचाराची-खुनांच्या मालिकांची ही मढी उकरण्यात त्या प्रकरणी न्याय मिळावा, त्याची चौकशी व्हावी, दोषींना शिक्षा व्हावी, असा अजिबात उद्देश नाही. तसा उद्देश नसता तर 'तुम्ही गप्प बसलात तर आम्हीही गप्प बसू', असा या भांडणार्‍या सर्वांचा सूर आलाच नसता. …आमच्या लक्षात आलंय… निवडणुका जवळ आल्या नसत्या, तर हे आरोपांचे सत्र सुरू झालंच नसतं. पहिला आरोप ज्याच्यावर झाला, त्यानं दुसर्‍यावर प्रत्यारोप केलाच नसता. आरोपावर प्रत्यारोप, प्रत्यारोपावर पुन्हा आरोप आणि त्याला पुन्हा उत्तर हा खेळ हताशपणानं बघत बसणं एवढंच आम्हा सर्वसामान्यांच्या हाती उरलंय. निवडणुका नसत्या, तर एकमेकांचा गैरप्रकार-भ्रष्टाचार-खुनांची मालिका माहिती असून 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' असंच राहिलं असतं.

…आमच्या लक्षात आलंय… या आरोपांमुळं सर्वांना माहिती असलेल्या; पण आता उघडपणानं उच्चारल्या गेलेल्या गैरप्रकारांवर काहीही कारवाई होणार नाही. याचं कारण आता आरोप-प्रत्यारोप करणारी सर्वच मंडळी कधी ना कधी एकमेकांबरोबरच होती अन् एकमेकांच्या मदतीनंच त्यांनी हे गैरप्रकार केलेत आणि त्याहून कळस म्हणजे गेल्या काही काळात एकमेकांच्या विरोधात असतानाही आपलं बाहेर आलेलं प्रकरण मिटावं म्हणून दुसर्‍या पक्षाच्या मंडळींचे हातही ओले केल्याचे प्रकार घडलेत. तसं नसतं, तर खून झालेल्या सोसायटीचे व्हिडीओ फुटेज कुणी गायब केले अन् अख्खा माणूसही कुठं गायब झालाय, या प्रश्नांची उत्तरे आरोप करणार्‍यांच्या पक्षानं आपल्या हाती असलेल्या शासकीय यंत्रणेच्या मदतीनं शोधून काढली असती.

'झालं एवढं पुरे झालं, आता तुम्ही थांबला नाहीत, तर या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ', अशी गर्भित धमकी तर नसेल ना?' या प्रकरणांमध्ये कारवाई व्हावी, असा उद्देश असता, तर कुठल्या रुग्णालयाचं कंत्राट कुणाला दिलयं, याची शहानिशा करण्यात आली असती. कोणत्या प्रकरणात अडकलेल्या आरोपींचा पैसा कुणाच्या नातलगाच्या कंपनीत गुंतलाय त्याचा छडा आरोप करणार्‍यांनी लावला असता. कोणाच्या लग्नात किती कोटींचं कार्पेट होतं, उत्पन्नाचं साधन शोधूनही सापडत नाही अशांकडे कोट्यवधींच्या गाड्या कशा, कोण जामिनावर बाहेर येऊन मोठमोठी पदं भूषवतो अन् त्याच्यावरच्या खटल्यातून तो बिनबोभाट सुटतो, कोण कुणाला धमकावून आत्महत्या करायला भाग पाडतो, 'ईडी'ची धमकी कुणाला कशी दिली जाते, कोणकोण बडी मंडळी जेलमध्ये जाणार अन् कुणाविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंदला जाणार, याचं भविष्य कसं समजतं, कोट्यवधींचे कुणाचे भूखंड कुणाला स्वस्तात विकले जातात, हे सवाल हवेत राहिले नसते ना!

… आमच्या लक्षात आलंय… केले जाणारे आरोप वरकरणी कितीही बेताल वाटले, तरी त्यात तथ्य आहेच. तसं नसतं, तर आरोप झाल्यावर पहिल्यांदा 'खोदा पहाड, निकला चुहा' किंवा 'खोदा पहाड निकला कचरा' अशा प्रतिक्रिया देणार्‍या मंडळींनी लागलीच आपलीही पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तरं देण्याची तसंच प्रतिआरोप करण्याची धावपळ केलीच नसती. जिथे धूर असतो तिथं लहान-मोठी आग लागलेलीच असते ना? आणि आरोपांना उत्तरं देणार्‍या पत्रकार परिषदेत वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित उत्तरं देण्यापेक्षा आरोप करणाराच कसा चोर आहे आणि त्यानं काय-काय पराक्रम करून ठेवलेत, ते सांगण्यावरच भर का असतो, हेही आमच्या लक्षात आलंय…
आमच्या लक्षात आलंय… एखाद्या पक्षावर, नेत्यावर होणारे आरोप खोटे, चुकीचे असतील, तर त्याला उत्तर देताना खरोखरीच संतापानं सत्य

मांडत असल्याचा भाव कुणाच्याच चेहर्‍यावर का नसतो ते? आरोप खरोखरीच चुकीचे, निखालस असत्य असतील, तर उत्तरं त्वेषानं दिली जातात. लखलखीत सत्य मांडलं, तर आरोप करणाराच उघडा पडतो; पण उत्तरंही बेजानपणानं दिली जातात. खोट्या आरोपांमुळं यातना होताहेत, असं कुठंही दिसत नाही. मग, हे सगळं लक्षात आल्यावर आम्हा महाराष्ट्रवासीयांना प्रश्न पडतो की, नक्की कुणाच्या खांद्यावर विश्वासानं मान टाकावी, नक्की कुणाकडं राज्याची-महापालिकेची-जिल्हा परिषदेची सूत्रं द्यावी, कोण आहे धमक बाळगून जनतेच्या हिताची कामं करणारा? प्रश्न अन् प्रश्नच फेर धरून नाचू लागतात. उत्तर मिळत नाही. तुम्ही सांगाल याचं खरं उत्तर?

– सुनील माळी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news