लवंगी मिरची : निष्ठेचे फळ | पुढारी

लवंगी मिरची : निष्ठेचे फळ

पहिल्या कोरोना कालखंडात पहिल्यांदा संचारबंदीचा आदेश आला, तशी अनेकांची ‘तोंडची दारू पळाल्याची’ भावना झाली. हातची कामं सोडून माणसं दारूच्या दुकानांसमोर रांगा लावू लागली. साहजिक होतं ते! माणसांच्या मूलभूत गरजा भागल्या नाहीत, तर ती कासावीस होणारच. जेव्हा बायका घरच्या गरजेपुरतं धान्य, तेल, मसाले जमवत होत्या तेव्हा अनेक पुरुष आपापली संध्याकाळची द्रवबेगमी करण्यात मग्‍न होते.

अगोदरच्या जवळजवळ प्रत्येक वार्षिक अर्थसंकल्पात दारू व सिगारेटवरचे कर वाढले, दर वाढले, तरी खप कमी झालेला नव्हता. नंतर एकदा काही परदेशी मद्यांवरचे कर कमी झाले, तरीही अनेक निष्ठावंतांनी आपापल्या देशी ब्रँडचा मोह सोडलेला नव्हता. पेयावरची अनेकांची ही असाधारण निष्ठा पाहूनच बहुधा आता मॉलमध्ये, सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला.

महाराष्ट्रातच तयार झालेली वाईन त्यांनी विकावी, फळ उत्पादक शेतकर्‍यांचे हितरक्षण करावे, त्यांनी बनवलेल्या ‘वाईन’ या आरोग्यदायी पेयाचा प्रसार करावा असे उदात्त हेतू यामागे होते; पण अनेक नतद्रष्ट विरोधकांना ते दिसलेच नाहीत. त्यांनी तारेत आल्यासारखे आक्षेप घ्यायला सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातली दारुबंदी उठवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता तेव्हाही असंच केलं त्यांनी. हे महाराष्ट्र आहे का मद्यराष्ट्र आहे? आता नळाने घरोघरी दारू पुरवणार का? वायनरीजना होम डिलिव्हरीची परवानगी देण्याचा विचार तर नाही? अशी खुसपटं काढली सर्वांनी मिळून.

सत्तेच्या नशेपुढे या नशेचं गांभीर्य कळत नसल्याची शंकाही घेतली. वास्तवाचं किती घोर हे अज्ञान बरं! ही नवी सोय उपलब्ध करून दिली नसती, तरी पिणार्‍यांनी ‘डिअर बीअर’ किंवा ‘वाइच वाईन’ हवी तेव्हा मिळवलीच असती. विकणार्‍यांनी मागणीनुसार तिच्या नावाखाली इतर जबरा पेयांचा पुरवठा केलाच असता. उगाच विकणार्‍यांना त्रास, विकत घेणार्‍यांना त्रास! त्यापेक्षा त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ दिलं पाहिजे. (निष्ठेच्या फळाची वाईन करून बघायची संधीही दिली पाहिजे.) अशा उदात्त हेतूची दखल कोणालाच घेता येऊ नये? फक्‍त चकणा बनवणार्‍या, काचसामान बनवणार्‍या काही कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.

इतरांनी आपला नतद्रष्टपणा सोडून खर्‍या द्रष्टेपणाचं कौतुक करायला हवं. हळूहळू कोपर्‍याकोपर्‍यावरच्या ‘जय हनुमान’ किंवा ‘भागोदरी प्रोव्हिजन्स’ वगैरे दुकानांमध्ये एकेक माल मिळायला लागेल आणि घराघरातल्या बायाबापड्या फोनवरून ऑर्डर देतील, ‘शेठ, दोन किलो चावल, एक शेंगतेलाची पिशवी, हिंगाची डबी आणि चार वाईन बॉटल्स अर्जंट पाठवा हं! वाईन जरा बघून पाठवा, कुठली स्कीममध्ये, फ्रीमध्ये असेल तर! पण, मागच्या वेळची फारच पाणचट होती वाटतं, बबड्यालासुद्धा आवडली नाही, बबड्याचे बाबा तर वैतागलेच. नेहमीच्या गिर्‍हाईकाला असं फसवावं का? सांगा बरं?’

Back to top button