पाकिस्तान : ना‘पाक’ वास्तव!

पाकिस्तान : ना‘पाक’ वास्तव!
Published on
Updated on

युद्ध हे कोण बरोबर आणि कोण चुकीचे ठरवत नाही, असे म्हटले जाते. कारण, युद्धात जय सत्याचा नव्हे, तर शक्तीचा होतो; पण या जयासाठीही इतके मनुष्यबळ खर्ची पडते की, नंतर असा जयसुद्धा नकोसा वाटतो. सम्राट अशोकाची कलिंगावरची स्वारी हे इतिहासातले ढळढळीत उदाहरण की, ज्याने अशोकाचे मतपरिवर्तन घडवून आणले. नजीकच्या भूतकाळातील उदाहरण म्हणजे अमेरिकेचा जपानवरचा आण्विक हल्ला. त्या दुसर्‍या महायुद्धात अक्षरशः होरपळून गेलेल्या हिरोशिमा आणि नागासकी मृतांच्या स्मारकावर अक्षरे आहेत, 'चिरशांती लाभो; चुकीची पुनरावृत्ती पुन्हा होणार नाही.' युद्ध नुकसानदायीच असते, याचा हा पुरावा. त्याशिवाय युद्धात कुणाचा जय आणि कुणाचा पराजय झाला, तरी नुकसान दोन्ही पक्षांचेही होते. सध्या तर जागतिक अर्थकारण अशा स्थितीत पोहोचलेयकी, जगात कुठेही युद्ध झाले, तरी त्याची झळ युद्ध करणार्‍या दोन्ही पक्षांव्यतिरिक्त पूर्ण जगालाही पोहोचते. मग, ते इराण-इराक युद्ध असो, अमेरिका-इराक युद्ध वा अमेरिका-तालिबान! दक्षिण चिनी समुद्रातील बेटांच्या हक्कांवरून अगदी दोन वर्षांपूर्वी अमेरिका-चीनही आमने-सामने उभे ठाकले होते. इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष तर सुरूच आहे. अशा स्थितीत आपला शेजारी पाकिस्तानने भारताशी पुढची शंभर वर्षे तरी युद्ध नको, असे परराष्ट्र धोरण आखले आहे! या धोरणाचे स्वागत करताना दोन गोष्टींकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. पहिली म्हणजे पाकला असे धोरण का आखावे लागले आणि दुसरी म्हणजे अर्थातच या धोरणावर अंमल होणार का? अखंड भारताच्या फाळणीतून जन्मलेल्या पाकिस्तानचा इतिहास जन्मापासूनच रक्तरंजित आहे. काश्मीरसाठी पाकिस्ताने तीन वेळा थेट आणि गेली 75 वर्षे छुप्या मार्गाने भारताशी संघर्ष सुरू ठेवला आहे. 1965, 1971 आणि 1999 अशी तीन युद्धे हरूनही पाकची आणि प्रामुख्याने पाकिस्तानी लष्कराची युद्धाची खुमखुमी कधीच कमी झालेली नव्हती. आताही ती झाली असेल, असे म्हणायला वाव नाही; पण राफेल विमाने, रशियन रणगाडे यामुळे गेल्या पाच वर्षांत भारतीय लष्कराचे जे सामर्थ्य बळावलेे, भारताची अमेरिकेशी वाढती जवळीक आणि त्याचवेळी पाकिस्तानात इम्रान खान यांचे जे सरकार स्थापन झाले त्यामुळे पाक या धोरणापर्यंत पोहोचला असावा. 1992 मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने क्रिकेट विश्वचषक जिंकला. तो चषक स्वीकारल्यानंतर दुसर्‍या दिवशी इम्रान खान यांचे विधान होते, 'हा विश्वचषक पाकिस्तानसह संपूर्ण भारतीय उपखंडाचा'. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले; पण ते करताना अभिनंदन वर्धमान हा भारतीय अधिकारी पाक लष्कराच्या हाती लागला; मात्र दोनच दिवसांत त्यांना सुखरूप भारतात पाठवण्यात आले. 1999 च्या युद्धात स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा हेही अशाच पद्धतीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकच्या हाती लागले होते; मात्र ते जिवंत परतले नाहीत, हा इतिहास आहे. दुसरीकडे इम्रान यांचे नेतृत्व पाकला संघर्षाच्या वाटेवरून परावृत्त करण्यासाठी प्रयत्नरत दिसते, असे धाडसाने म्हणता यायचे नसले, तरी त्यांनी नरमाई दाखवली आहे, इतकेच.

