रशिया-चीन जवळीक धोकादायक

रशिया-चीन जवळीक धोकादायक
Published on
Updated on

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अचानकपणे बीजिंगला भेट देऊन जगाला आश्चर्याचा धक्का दिला. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळातील त्यांची ही पहिली परराष्ट्रभेट ठरली. बीआरआय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पुतीन चीनला गेले असले तरी त्याला अन्यही काही संदर्भ आहेत. पुतीन सध्या जगाच्या नकाशावर प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत, हे नाकारता येणार नाही. चीन आणि रशियामधील वाढती जवळीक भारतासाठी धोकादायक ठरणारी आहे.

सध्या जागतिक शांतता नव्याने संकटात सापडली आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे आणि दुसरीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन इस्रायलला पोहोचण्यापूर्वीच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी बीजिंग गाठून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. पुतीन आणि जिनपिंग यांच्यातील बैठक एखाद्या हायप्रोफाइल शोसारखी होती, ज्यावर जगाच्या नजरा खिळल्या होत्या. दोन्ही नेत्यांमधील चर्चेत मध्य पूर्वेतील संकट हा केंद्रबिंदू राहिला. दोन्ही देशांनी इस्रायलच्या कृतीवर टीका केली. रशिया आणि चीनला युद्धबंदी हवी आहे. या बैठकीचा उद्देश अमेरिकेविरुद्ध दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करणे, हा असल्याचे बोलले जात आहे. अलीकडच्या वर्षांत रशिया-चीन संबंध अधिक घट्ट होत आहेत.

रशिया आणि चीन जवळ येत असल्याने भारताची अस्वस्थता वाढणे स्वाभाविक आहे. या संबंधांमुळे चीन भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एकतर्फी कारवाई करून लष्करी दबाव वाढवू शकतो, अशी भीती आहे. चीनशी सामना करण्यासाठी भारत सैन्य मजबूत करण्यात व्यस्त आहे. लष्करी पुरवठ्यासाठी भारत रशियावर अवलंबून आहे. रशिया मात्र चीनच्या जास्तच जवळ जात आहे. रशिया आता चीनचा भागीदार आहे आणि यामुळे भारताला काही प्रमाणात त्रास होण्याची शक्यता आहे. शस्त्रास्त्रांसाठी रशियावरील अवलंबित्वामुळे हा संपूर्ण प्रश्न खूपच गुंतागुंतीचा झाला आहे.

चीनच्या वन बेल्ट, वन रोड प्रकल्पामुळे भारतही त्रस्त आहे. चीन या प्रकल्पाच्या माध्यमातून भारताला वेठीस धरत आहे. त्यामुळे बीआरआय प्रकल्पाला ब्रेक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-मध्य पूर्व-युरोप कॉरिडोरचा प्रस्ताव दिला होता. युद्धकाळात रशियाने भारताला नेहमीच साथ दिली. 1971 च्या युद्धात जेव्हा अमेरिकेने बंगालच्या उपसागरात आपला ताफा पाठवला तेव्हा रशियानेही ते थांबविण्यासाठी आपल्या युद्धनौका पाठवल्या होत्या. शस्त्रास्त्रांसाठी भारत रशियावर अवलंबून राहिला. सुमारे तीन दशकांपूर्वी भारताने रशियाशी हातमिळवणी केली. दुसरीकडे, चीनने जगात एक बहुपक्षीय शक्ती म्हणून स्वत:चा प्रचार सुरू केला होता. युक्रेनमध्ये पुतीन यांच्या आक्रमकतेनंतर चीन-रशियाची ही नवी युती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. युद्धामुळे कमकुवत झालेला रशिया चीनसाठी संपत्तीसारखा असेल. हीच बाब भारतासाठी अडचणीचे कारण बनू शकते.

रशिया-चीन मैत्री भारताला आपल्या संबंधांवर फेरविचार करण्यास भाग पाडू शकते. चीन आणि रशिया हा भारताचा पारंपरिक मित्र असल्यामुळे चीनसोबत संभाव्य युद्ध झाल्यास, तो भारतविरोधी भूमिका घेण्याची शक्यता नाही. परंतु रशियाशी संबंध सुधारून चीन भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे भारताला शह देण्याचा प्रयत्न करतानाच, दुसरीकडे अमेरिकेच्या चिंताही वाढवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पटलावर सध्या दिसत असलेली एकंदरीत परिस्थिती ही एखाद्या शीतयुद्धाचे संकेत देणारी आहे, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे. याचे कारण जागतिक राजकारणात आज उघडपणाने ध्रुवीकरण होताना दिसत आहे. एका बाजूला अमेरिका, इस्रायल, संयुक्त अरब आमिराती, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देश आहेत; तर दुसर्‍या बाजूला चीन, इराण, पाकिस्तान, उत्तर कोरिया, रशिया आदी देशांची युती तयार होत आहे. वैश्विक शांततेसाठी ही स्थिती चिंता वाढवणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news