Ekadashi July 2021 : पंढरीच्या वारीतील स्त्री विश्व | पुढारी

Ekadashi July 2021 : पंढरीच्या वारीतील स्त्री विश्व

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

शेखर राजेशिर्के (लेखक माहितीपट निर्माते आहेत)

वारीत स्त्रियांची संख्या लक्षणीय असते. त्यातल्या नव्वद टक्के महिला कष्टकरी. कदाचित शिक्षण नावापुरतचं पण हरिपाठ, अभंग, ओव्या, गौळणी, भारूडं त्यांना तोंडपाठ. वारीतल्या बहुजन समाजातल्या महिलांचे हे विशेष मौखिक धन आपला सांस्कृतिक वारसा आहे.

वारीतील सर्पदंश जनजागरण निमित्ताने खरेतर मी पहिल्यांदाच वाखरी फाट्यावर पोहोचलो. आमची राहण्याची व्यवस्था वाखरी फाट्यावर. पालखी सोहळ्यापासून पुढच्या अंगाला 4 कि.मी. दूर होती. दुसर्‍या दिवशी वाखरीत महत्त्वाचा रिंगण सोहळा पाहता येणार होता. सकाळी जेव्हा मैदानाकडे उलट्या दिशेने चालायला सुरुवात केली तेव्हा समोरून वारकर्‍यांचा महासागर अंगावर आला. 18 दिवस उन्ह-पावसाची तमा न बाळगता ते पांडुरंगासाठी चालत होते. रस्त्याच्या उतारावरून क्षितिजापार पसरलेला वारकर्‍यांचा महासागर डोळ्यात मावत नव्हता. अचानक तीस-चाळीस कष्टकरी महिला वारकर्‍यांचा जथ्था दिसला. सर्व पन्नाशीच्या पुढच्या असल्या तरी सैनिकी शिस्तीत वेगात चालत होत्या व सामुदायिकपणे भजने गात चालल्या होत्या.

शंभू कैलासी जातो,वाहन नंदीचं घेऊनं,
वरी वाघाचं आसन…

हे काहीतरी वेगळेच माझ्या कॅमेर्‍यात बंदिस्त झाले होते. मैदानात एक एक दिंडी येत होती. दिंडीतले वारकरी लोकसंगीत लोकनृत्यांचा गजर करीत होते. वासुदेव, गवळण, भारूडे, फुगड्या, मृदंगवादन, मनोरे, वारकरी नृत्य अशी सर्वत्र रेलचेल. इकडे बघू की तिकडे बघू या गडबडीत समोरच दोन बायका वार्‍यावर साडी वाळवत उभ्या दिसल्या. नंतर समजले, की गरिबीमुळे बहुतांशी महिला वर्ग दोन साड्यांवरच वारी पूर्ण करतो. शेजारच्याच दिंडीत एक महिला भांडणाच्या आवेशातच गात होती.

जाते विठूला भांडायला,
लुगडं नाही मला नेसायला गं…

या सर्व उत्सवी वातावरणात स्त्रियांचा उत्साह व सहभाग उच्चकोटीचा होता. बहुतांशी स्त्रिया पन्नाशीच्या पुढच्याच. 18 दिवस चालूनही 16 वर्षांच्या मुलींच्या वरताण त्यांच्यात ऊर्जा होती. धावताना, खेळताना धडपडल्या तरीही उठून, पुन्हा धावत होत्या. फुगड्या खेळत होत्या, गाणी म्हणत होत्या, नाचत होत्या. त्या सर्व गाण्यांत त्यांचा लाडका विठू होता. वारीत अभंगाच्या मार्गाने भक्तिमार्ग साधला जातो हे नक्की, परंतु विठूशी निगडित गवळणी, भारूडं, ओव्या अशी लोकगीते गाता गाता व बेभान नाचण्यानेही ब्रह्मानंदी टाळी साधली जाते, हे मी प्रत्यक्ष अनुभवत होतो.

एका दिंडीतील दोन महिलांनी फुगडी खेळायला सुरू केली. एकीच्या डोक्यावर तुळशीवृंदावन तर दुसरीच्या डोक्यावर पाण्याने भरलेला मोठा हंडा. तशा त्या वयस्करच होत्या. फुगडी संपली त्याक्षणी हंडेवाली बाई वेगात हंड्याच्या वजनामुळे जोरात भिरकावली गेली इतर बायकांच्या अंगावर! त्या घोळक्याने तिला तिच्या हंड्यासमवेत चांगलेच सावरले व लगेच त्या बायकांनी ‘ज्ञानोबा-तुकारामा’चा गजर केला. शेजारच्या दिंडीत बायकांनी पदर धरलेला असतो व मुखी गाणे असते.

एवढं शेजारणीनं केलं ग बया,
मला पंढरीला नेलं ग बया…

18 दिवसांतल्या अनुभवांची गुंफण करीत म्हटलेलं हे सुंदर गाणं जणू संपूर्ण वारीचाच सार. त्यांची ते गाणं नाचत म्हणण्याची पद्धत केवळ अफलातून.