2008 च्या मुंबई हल्ल्यानंतरही भारताने पाकवर हल्ला न करता आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकची नाकाबंदी करून पाकिस्तानी भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ नये, याची हमी तिथल्या नागरी सरकारनेच घेतली पाहिजे, असे वेळोवेळी स्पष्ट केले. त्याआधी 1999 च्या कारगिल युद्धानंतरही तीनच वर्षांत भारताने व्यापाराच्या बाबतीत पाकला 'प्रथम पसंतीचे राष्ट्र' हा दर्जा दिला. थोडक्यात, भारताने पाकच्या संघर्षमय कृतीला फार कमी वेळा संघर्षाने आणि अधिकतर वेळा संवादाच्या मार्गाने प्रत्युत्तर दिले आहे. हे एकीकडे असताना गेल्या दोन वर्षांत अण्वस्त्रधारी राष्ट्रांच्या वर्तनामुळे मानवी समूहाचेच अस्तित्व धोक्यात येतेय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अधिक शक्तिशाली असणार्‍या शेजार्‍याशी कायम वैर नको, अशी उपरती पाकच्या नागरी नेतृत्वाला झाली असल्यामुळे त्यांनी 'युद्ध नको' धोरण आखले असावे. आता उरतो तो दुसरा मुद्दा, पाकिस्तान यावर अंमल करणार का? 1971 च्या युद्धात भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तानची फाळणी झाली आणि बांगला देशाची निर्मिती झाली. ती सल पाक लष्करी अधिकार्‍यांच्या मनात आजही ठसठसत आहे. 1999 चे कारगिल युद्ध हा त्याचाच परिपाक होता. उल्लेखनीय म्हणजे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांची गळाभेट घेत असताना त्यांचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ भारतीय भूभाग बळकावण्याची योजना आखत होते. ते स्वतः त्या काळात दोनदा कारगिलला येऊन गेले, ही कबुली नंतर त्यांनी दिली. ही साधारण 'हिंदी-चिनी भाई भाई' या चिनी धोरणासारखीच बनवेगिरी होती. त्यामुळे पाकच्या नागरी नेतृत्वाचे प्रत्येक धोरण त्यांचे लष्कर मान्य करेलच, असे नाही. जगात सर्वाधिक वेळा लष्करी सत्तेच्या हातात कुठला देश गेला असेल, तर तो पाकिस्तान. पाक लष्कराने आपल्या राष्ट्राध्यक्षांनाही फासावर लटकावले होते. बेनझिर भूत्तो यांच्या हत्येतही लष्करी अधिकारी सामील होते. थोडक्यात, जे नेतृत्व भारताशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी उत्सुक असते, ते पाक लष्कराला नकोसे असते. भारताशी संबंध सुधारण्यात सर्वात मोठा अडथळा पाक लष्कराचा आहे, तो त्यामुळेच. सीमेवरील पाकच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. अफगानीस्तानातील तालिबानी घुसखोरांचा धोकाही वाढला आहे. परिणामी, पाकचे हे नवे 100 पानी धोरण 100 वर्षांसाठी भारताशी युद्ध नको, असे म्हणत असले, तरी पाक लष्कराचे नापाक इरादे कधीच लपून राहिलेेले नाहीत. त्यामुळे भारताला गाफील राहून चालणारच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news