

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : युक्रेन-रशिया युद्धाला (russia ukraine war) आता 50 दिवस पूर्ण होत आले असून अजूनही रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हवर ताबा मिळविण्यात यश आलेले नाही. यातच आता रशियाने युक्रेनच्या पूर्व भागात जोरदार हल्ल्याची तयारी केली आहे. उपग्रह छायाचित्रांतून रशियन फौजांच्या तशा हालचाली टिपल्या गेल्या आहेत. या छायाचित्रांत बेल्गोरोद येथे रशियाच्या फौजा दिसून येत आहेत.
रशियन सैन्यावर नजर ठेऊन असणार्या अमेरिकेच्या मॅक्सार टेक्नॉलॉजीजने ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. यात रशियाचे रणगाडे दिसून येत आहेत. दरम्यान, युक्रेनच्या 162 अधिकार्यांसह 36 व्या मरीन ब्रिगेडच्या 1026 नौसैनिकांनी मारियुपोल येथे शरणागती पत्करल्याचा दावा रशियाने केला आहे.
पुतीन यांच्या निकटवर्तीयाला अटक (russia ukraine war)
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे, व्हिक्टर मेदवेदचुक यांना युक्रेनच्या गुप्तचर यंत्रणांनी अटक केली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलदोमीर झेलेन्स्की यांनीही मेदवेदचुक यांचे एक छायाचित्र सोशल मीडियातून शेअर केले आहे. रशियाने आक्रमण करण्यापूर्वी युक्रेनमध्ये विरोधी पक्ष नेते मेदवेदचुक यांना देशद्रोहाच्या खटल्यात नजरकैद केले होते. पण, युद्धास सुरुवात झाल्यानतंर ते गायब झाले होते. आता त्यांना पुन्हा पकडण्यात आले आहे. पुतीन हे माझ्या धाकट्या मुलीचे गॉडफादर असल्याचे मेदवेदचुक यांनी नेहमी सांगितले आहे.
झेलेन्स्कींचा रशियासमोर प्रस्ताव (russia ukraine war)
मेदवेदचुक यांच्या अटकेनंतर झेलेन्स्की यांनी रशियासमोर एक प्रस्ताव ठेवत जर मेदवेदचुक रशियाला सुखरूप हवे असतील तर ज्या युक्रेनच्या नागरिकांना या युद्धकाळात कैद केले गेले आहे, त्यांना मुक्त करावे, असे झेलेन्स्कींनी रशियाला म्हटले आहे.
युद्ध सुरूच राहणार : पुतीन
दरम्यान, युक्रेनसोबत आता शांतता चर्चा करणे शक्य नाही. युक्रेनविरोधात हल्ला सुरूच ठेवण्याची शपथ आम्ही घेतली आहे. कारण कीव्हने मॉस्कोवर ही शांतता चर्चा खंडित केल्याचा आरोप केला होता, असे पुतीन यांनी स्पष्ट केले आहे.
रशिया-फिनलँड टकरीची शक्यता
या युद्धातच आता रशिया आणि फिनलँड यांच्यातही टक्कर होण्याचा धोका वाढला आहे. फिनलँड या देशानेही 'नाटो' या संघटनेच्या सदस्यत्वासाठी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे भडकलेल्या पुतीन यांनी शस्त्रास्त्रांसह रशियन सैन्याला फिनलँड सीमेवर पाठवले आहे.