

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यावेळी कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्या बद्दल मोठी बातमी दिली. आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळताना एक मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळला होता. मात्र टीम इंडियामध्ये त्याची जागा ही अष्टपैलू खेळाडू म्हणून गणली जाते. त्यामुळे त्याच्या गोलंदाजी न करण्याने त्याच्या टीम इंडियातील स्थानाबद्दलही बरीच चर्चा झाली.
अखेर आज टी २० वर्ल्डकपच्या दुसऱ्या सराव सामन्यात रोहित शर्माने हार्दिक पांड्या कधी गोलंदाजी करणार याबाबत अपडेट दिली. रोहित शर्मा ज्यावेळी नाणेफेक करण्यासाठी मैदानात आला त्यावेळी त्याने पांड्याबद्दल मोठी अपडेट दिली.
तो म्हणाला की, 'आम्ही सहावा गोलंदाजीचा पर्याय आमच्याकडे असावा यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही फलंदाजीतही काही पर्यायांबाबत खातरजमा करत आहोत. आम्ही या सर्व गोष्टी आजच्या सामन्यात आजमावून पाहणार आहोत. हार्दिक पांड्या हा आमच्यासाठी चांगली कामगिरी करत आला आहे. पण, त्याने गोलंदाजी करुन बराच काळ लोटला आहे. त्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केलेली नाही. मात्र टी २० वर्ल्डकप सुरु होईल तोपर्यंत तो यासाठी तयार असेल.'
रोहितने संघात समतोल साधणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. संघाची फलंदाजी खोल असली पाहिजे आणि गोलंदाजीत सहावा पर्यायही असला पाहिजे असे त्याचे मत आहे. रोहित म्हणतो, 'आमच्याकडे उत्तम दर्जाचे मुख्य गोलंदाज आहेत. पण, आम्हाला सहाव्या गोलंदाजाचा पर्यायही हवा आहे.'
हेही वाचा :
आजच्या सामन्यात विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. ते इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी २० सराव सामन्यात खेळले होते. तो सामना भारताने जिंकला होता. इंग्लंडचे १८९ धावांचे आव्हान सहज पार केले. भारताकडून केएल राहुलने ५१ तर इशान किशनने ७० धावांची आक्रमक खेळी केली.
आजच्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली. आर अश्विनने डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर रविंद्र जडेजानेही फिंचला पायचीत करत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ षटकात ३ बाद १४ अशी केली होती.
भारताचा सुपर १२ मधला पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर २४ ऑक्टोबरला होणार आहे. भारत खेळत असेल्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि पात्रता फेरीत पात्र होणाऱ्या दोन संघांचा सामावेश आहे.