एव्हाना रिंगण सोहळ्याची वेळ झाली. रिंगणाचे मुख्य आकर्षण असते दोन अश्वांची दौड. एका अश्वावर जरीपटका घेतलेला स्वार होता तर दुसरा अश्व मोकळा होता. त्यावर ज्ञानेश्वरमाऊलींची बैठक असते, अशी वारकर्‍यांची श्रद्धा आहे. दोन अश्व उधळले व वार्‍याच्या वेगाने रिंगणात धावू लागले. त्यांच्या टापांनी उडवलेली पवित्र धूळ डोईस लावण्यासाठी वारकर्‍यांची धांदल उडाली. या अश्वांनी रिंगणाला वेगाने धावत तीन फेर्‍या मारल्या. त्यानंतर वर्षांत असे तीन रिंगण सोहळे पाहिले; परंतु मुख्य हेतू होता ते रिंगणस्थळी रंगणार्‍या लोकमहोत्सवाचा. स्त्रियांमध्ये अभंगांपेक्षा ओव्या, गौळणी व भारूडे हे कलाप्रकार प्रिय. त्यांची रेलचेल तर जिकडे तिकडे.

देवाची फुगडी खेळते, आईची फुगडी खेळते,
पहिली फुगडी चंद्रभागी…
असे सात फुगड्यांचे गाणे. तसेच
या तुळसीचं पानं अन् पांडुरंगाच करा ध्यान।

किंवा

झग्याला शिवला काठं,
अन् त्यावर लिवला हरिपाठ।
झगा झगा, झगा शिवला नवा,
न बाई मी लहान होती तेव्हा॥
अशी भारूडे..

डोईवर माठ, पदर कंबरेला,
राधिका निघाली पाण्याला॥
गोकुळच्या गावाला बोलवा गं,
दह्याचा माठ हलवा गं॥
राधिका निघाली पाण्याला।
अशा गौळणी…

या अशा खास स्त्रियांनी जपलेल्या लोकसंगीताने पंढरीची वारी समृद्ध झालेली असते. वारीत महिलांची संख्या लक्षणीय असते. त्यातल्या नव्वद टक्के महिला या कष्टकरी. कदाचित शिक्षण नावापुरतचं पण हरिपाठ, अभंग, ओव्या, गौळणी, भारूडं त्यांना तोंडपाठ. वारीतल्या बहुजन समाजातल्या महिलांचे हे विशेष मौखिक धन आपला सांस्कृतिक वारसा आहे. झिम्मा, बसफुगडी, कोंबडा अशा कित्येक खेळांचा या स्त्रिया भरघोस आनंद घेतात. कॅमेरा समोर दिसला की जरा जास्तच खुलतात. त्यांचे हे बिनधास्तपण व प्रतिकूल परिस्थितीत आनंदाने जगणे खूपच भावले. अगणित लोकगीते व लोककथा या महिला वारकर्‍यांना तोंडपाठ असतात.

सातशे ते आठशे वर्षे संतसाहित्य मौखिक परंपरेने जतन करून, पर्यायाने मराठी भाषा टिकवण्याचे व समृद्ध करण्याचे काम महाराष्ट्रातील अशिक्षित कष्टकरी वारकरी करीत आहे. यात महिला वारकर्‍यांचा वाटा नक्कीच महत्त्वाचा. स्त्रीस्वातंत्र्य ही संकल्पनाच अस्तित्वात नसल्याच्या काळात मुक्ताबाई, निर्मळा, जनाई, सोयराबाई, कान्होपात्रा या महिला संतांनी आपले संत साहित्यातले स्थान पक्के केले. परमार्थ करण्यात स्त्रियाही उच्चपदाला पोहोचू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. कालांतराने स्त्रियाही माळकरी होऊन वारी करू लागल्या.

तर, हा पाचएक तासांचा अनुभव; परंतु मी गुंग होऊन गेलो. ‘पंढरीच्या वारीतील स्त्री विश्व’ या विषयावरही चांगला माहितीपट तयार होऊ शकतो, असे मनोमन वाटले. वारीतले लोकसंगीत व त्यातला स्त्रियांचा सहभाग हा विषय डोक्यात ठेवला. पुढे दोन वर्षे सलग वारीत येता आले. गेल्या सातशे वर्षांपासून गरजत असलेला हा महिलांनी मांडलेला लोकसंगीताचा गजर मी कॅमेर्‍यात बंदिस्त करू लागलो. आता महिलांच्या लोकसंगीतावर आधारित माहितीपट पूर्ण होईल. तरी अजूनही वारीच्या बर्‍याच पैलूंचे दस्तऐवजीकरण व्हायला हवे; परंतु ही दोन वर्षे वारीशिवाय काढावी लागली. अवघे वारकरी किती कासावीस असतील याची कल्पनाही करणे अशक्य. कोरोना महामारीच्या संकटाचे लवकरच निवारण व्हावे आणि वारी लवकरच पूर्ववत होवो, अशी विठुरायाचरणी प्रार्थना.

Back to top button