

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटीपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून कर्णधार रोहित शर्माशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. लीसेस्टरशायरविरुद्ध आपण सर्वांनी पाहिले की रोहित शर्मा पहिल्या दिवशी फलंदाजीला आला, पण दुसऱ्या डावात तो दिसला नाही. अशा स्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सराव सामन्यात तो फलंदाजीसाठी का उतरला नाही हे स्पष्ट केले आहे. (Rohit Sharma Corona Positive)
रोहित शर्माला शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर रोहित शर्माला हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे समजते. (Rohit Sharma Corona Positive)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. जा सामना गेल्या वर्षी झालेल्या कसोटी मालिकेचा भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला पोहोचला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत टीम इंडियाने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातूनही ही कसोटी अत्यंत महत्त्वाची आहे. रोहितने चार कसोटी सामन्यांमध्ये ५३.२७ च्या सरासरीने ३६८ धावा केल्या आहेत. ओव्हल कसोटीत त्याने शतक झळकावले होते.
यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही कोरोनाची बाधा झाली होती. यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, आता तो बरा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात लंडनमध्ये पोहोचलेल्या विराट कोहलीलाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता तोही बरा आहे.