असे असावेत शेजारी!

असे असावेत शेजारी!

अहो ऐकलं का? मी काय म्हणते, घर बांधण्यासाठी आपण परवा गावाबाहेर प्लॉट घेतलाय ना तो विकून टाकूयात आणि थोडासा लहान का होईना; पण चांगल्या वस्तीमध्ये प्लॉट घेऊयात. म्हणजे शेजार गडगंज मिळेल हो!

अगं, वेड्यासारखं काय बोलतेस. शेजारीपाजारी साधे, सरळ लोक असलेले चांगले असतात. वेळप्रसंगाला ते आपल्यासाठी धावून येतात. जीवाला जीव लावणारे लोक म्हणजे साधेसुधे लोक. हे काय तू गडगंज शेजारी लोकांचे काढले आहेस?

अहो, मी कालच पेपरात बातमी वाचली ती आधी तुम्हाला सांगते. एका लाचखोर श्रीमंत माणसाच्या घरी अँटिकरप्शन ब्युरोची धाड पडली, त्याची बातमी होती. त्याच्या घरी खूप कॅश होती म्हणे! तर, धाड टाकणारे लोक आल्याबरोबर घरातील लोकांची खूप धांदल उडाली म्हणे! प्रचंड मोठी कॅश होती. त्यापैकी त्या अधिकार्‍याच्या बायकोने दोन कोटी रुपये शेजार्‍याच्या गच्चीवर फेकले म्हणे! म्हणून म्हणते, व्यापारी, कंत्राटदार,अधिकारी वर्गाच्या, सोसायट्या असतात ना तिथे कुठेतरी प्लॉट घ्या. म्हणजे, जर उद्या आपल्या शेजारी धाड पडली, तर त्यांनी जाऊदे दोन-चार कोटी रुपये पण गेलाबाजार पन्नास-साठ लाख रुपये आपल्या घरात फेकले, तरी आपल्या मुलांच्या आयुष्याचे कल्याण होईल. म्हणून म्हणते आधी तो प्लॉट विका आणि श्रीमंत लोकांच्या वस्तीत दुसरा प्लॉट घ्या!

अगं, वेड लागलंय की काय तुला? हाच प्लॉट आपण किती प्रयत्नाने घेतलाय. काही पण डोक्यात आणू नकोस. याच प्लॉटवर छान असं टुमदार घर बांधूयात आणि सुखाचा संसार करूयात.

जळली मेली तुमची कर्मदरिद्री लक्षणं! अशाने कधी आपण श्रीमंत होणार देवच जाणे! झटपट श्रीमंत होण्याचा साधा सोपा मार्ग सांगतीय; पण तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल तर शप्पथ! अहो, त्या अधिकार्‍याकडे एव्हढी कॅश सापडली म्हणे की, ती मोजायला चार-पाच नोटा मोजायची यंत्रे मागवावी लागली म्हणे! आपल्याला त्याच्याशी काय करायचे आहे? आपण फक्त आपल्या गच्चीवर लक्ष ठेवून राहायचे. पडल्या नोटा की घेऊन ठेवायच्या. नंतर त्या आपल्याच होतात. तुम्ही किनई मला गच्चीवर एक रूम बांधून द्या. मी तिथेच बसून राहीन. माझे जेवण-खाण सगळे तिथेच करीन. सोबत फेकलेल्या नोटा गोळा करण्यासाठी दोन पोती पण आणून द्या. समजा तिथे आपल्याला प्लॉट घेऊन घर बांधणे नाही झाले, तर किमान किरायाने तरी घर आजुबाजूला बघा. आपली भाग्यरेखा उजळल्याशिवाय राहणार नाही.

म्हणजे, अवैध मार्गाने पैसा कमावणारे व्यापारी, कंत्राटदार, भ—ष्ट अधिकारी यांचा शेजार तुला हवाय? अगं, साधी गोष्ट समजून घे. आपल्या स्वकष्टाच्या पैशामध्ये आपल्याला काही कमी पडले काय? नाही, होते अडचण कधीकधी पण निभावून जातेच ना? काही कुठल्या पैशाचा मोह धरू नकोस. चल, आज आपल्या घराच्या प्लॉटवर भूमिपूजन करायचे आहे. आधी आपल्या प्लॉटवर चल, टुमदार घर बांधू आणि जे मिळेल त्यात संसार करू. खरे तर नातेवाईकांपेक्षा चांगले शेजारी खरे सगेसायरे असतात. एखादी दुःखद घटना घडल्यानंतर पहिल्यांदा शेजारीच मदतीला धावून येतात. त्यामुळे शेजारी म्हणून कोणाची निवड करायची, हे आपल्या हातात नसले, तरी त्यांची निवड करताना नक्कीच चोखंदळपणा दाखवायला हवा.

– झटका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news