भारतीय क्रिकेट संघ : सुवर्णसंधी गमावली! | पुढारी

भारतीय क्रिकेट संघ : सुवर्णसंधी गमावली!

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेतून निराशेचे गाठोडे घेऊन मायदेशात परतेल. महिनाभरापूर्वी हा संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी आणि एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या तयारीने उतरला होता. पहिला कसोटी सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेत प्रथमच मालिका विजयाच्या दृष्टीने पाऊल टाकले होते; पण त्यानंतर भारतीय संघ जो ढेपाळला तो शेवटपर्यंत सावरू शकला नाही. खरे तर यावेळी बलाढ्य भारतीय संघ इतिहास रचेल अशी अटकळ होती; पण दक्षिण आफ्रिकेच्या नवख्या संघाने भारतीय संघाला सहज पराभूत केले. वर्णद्वेषी धोरण अवलंबल्यामुळे जवळपास बावीस वर्षे दक्षिण आफ्रिकेच्या संघावर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. 1991 मध्ये ही बंदी उठविण्यात आली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिलाच दौरा भारताचा केला. तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये सातत्याने क्रिकेट खेळले जात आहे. मात्र, मायदेशात वरचढ असलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नव्हती. यावेळी ती संधी चालून आली होती. भारतीय संघामध्ये फलंदाज आणि गोलंदाज या दोन्ही पातळ्यांवर अनुभवी आणि कर्तृत्ववान खेळाडूंचा समावेश होता. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवत भारतीय संघाने झोकात सुरुवातही केली. पुढचे सामनेदेखील भारतीय संघ आरामात खिशात घालेल असे वाटले होते; पण पुढच्या दोन्ही सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघावर भारी पडला. दक्षिण आफ्रिकेच्या संघात कसिगो रबाडासारखा गोलंदाज वगळला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर फारसा अनुभव असलेला एकही खेळाडू नव्हता. तरीही संघभावनेने खेळून दक्षिण आफ्रिकेने भारताला नमवले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि खेळाडू यांच्यात अलीकडे सुसंवाद नसल्याचे जाणवत होते. विशेषतः विराट कोहलीने सुरुवातीला टी-20 चे कर्णधारपद सोडले, त्यानंतर एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्वदेखील त्याच्याकडून जवळजवळ काढूनच घेतले. कसोटी सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विराटने हा निर्णय परिपक्वतेने घेतला असावा, अशी तमाम क्रिकेटरसिकांची भावना झाली; पण त्यानंतर मंडळाशी त्याचे फारसे जमले नाही. त्याला दिल्या गेलेल्या वागणुकीमुळे तो व्यथित झाल्याचे जाणवले. सध्याच्या घडीला विराट हा जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक गणला जातो. तो कसोटी सामन्यांमध्ये आपल्या संघाकडून चांगली कामगिरी करून घेईल आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका आरामात जिंकेल असे वाटले होते. मात्र, पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघातील एकजिनसीपणा हरवल्यासारखा वाटला. त्यातच या कसोटी मालिकेनंतर कर्णधारपद सोडणार असल्याचे विराट कोहलीने जाहीर केल्यानंतर भारतीय संघामध्ये चलबिचल सुरू झाली.

बुमराह, शमी, भुवनेश्वरकुमार, अश्विनसारखी जगातील कुठल्याही फलंदाजाला हैराण करू शकेल अशी गोलंदाजांची कुमक भारतीय संघाकडे होती; पण दक्षिण आफ्रिकेच्या डीन एलगर या अननुभवी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या नवख्या फलंदाजांवर त्यांचा विशेष प्रभाव पडू शकला नाही. याचे कारण भारतीय संघाची हरवलेली सांघिक भावना आणि पहिली कसोटी जिंकूनही लोप पावलेला आत्मविश्वास. पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघ जिंकण्यासाठी खेळतोय असे कधी वाटलेच नाही. क्रिकेटसारख्या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी नेटाने पार पाडायची असते; पण येथे एक खेळाडू दुसर्‍यावर आपली जबाबदारी ढकलतोय असे वाटत होते. दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी पूर्वीसारखी धारदार नसूनही भारतीय फलंदाजांनी त्यांच्यापुढे नांगी टाकली. गोलंदाज फलंदाजांना बाद करत नाहीत, तर ते आपल्या चुकीमुळे विकेट फेकतात, असे कपिल देव यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्याची प्रचिती या दौर्‍यात आली. विकेट फेकण्याची स्पर्धा भारतीय फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. याउलट डीन एलगर, टेम्बा बवुमा, पीटरसन, क्वींटन डीकॉक हे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज अत्यंत आश्वासक पद्धतीने खेळले. शेवटच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजी दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांमध्ये गुंडाळू शकली नाही. पहिल्या डावात चांगली गोलंदाजी करायची आणि दुसर्‍या डावात बचावात्मक चेंडू टाकायचे, असा काहीसा विचित्र पवित्रा भारतीय गोलंदाजांनी घेतलेला दिसला. बुमराहसारखा गोलंदाज तर त्याचे हुकमी अस्त्र असलेला यॉर्कर विसरला की काय, असा प्रश्न पडला. कसोटी मालिकेत झालेली नाचक्की एकदिवसीय सामन्यांमध्ये भरून निघेल, अशी भाबडी आशा भारतीय क्रिकेटरसिकांनी बाळगली होती; पण तिथेही कसोटी मालिका गमावल्याच्या धक्क्यातून आपण सावरलेलो नाही, हे भारतीय खेळाडूंनी दाखवून दिले. उपकर्णधारपद भूषवले म्हणजे कर्णधाराचे गुण लगेच अंगी येतात, असे नाही, हे एकदिवसीय संघाचा कर्णधार के. एल. राहुल याने सिद्ध केले. फलंदाज म्हणून त्याचे तंत्र अत्यंत भक्कम आहे. त्याच्याकडे भारतीय संघात कुणाकडेही नसतील इतके फटके आहेत; पण त्याच्या खेळात सातत्य नाही. खेळात सातत्य नसते तो खेळाडू कर्णधार म्हणून फारशी चांगली कामगिरी नोंदवत नाही, असे क्रिकेटचा इतिहास सांगतो. राहुलनेही तसेच नेतृत्व केले. त्याला कल्पकता दाखवता आली नाही. निर्णय घेताना तो गोंधळलेला वाटला. विशेषतः गोलंदाजीत बदल करताना फलंदाजाच्या कमकुवतपणाचा अधिक विचार करावा लागतो; पण हे भान राहुलला राहिले नाही. दक्षिण आफ्रिकेत भारतीय फिरकी गोलंदाज चांगली कामगिरी करतात, असा आजवरचा अनुभव आहे; पण त्यांचाही पुरेपूर वापर राहुल किंवा कोहलीनेही करून घेतला नाही. एकूणच मोठ्या अपेक्षेने गेलेल्या भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत पुन्हा अपयश पदरात पाडून घेतले. भारतीय संघात सारेच काही आलबेल नाही, हे गेल्या महिनाभरातील अंतर्गत कुरबुरी आणि टीकाटिपणीवरून स्पष्ट झालेच होते, त्यात या निराशाजनक कामगिरीची भरच पडली. दोन्हीचा परस्परसंबंध नाही, असे म्हणता येणार नाही!

Back to top button