

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर आज (दि. १७ ) रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह शहराला पुन्हा एकदा लक्ष्य केले, असे वृत्त 'एपीएफ'ने दिले आहे. ( Russian strikes ) एक आठवड्यापूर्वी रशियाने कीव्ह हवाई हल्ला केला होता,रशिया आणि युक्रेन युद्धाला आता सुमारे नऊ महिने होत आले आहेत. रशियाने मागील काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे.
कीव्हचे महापौर व्हिटली क्लिचको यांनी टेलिग्राम वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "आज पहाटे स्फोटांनी शहर हादरले. शहरातील मध्यवस्तीतून मोठे आगीचे लोट उसळल्याचे दिसले. अनिवासी इमारतींना आग लागली. अनेक अपार्टमेंटचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाच्या लष्कराकडून आता ड्राेनने हल्ले होत आहेत. शहरातील पायाभूत सुविधानांना रशियाचे लष्कर ड्राेनने उद्ध्वस्त करत आहेत. मात्र अद्याप या हल्ल्यानंतर जीवितहानीबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही."
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख एंड्री यांनी म्हटले आहे की, रशियाकडून आता ड्रोन हल्ले सुरु झाले आहेत. मागील आठवड्यात क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत होते. यामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले होते.
मागील आठवड्यात झालेल्या हल्ल्यात क्रीमिया आणि युक्रेनला जोडणारा पुलावर हल्ला करण्यात आला होता. युक्रेनमधील लष्कराला मिळणार्या मदत ठप्प करणे हा यामागील हेतू होता. मात्र या हल्ल्यांचा पुलावर परिणाम झाला नाही. काही तासांनंतर येथील वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली होती. यानंतर आता रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवरील हल्ले तीव्र केले आहेत.
रशिया आणि युक्रेन युद्धाच्या सुरूवातीला रशियन सैन्याने कीव्हवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. यानंतर मागील काही आठवडे रशियाच्या सैन्याने कोणतीही हालचाल केली नव्हती. मात्र मागील आठवड्यात पहाटेचे कीव्हवर हवाई हल्ला कर्यात आला होता. रशिया आणि युक्रेन युद्धाला आता सुमारे नऊ महिने होत आले आहेत. रशियाने पुन्हा एकदा हल्ला केल्याने राजधानी कीव्हमधील नागरिक दहशतीखाली आहेत.