दीन देवाघरी धावले!

दीन देवाघरी धावले!
Published on
Updated on

आडजागेच्या त्या जीर्ण देवळाचं अचानक सुशोभीकरण सुरू झालं. भिंतींचे पोपडे काढणं, देवड्यांमधले तेलाचे ओघळ पुसणं, दिवे-ट्युबांची दुरुस्ती, कळस सजवणं वगैरे, वगैरे! जिथे वार्षिक उत्सवाखेरीज कोणी फिरकत नसे तिथे पॉश गाड्यांमधून चकचकीत माणसं आली. फटाफटा 'हे बदला, ते नवं मागवा' वगैरे सूचना करून गेली. भसाभस परिसरात मोठे दिवे लागले तेव्हा देवळाच्या तेलकट अंधारातल्या देवांना गप्प बसवेना. हळूच सोबतच्या देवींना म्हणाले, 'हा एकदम लखलखाट कसला? एरव्ही समया, निरांजनाच्या प्रकाशात निवांत असतो आपण, ही झगमग सोसवेना.'

'सवय करा भगवन. आता थोडे दिवस उजेडातच झळकायचंय आपल्याला.'
'का? वीज मोफत केलीये?''ती होईल पुढे. मतं देण्याबद्दल मतदारांना बक्षीस म्हणून! मुळात आता निवडणुका जवळ आल्या आहेत, हे तरी कळलंय का तुम्हाला? दिवसचे दिवस नुसते उभे असता. जरा बघत चला की आसपास!' देवींनी पत्नीसुलभ आवाजाच्या पट्टीत सुनावलं.देव आपले नॉर्मल पतीदेवांसारखे सावरून घेत म्हणाले, 'लक्ष आहे म्हणूनच विचारतो. एकदम लोकांना आपली एवढी आठवण? या समाजातले 'दीन, पतित, अन्यायी' लोक अचानक एवढे वाढले की काय?''ते नाही वाढल्येत. जुन्या मंत्र्यासंत्र्यांच्या, नव्या उमेदवारांच्या भेटी वाढल्यात गावाकडच्या. सदिच्छा भेट, गावदेवाचा आशीर्वाद वगैरेंची डिमांड वाढलीये बहुधा, तरी मी काढते नीट माहिती. माझं नेटवर्क तेवढं सॉलिड आहेच नाही तरी!'

'बघा, कुठून तरी आपल्याला बरे दिवस येतात का?' भगवानांनी उसासत म्हटलं. लवकरच देवींच्या 'सोर्सेस'नी माहिती दिली की, अनेक मठ, आश्रम, देऊळखेरीज गुरुद्वारा-अग्यारी-चर्च यासारख्या सर्व प्रार्थनास्थळांमध्ये अशीच लगबग, झगमग दिसतेय. पुढारी, नेते, लोकप्रतिनिधी वगैरे जिथे जातील तिथल्या देवांना प्रदक्षिणा घालताहेत. आपण किती साधेभोळे भाविक आहोत, हे दाखवायला धडपडताहेत. आता आतापर्यंत ते देवांच्याही वाटण्या करायचे. 'हा आमचा, तो तुमचा, आमच्या पंथाला हा चालतो, आमच्या धर्माला तो चालत नाही' वगैरे लावून धरायचे. आता सगळ्यांसाठी 'मतदारांची खुशी' हा एकच धर्म, पंथ, पक्ष ठरतोय ना! त्यामुळे अचानक सगळे सर्वधर्मसमभावाच्या साथीत सापडल्येत. मग काय, कोणी राजपुत्र अंगातल्या कोटावर जानवं लटकवून दर्शन घेतोय. कोणी लंगरमध्ये मांडी घालून बसून प्रसाद खातोय. कोणी डोकीला रुमाल बांधून भजनात टाळ्या वाजवतोय. कोणी कॅमेराकडे बघत आरतीच्या तबकाला हात धरतोय. यांच्यापैकी कोणीच या गोष्टी नेहमी करत नसल्याने सगळे गरीब, बिचारे दिसताहेत. मतदारदेव पावावा यासाठीची सगळी कसरत पाहून खरेखुरे देव मात्र चुकचुकताहेत. 'अरेरे! एवढी वर्षं आपण दीनाघरी धाव धाव धावलो. निवडणुका आल्यावर सगळे बडे लोक दीन होऊन आपल्या दारी येणार आहेत, हे आपल्याला कळलंच नाही.'

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news