

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : बावडा (ता. इंदापूर) गावचे हद्दीत काकडेवस्ती येथे दरोडेखोरांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण करत लाखो रुपयाचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना गुरूवारी (दि. १५) पहाटेच्या सुमारास घडली. या संदर्भात अनिता अंकुश काकडे (वय ३५, रा. काकडेवस्ती बावडा, ता. इंदापुर) यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंदापूर पोलीसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेत मणीमंगळसुत्र, गंठन, कानातील टाॅप्स, ठुशी, कानातील सोन्याचा रिंगा, फुले, चांदीचे पैजन, नाकातील सोन्याची मुरणी असा एकूण १ लाख ११ हजार ७०० रुपयाचा ऐवज घेऊन दरोडेखोरांनी धूम ठोकली.
याबाबत माहिती अशी की, गुरुवारी (दि.१५) पहाटेच्या सुमारास अनिता काकडे यांना घराची खिडकी वाजल्याचा आवाज आला. नंतर
दरवाजाला कोणीतरी जोराचा धक्का दिल्याने आतली कडी तुटली व दरवाजा उघडला गेला. त्यावेळी चार अनोळखी इसम घरामध्ये शिरले. अनिता यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता एका इसमाने अनिता काकडे यांच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावुन घेतले व त्यांना हाताने मारहाण केली. तर एक इसमाने कपाटातील दागिने काढुन घेतले.
बाहेर थांबलेल्या दोन अनोळखी इसमांनी अनिता काकडे यांच्या पतीला मारहाण केली. या दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवुन अनिता काकडे यांच्या कानातील फुले व त्यांच्या मुलीच्या कानातील रिंगा काढून घेतल्या. तुम्ही कोणाला सांगितल्यास अथवा आरडाओरडा केल्यास तुम्हाला सर्वांना जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर काकडे कुटुंबातील चौघांना घरामध्ये कोंडून बाहेरून कडी लाऊन दरोडेखोर फरार झाले.
दरम्यान ही घटना समजताच बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, प्रकाश पवार आदींसह अंगुली मुद्रा पथक आणि पुणे ग्रामीणच्या श्वान पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या गुन्हाचा तपास पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या कामी तीन तपास पथके रवाना केली आहेत.