बेगानी शादी में अब्दुल दीवाना! | पुढारी

बेगानी शादी में अब्दुल दीवाना!

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अलीकडचे शिवसैनिक राज्यमंत्री अब्दुल सत्तार एकत्र आले की, हसण्यावारी न्यावे असे राजकारण त्या दिवसापुरते जन्म घेते आणि त्याच दिवशी मावळते. एक तर सत्तार यांना शिवसेना-भाजप युतीचे काहीच माहिती नाही किंवा खूप जास्त माहीत आहे. युतीची किल्ली गडकरींच्या हाती आहे, असे सांगून त्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याच अधिकारक्षेत्राला हात घातला. युतीची किल्ली गडकरींच्या हाती असल्याचे जाहीर करताना त्याचा धक्का कुठे बसणार आहे हे सत्तार जाणून होते.

दोन लोक एकत्र आले की राजकारण सुरू होते, अशी राजकारणाची सार्वकालीन जन्मकथा सांगितली जाते; पण हे दोघे कोण, यावरही जन्म घेणार्‍या राजकारणाची प्रतवारी अवलंबून असू शकते. आता भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अलीकडचे शिवसैनिक राज्यमंत्री अब्दुल सत्तार एकत्र आले की, हसण्यावारी न्यावे असे राजकारण त्या दिवसापुरते जन्म घेते आणि त्याच दिवशी मावळते. माध्यमांनाही औटघटकेचे ताजे विषय हवे असतात आणि मग ब्रेकिंग बुडबुडे सोडले जातात. गेल्या आठवड्यात सत्तार दानवेंना भेटले. सत्तार हे सिल्लोडचे. सिल्लोड अजून रेल्वे मार्गावर नाही. तरीही सिल्लोडचे म्हणून काही रेल्वे प्रश्न असू शकतात. सत्तारांना रेल्वेत बसून मुंबई गाठायची असेल तर त्यांना तीन पर्याय आहेत. तुलनेने दूर असलेले जळगाव, बांधाला बांध असलेले जालना आणि औरंगाबाद स्टेशनवरून ते रेल्वे गाठू शकतात. सिल्लोडमधूनच रेल्वेत कसे बसता येईल, हा प्रश्न घेऊन बहुधा ते रेल्वे राज्यमंत्री दानवेंना भेटले असावेत. भेटीला निमित्त असावे तसे रेल्वेचे निमित्त सांगून सत्तार यांनी मग शिवसेना-भाजप युतीची नवी किल्ली फिरवली आणि बाजूला पडलेल्या चर्चेचे कुलूप उघडले. शिवसेना-भाजप युती कोणत्याही क्षणी होऊ शकते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठरवले तरच! गडकरींच्याच हाती युतीची किल्ली आहे, असे सत्तार म्हणाले. त्यावर माध्यमे कल्ला करू लागताच जबाबदार नेत्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्याच. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, नया है वह… सत्तारांनी निर्माण केलेली सनसनाटी शिवसेनेलाही रूचली नाही. काल-परवा सेनेत आलेले अब्दुल सत्तार निमंत्रण नसताना मंडप गाठतात आणि बेधुंद नाचतात. ‘बेगानी शादी में अब्दुल दीवाना,’ अशी त्यांची अवस्था आहे. ज्या युतीची कोणतीही अधिकार सूत्रे नाहीत, ती युती पुन्हा जुळवून आणण्याची विधाने ते अधूनमधून सतत करत असतात. त्यांचा वकूब दाखवून देत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, सत्तारांची हळद अजून उतरलेली नाही! हे खरे असले तरी सत्तार स्वत:ला नवी नवरी समजत नाहीत. शिवसेनेच्या ज्येष्ठ-श्रेष्ठ नेत्यांच्याही पुढे जाऊन ते भाजप नेत्यांना म्हणण्यापेक्षा फक्त दानवेंनाच भेटतात आणि युतीची चर्चा सुरू करतात. सत्तारांचे आता अती झाले, हे लक्षात आले तरी चंद्रकांत खैरेंसारखा जिल्हा शिवसेना नेता हतबलपणे पाहत राहतो. सत्तारांना आणले कुणी, वाढवले कुणी आणि त्यांच्या हाती युतीची बोलणी करण्याचे अधिकार दिले कुणी, याची उत्तरे शोधूनही खैरे यांना सापडलेली नसावीत. त्यामुळे सत्तार ‘सत्ते पे सत्ता’ करीत युतीच्या चर्चा घडवत राहणार. याचे कारण एक तर सत्तार यांना शिवसेना-भाजप युतीचे काहीच माहिती नाही किंवा खूप जास्त माहीत आहे. युतीची किल्ली गडकरींच्या हाती आहे, असे सांगून त्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याच अधिकारक्षेत्राला हात घातला. त्यानुसार पहिली प्रतिक्रिया फडणवीस यांचीच आली. गडकरींच्या हाती युतीची किल्ली असेल तर फडणवीस मुख्यमंत्री नसतील हे भाजपमधील लहान-थोरही जाणतात. त्यामुळेच युतीची किल्ली गडकरींच्या हाती असल्याचे जाहीर करताना त्याचा धक्का कुठे बसणार आहे हे सत्तार जाणून होते. युतीच्या दुखर्‍या जागा त्यांना किमान माहिती आहेत, असा अंदाज यावरून बांधता येतो. असे असले तरी आपण युतीच्या चर्चेत निमंत्रित नाही, आपण अजूनही युतीच्या लग्नातील वर्‍हाडी नाही, बेगानी आहोत, बिनबुलाए मेहमान आहोत, हे सत्तारांना मान्य नसावे. तेे नीट कळेपर्यंत त्यांच्या दानवेंसोबतच्या शिखर परिषदा थांबणार नाहीत आणि न होणार्‍या युतीच्या चर्चाही!

