शाळा सुरू करताना… | पुढारी

शाळा सुरू करताना...

मागील वर्षीच्या अखेरच्या महिन्यात सुरू झालेल्या शाळा या वर्षाच्या प्रारंभीच कोरोनाची तिसरी लाट आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसाराच्या भीतीने बंद करण्यात आल्या; पण ही लाट सांगितली जात होती तितकी घातक नाही, असा अनुभव महिन्याच्या आत आला, तसेच शाळा सुरू करताना कोरोना संसर्ग नसणार्‍या भागात त्या टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या; मात्र बंद करताना सरसकट बंद का करण्यात आल्या, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातूनच विचारला जाऊ लागला होता. गेल्या दोन वर्षांपासून शिक्षण जवळपास ठप्प झाले असून, त्याचे दुष्परिणाम पालकांनाही स्पष्टपणे दिसू लागले आहेत. ठोस पर्यायांवर आणि पर्यायांच्या परिणामकारकतेसाठी प्रभावी समांतर यंत्रणा उभारण्यात आलेले सरकारी अपयश आता दडून राहिलेले नाही. त्यामुळेच पालकांनीही ऑनलाईनपेक्षा प्रत्यक्ष वर्गात शिक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे अखेर आजपासून पुन्हा पहिली ते बारावीचे वर्ग वर्गातच भरविण्याचा निर्णय सरकारने घेतला. कोरोनाच्या पहिल्या लाटेची दहशत व दुसर्‍या लाटेची घातकता, यामुळे जनमानसामध्ये तिसर्‍या लाटेविषयी भीतीची मोठी लाट पसरली. संसर्ग वाढत आहे, याची जाणीव होताच त्याचा पहिला फटका शाळांना बसला. इतर सर्व गोष्टी कथित नियमांचे पालन करून सुरू असताना जवळपास दोन वर्षांनी पाचवीच्या आतील वर्ग सुरू झाल्यानंतर एकाच महिन्यात बंद करताना दाखविलेली तत्परता म्हणजे शिक्षणाबाबत आपण किती उदासीन झालेलो आहोत, याचे प्रतीक होते. सर्वच पातळ्यांवरील ही उदासीनता शिक्षणाच्या आणि एका पिढीच्याच मुळावर कशी आली, याचे अनेक दाखले देता येतील. मुळात वेगवेगळ्या पाहण्यांमध्ये आपला प्राथमिक शिक्षणाचा दर्जा किती खालावलेला आहे, हे कोरोना काळाआधी अनेकदा समोर आले. त्यात कोरोनामुळे 2020 च्या मार्चमध्ये शाळा बंद झाल्या, तेव्हा पहिलीत असणारे विद्यार्थी आता तिसरीतून चौथीत जाण्याच्या तयारीत आहेत. त्यावेळी नुकतेच लिहिण्या-वाचण्यास शिकलेली ही मुले गेली दोन वर्षे ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली मोबाईल फोनसमोर बसून शिक्षण घेत आहेत. त्यातही हे ऑनलाईन शिक्षण केवळ शहरी आणि ग्रामीण भागातल्या सुशिक्षित मंडळींच्या पाल्यांपुरते मर्यादित राहिलेे. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकांच्या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांच्या शिक्षणाची काय प्रगती असेल, याचा विचार न केलेलाच बरा. या शाळांमधील जवळपास सर्वच मुले दोन वर्षे शाळाबाह्य होती. शाळा बंद करताना त्यांना अवगत असलेली शैक्षणिक कौशल्ये ती पूर्णपणे विसरली. आता केवळ औपचारिकता म्हणून त्यांना मधले दोन वर्ग सोडून पुढच्या वर्गात बसवणार असू, तर आपण कोणाची फसवणूक करीत आहोत, याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. कोरोना काळात शालेय, तांत्रिक वा वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित मंत्र्यांनी केवळ वर्ग सुरू करणे, बंद करणे आणि पुन्हा सुरू करणे, त्याचबरोबर पालकांकडून शाळांचे शुल्क वसूल करणे या व्यतिरिक्त काहीही घडले नाही. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना केवळ पुढच्या वर्गात ढकलण्याची घेतलेली भूमिका घातक असून, त्याचे परिणाम समाज म्हणून सर्वांना भविष्यात भोगावे लागणार आहेत.

