लवंगी मिरची : अजब इच्छा!

लवंगी मिरची : अजब इच्छा!
Published on
Updated on

नाही, म्हणजे मान्य आहे की, तुम्हाला बरेचसे काही व्हावेसे वाटते. कुणाला वाटते, आपण फिल्म स्टार व्हावे म्हणजे अवतीभोवती रमणीय हिरवळ असेल आणि त्यामध्ये आपले आयुष्य आनंदात जाईल. कुणाला वाटते, आपण राजकीय नेता व्हावे म्हणजे आपल्या हातात भरपूर पैसा आणि सत्ता येईल. कुणाला काही, तर कुणाला काही. सगळ्यांनाच ते शक्य होईल असे नसते. पण जपानमधील टो नावाच्या एका गृहस्थाला आपण कुत्रा व्हावे असे वाटले. कदाचित आजकाल घरोघरी होत असलेले कुत्र्यांचे लाड पाहून कुणालाही असे वाटेल की, लाईफ कशी असावी तर कुत्र्यासारखी. म्हणजे जेवणाखानाचे लाड करायला मालक, मालकीण आहेत, फिरायला जाण्यासाठी प्रशस्त आणि आरामशीर गाडी आहे. दर पंधरा दिवसांनी अभ्यंग स्नान घालण्यासाठी कुत्र्यांची ब्युटी पार्लर आहेत. एकंदरीत म्हणजे काहीही काम न करता आयुष्यभर ऐष करणार्‍या कुत्र्यासारखे आपले आयुष्य असावे, असे या जपानमधील टो नावाच्या व्यक्तीला वाटले.

तुमच्या लक्षात आले असेल की, विकसित देशांमधील नागरिकांना त्यांच्या मनात येईल ते करता येते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्याकडे लागेल तेवढा पैसा असतो. या गृहस्थांनी कुत्रा व्हायचे ठरवले आणि तब्बल 40 दिवस भरपूर मेहनत करून कुत्र्याची कातडी अंगावर पांघरून घेऊन हे टो नावाचे गृहस्थ भुऽऽ भुऽऽ झाले. आता पुढचा प्रयोग होता तो म्हणजे आपण कुत्र्यासारखे चालत जायचे आणि आजूबाजूच्या परिसरातील श्वान आपल्याला कसा प्रतिसाद देतात ते पाहायचे. असे फिरताना रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ त्यांनी यू ट्यूबवर अपलोड केला आणि आज जगभरात दररोज लाखो लोक तो पाहात आहेत. आता कुत्रा झालेले टो इलेक्ट्रिकचा खांब दिसला की काय करतात याविषयी या व्हिडीओमध्ये काहीही दाखवलेले नाही. परंतु आपल्या मैत्रिणीबरोबर साखळीला बांधून घेऊन बागेमध्ये फिरणारे टो अवघ्या जगाने पाहिले. परिसरातील श्वान साहजिकच हा कोण नवीन कुत्रा आपल्या एरियात आला म्हणून कुतूहलाने आणि भीतीने त्यांच्याकडे पाहात होते. सहसा श्वानांची एक सीमारेषा त्यांच्या मनात आखलेली असते. त्या सीमारेषेमध्ये एखादा परका किंवा परप्रांतीय श्वान आला की स्थानिक श्वान एकत्र येऊन त्या बाहेरच्या श्वानावर भुंकून, त्याच्या अंगावर धावून जाऊन हाकलून लावतात. साहजिकच टो यांना तसाच रिस्पॉन्स परिसरातील श्वानांनी दिला.

या प्रकरणावरून लक्षात येणारी गोष्ट काय आहे ते समजून घेऊया. म्हणजे बघा, स्त्रियांना पुरुष व्हावेसे वाटणे किंवा पुरुषांना स्त्री रूपामध्ये जावेसे वाटणे हे आता जगातील अनेक देशांमध्ये मान्य झाले आहे. पण कोणाला उद्या कुत्रा व्हावेसे वाटणे किंवा बोका व्हावेसे वाटणे याची ही नवीन सुरुवात म्हणावी लागेल. विज्ञान जगाला कुठे नेऊन सोडेल हे काही सांगता येत नाही. श्वानरूप धारण करणार्‍या टो यांनी इलेक्ट्रिसिटीच्या खांबावर इतर कुत्र्यांसारखी तंगडी वर केलेली पाहिली की, अखिल मानवजातीचा जन्म धन्य होऊन जाईल. येत्या काळात काय काय पाहावे लागणार आहे, याची कल्पना केली तरी काही लोकांच्या अंगावर काटा येईल आणि आपण काहीही होऊ शकतो हे लक्षात आले तर काही लोकांच्या अंगावर रोमांच उभे राहतील!

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news