…………………………………………………………………………………………………………………….

पुरुष मजूर ठेवण्यासाठी बीडीडी चाळ नावाच्या ज्या ‘मानवी वखारी’ उभारण्यात आल्या, त्यांच्यावर हातोडा पडण्यास सुरुवात झाली. गिरण्या आणि मुंबई बंदरात काम करणारे मजूर तिथे दाटीवाटीने राहात. ब्रिटिशांनी केलेली ही व्यवस्था पुढे बीडीडी चाळ म्हणून नावारूपाला आली आणि मुुंबईची संस्कृती बनली. सामाजिक, राजकीय आणि वाङ्मयीन चळवळींचेही केंद्र बनली. परळच्या बीडीडी चाळीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरही राहिले आहेत. नायगावात अशा 42, तर परळमध्ये 32 आणि वरळीत सर्वाधिक 121 चाळी आहेत. 17 हजार कोटी रुपये खर्चून या चाळींचा पुनर्विकास म्हाडाने हाती घेतला. दादरच्या नायगावपासून या चाळी पाडण्यास सुरुवात झाली. 150 चौरस फुटांच्या खोलीत राहणार्‍या 7 हजार कुटुंबांना 500 चौ.फु.चे घर मिळेल. या चाळींच्या जागी टोलेजंग टॉवर्स उभे राहतील तेव्हा मुंबईचे केवळ भौगोलिक क्षितिज बदलेल असे नाही. मुंबईचे सामाजिक क्षितिजही बदलेल, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड यांच्याकडे झोपडपट्टी पुनर्वसनही येते. मुंबईतील असंख्य झोपु योजना रखडलेल्या आहेत. ज्या झोपड्यांच्या जागी टॉवर उभे राहिले, तिथे नवे गावकूस निर्माण झाले. खुल्या बाजारासाठीची इमारत वेगळी आणि एसआरएसाठीची इमारत वेगळी. ही इमारत म्हणजे आडवी झोपडपट्टी एका उभ्या टोलेजंग झोपडपट्टीत आल्यासारखे वाटते. खुल्या बाजारासाठीच्या इमारतीतून ही उभी झोपडपट्टी दिसणार नाही, अशी काळजी घेतली जाते. बीडीडी चाळींप्रमाणे मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचेही सामाजिक क्षितिज बदलू द्या. आव्हाडच ते बदलवू शकतात.

Back to top button