या कोरोना महामारीत शिक्षण सोडून सर्व गोष्टी सुरू होत्या किंवा त्या सुरू ठेवाव्यात म्हणून त्या-त्या क्षेत्राशी संबंधित घटक त्यासाठी आग्रही होते; पण वर्गातले शिक्षण सुरू व्हावे, यासाठी कोणाही शिक्षकाने, संस्थाचालकाने वा पालकांनी ठोस आग्रह धरल्याचे स्पष्टपणे जाणवले नाही. याचा अर्थ मुलांच्या जीवाशी खेळा असा अजिबात नाही, मुलांच्या आरोग्याची काळजी हा प्राधान्यक्रम असलाच पाहिजे; मात्र शाळा बंद ठेवूनही मुलांच्या शिक्षणाची पर्यायी व्यवस्था करताच आली नसती का? कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आरोग्य सुविधा कमी होत्या. अगदी प्राथमिक म्हणता येतील, असे पीपीई किट, मास्कसुद्धा नव्हते. त्यामुळे सर्वांनी अतिकाळजी घेणे, हाच एकमेव पर्याय होता; पण वर्षभरात आपण त्यावर मात करून लस विकसित केली. त्यामुळे सुरुवातीच्या भीतीचे रूपांतर काळजी घेण्यात झाले. मात्र, मुलांच्या बाबतीत पालकांची अतिसंवेदनशीलता, सरकारचे दुर्लक्ष आणि शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबीकडे झालेले दुर्लक्ष याचा फटका असंख्य पाल्यांना भोगावा लागला, हे कटू सत्य. या दोन वर्षांच्या काळात पालकांबरोबर मुले बाजारात जात होती, लग्नात जात होती, पर्यटनास जात होती, मंदिरांमध्ये जात होती, फक्त जात नव्हती ती शाळेत! पालकांबरोबर असताना संसर्ग होत नाही, असे कोणतेही संशोधन नसताना केवळ गांभीर्याच्या अभावाने हे नवे अर्धवट शिक्षणाचे संकट ओढावून घेण्यात आले. प्रसंगी ऑनलाईन शिक्षण ठीक, असे मान्य केले, तरी त्याची तरी चोख व्यवस्था आणि विश्वास निर्माण करण्यात अपयशच आले नाही काय? शिक्षण, उरली तर गुणवत्ता आणि मूल्यमापनाची कोणती व्यवस्था तयार झाली आणि गेल्या पावणेदोन वर्षांतील तिचे परिणाम काय, याचे उत्तर शिक्षणव्यवस्थेने आणि ती चालवणार्‍यांनीच दिलेले बरे! प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच प्रत्येक टप्प्यावरील शिक्षणाची अशीच हेळसांड झाली आहे. याबाबत बोलण्यापेक्षा आपले मंत्री परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन असा खेळ खेळतात, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. दहावी-बारावीचे वर्ग सुरू असताना महाविद्यालये बंद ठेवण्यामागचे तर्कट आकलनापलीकडे आहे. महामारी आपण टाळू शकत नाही. त्याचे परिणामही अटळ आहेत; पण त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी काय करता येऊ शकते, यावर या क्षेत्रातील तज्ज्ञांनी विचारमंथन केले व सरकारने त्या द़ृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले, तर हे नुकसान काहीअंशी आपण कमी तरी करू शकतो. शाळा सुरू केल्या जात असताना या प्रमुख मुद्द्यांचा सांगोपांग विचार झालाच पाहिजे.

Back to top button