

निमोणे, पुढारी वृत्तसेवा: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची धुरा पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणाऱ्या ऋषिराज अशोक पवार यांच्या खांद्यावर पडली आहे. ऋषिराज यांची आज कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सामाजिक समतोल साधत कारखान्याच्या इतिहासात प्रथमच पोपट भुजबळ यांच्या रुपाने माळी समाजाला उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अशोक पवार यांनी एकाकी झुंज देत 20-1 च्या फरकाने सत्ता राखली. त्यानंतर अध्यक्ष आमदार अशोक पवार होणार, पण उपाध्यक्षपदी कोण एवढीच काय ती चर्चा झडत होती; मात्र ऋषिराज पवार या तरुण नेतृत्वाला संधी देण्यात आली.
ऋषिराज पवार उच्चशिक्षित युवा नेतृत्व आहे. बीई, एमबीए व बी.टेक असे त्यांचे शिक्षण झाले आहे. शालेय शिक्षण पुणे, मुंबई व उच्च शिक्षण मुंबई येथील नामांकित शिक्षण संस्थेत झाले आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून सहकार व साखर कारखानदारी यातील बारकावे व साखर धंद्यातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ऋषिराज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.
ऋषिराज यांचे नेतृत्व पुढील काळात घोडगंगेच्या सत्ताकारणात पाहायला मिळेल याचे संकेत प्रचार सभांमधील त्यांचा वावर, दस्तुरखुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी कानगोष्टी करून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे यांनी ऋषिराज पवार यांच्या वक्तृत्व शैलीचे केलेले कौतुक आणि तोच धागा पकडून भर सभेत अजित पवार यांनी माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवावे लागत नाही हे मांडलेले मत निवडणुकीनंतर ऋषिराज यांच्या उज्ज्वल राजकीय भवितव्याचेच संकेत देत होते.
घोडगंगाचे संस्थापक रावसाहेबदादा पवार यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव आमदार अशोक पवार यांनी मागील साधारणत: २२ ते २३ वर्षे घोडगंगेची एकहाती धुरा सांभाळली आणि विद्यमान संचालक मंडळाच्या निवडणुकीत 'ब' वर्ग मतदारसंघातून ऋषिराज यांची कारखान्याच्या सत्ताकारणात बिनविरोध निवड झाली.
रावसाहेबदादा पवार यांनी अतिशय जिद्दीने घोडगंगा कारखान्याची उभारणी केली. शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत क्रांतिकारी घटना होती. घोडगंगेच्या उभारणीपर्यंत मिळेल त्या दराने शेतकऱ्यांना आपला ऊस इतर कारखान्यात घालावा लागत असे. ऊस घातल्यावर पैसे मिळण्याचा भरवसा नसायचा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था होती. ते ओळखून रावसाहेबदादांनी घोडगंगाची उभारणी केली. त्यानंतरच्या काळात आमदार अशोक पवार यांनी कारखान्याचे संवर्धन करताना विस्तार, को- जनरेशन, डिस्टलरी असे प्रकल्प उभारत शेतकरी हित साधले. आता याच परंपरेतील ऋषिराज यांच्याकडे कारखान्याचे नेतृत्व आले आहे.
एक दिवस कारखान्याची धुरा ऋषिराज यांच्याच हाती असेल हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरजच नव्हती; आमदार अशोक पवार यांनी ऋषिराज यांच्या हाती कारखान्याची धुरा देण्याबरोबरच मांडवगण किंवा इनामगाव गटातील उपाध्यक्ष होईल, ही अटकळ फोल ठरवत थेट तळेगाव गटातील माळी समाजाचे वजनदार नेते पोपट भुजबळ यांची उपाध्यक्षपदी निवड केली.