

जयपूर; वृत्तसंस्था : कर्णधार शुभमन गिलसह आघाडीचे सर्व फलंदाज बाद झाले असताना गुजरातच्या राहुल तेवटिया, शाहरूख खान आणि राशीद खान यांनी शेवटच्या 28 चेंडूंत 64 धावा करण्याचे दिव्य कर्म करून गुजरात टायटन्सला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. संजू सॅमसन व रियान पराग यांनी राजस्थान रॉयल्सला 3 बाद 196 अशी मजबूत धावसंख्या उभारून दिली. गुजरात ही लढाई हरेल, असे वाटत असताना तळाच्या फलंदाजांनी 3 विकेटस्नी गुजरातला विजयी केले. (RR vs GT)
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर 197 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातला शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात करून दिली. पॉवरप्लेमध्ये दोघांनी मिळून 42 धावा जोडल्या. गुजरातने आघाडीचे सर्व गोलंदाज वापरून पाहिले, पण त्यांना यश येत नव्हते. अशावेळी कुलदीप सेन संघाच्या मदतीला धावला. त्याने आधी साई सुदर्शनला (35) बाद केले. त्यानंतर एकाच षटकात मॅथ्यू वेड (4) आणि अभिनव मनोहर (1) यांचा त्रिफळा उडवला. सेनने गुजरातला सलग तीन धक्के दिल्यानंतर यजुवेंद्र चहल याने दोन धक्के दिले. त्याने आधी विजय शंकर (16) ला बाद केले. नंतर सेट फलंदाज शुभमन गिलला वाईड बॉलवर यष्टिचित केले. गिलने 44 चेंडूंत 72 धावा केल्या. (RR vs GT)
यावेळी गुजरातची धावसंख्या होती 5 बाद 133 धावा. त्यांना विजयासाठी हव्या होत्या 28 चेंडूंत 64 धावा. गुजरातचे राहुल तेवटिया आणि शाहरूख खान मैदानावर होते. चहलच्या चौथ्या षटकात 14 धावा आल्या. सतरावे षटक टाकणार्या रविचंद्रन अश्विनवर शाहरूखने हल्ला चढवला. या षटकात 17 धावा आल्या. 18 व्या षटकात आवेश खानने शाहरूखला बाद करून फक्त 7 धावा दिल्याने राजस्थानच्या आशा पल्लवित झाल्या. गुजरातला शेवटच्या 12 चेंडूंत 35 धावांचे टार्गेट उरले. 19 व्या षटकांत कुलदीप सेनने तब्बल 20 धावा दिल्या. शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी आवेश खानवर होती. त्याच्या पहिल्या तीन चेंडूंवर राशीद खानने 4, 2, 4 अशा दहा धावा घेतल्या. चौथ्या चेंडूवर 1 धाव निघाली. त्यामुळे दोन चेंडूंत 4 धावा करायच्या होत्या. पाचव्या चेंडूवर तेवटीयाने दोन धावा घेतल्या पण तिसरी धाव घेताना तो धावचित झाला; पण राशीद खानने शेवटचा चेंडू कव्हर पॉईंटवरून सीमापार धाडून गुजरातचा अविश्वसनीय विजय साजरा केला. तो 24 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला. गुजरातने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजी दिली. यशस्वी जैस्वाल (24) आणि जॉस बटलर (8) स्वस्तात बाद झाल्याने राजस्थान अडचणीत सापडला होता; पण कर्णधार संजू सॅमसन व रियान पराग यांनी तिसर्या विकेटसाठी 78 चेंडूंत 130 धावांची भागीदारी केली. या दोघांनी गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. परागने तुफान फटकेबाजीने स्टेडियम दणाणून सोडले. रियानने 35 चेंडूंत अर्धशतक झळकावले. रियान गुजरातच्या गोलंदाजांना जुमानत नव्हता आणि त्याच्या फटकेबाजीने संजूसह शतकी भागीदारी पूर्ण केली. 19 व्या षटकात विजय शंकरने सीमारेषेवर सुरेख झेल घेऊन परागची विकेट मिळवली. परागने 48 चेंडूंत 3 चौकार व 5 षटकारांसह 76 धावा चोपल्या.
शिमरोन हेटमायरने (13 धावा) पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी सुरू केली. संजू 20 व्या षटकात जोरदार फटके खेचताना दिसला आणि त्याच्या खेळीमुळे राजस्थानने 3 बाद 196 धावा उभ्या केल्या. संजू 38 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 68 धावांवर नाबाद राहिला.
हेही वाचा :