

भारताने प्रदूषणमुक्त असणार्या पर्यायी इंधन आणि ऊर्जेच्या क्षेत्रात हळूहळू पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सौरऊर्जा, बायोडिझेल, पवनऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने याबरोबरच हरित हायड्रोजन क्षेत्रातही आपल्याकडे नवनवीन प्रयोग केले जात आहेत. जीवाश्म इंधनांचा (पेट्रोल-डिझेल) कार्बनिक धोका आणि उपलब्धतेबाबतच्या मर्यादा पाहता जगभरात सर्व प्रमुख देशांत आता पर्यायी ऊर्जा आणि इंधनांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
भारताने हरित हायड्रोजनवर चालणार्या पहिल्या बसचे नुकतेच अनावरण केले. सरकारी आणि खासगी कंपनीच्या मदतीने सरकार हरित हायड्रोजनच्या उत्पादनात आघाडी घेत असल्याचे पाहून आगामी काळात आपला देश या क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, पश्चिम देशांचा भारतातील ग्रीन हायड्रोजनच्या प्रयत्नांकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन नकारात्मक आणि भेदभावपूर्ण आहे. असा कटू अनुभव असतानाही भारत या क्षेत्रात वेगाने वाटचाल करत आहे. हरित हायड्रोजनला भविष्यातील इंधन मानले जात आहे. त्यामुळे त्यात अनेक देश मोठी गुंतवणूक करत आहेत.
देशातील दिग्गज पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) हरित डायड्रोजन बस सादर केली आहे. त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे ही बस केवळ पाण्याचे उत्सर्जन करते. 'आयओसी' शाश्वत स्रोतांपासून विजेचा वापर करत पाण्याच्या कणांना वेगळे करत 75 किलोग्रॅम हायड्रोजनचे उत्पादन करेल. हे हायड्रोजन प्रायोगिक तत्त्वावर राष्ट्रीय राजधानीत चालणार्या दोन बसमध्ये वापरले जाईल. या दोन बस तीन लाख किलोमीटरपेक्षा अधिक अंतर कापतील. हरित हायड्रोजन हे भारतात जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यात एक महत्त्वाचे इंधन म्हणून भूमिका बजावेल.
हरित हायड्रोजनच्या 30 किलो ग्रॅम क्षमतेच्या चार सिलिंडरची असणारी बस 350 किलोमीटरपर्यंत धावेल. एक सिलिंडर भरण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो. इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर केल्याने केवळ पाण्याची वाफ बाहेर पडेल. यात हानिकारक उत्सर्जक तत्त्वांचा समावेश नसल्याने आणि ऊर्जा घनता तिप्पट होत असल्याने हायड्रोजन एक स्वच्छ आणि अधिक परिणामकारक पर्याय म्हणून समोर येत आहे. 2023 च्या शेवटपर्यंत इंडियन ऑईल हायड्रोजनवर धावणार्या बसची संख्या पंधरापर्यंत नेणार आहे. या बसेस दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशात निश्चित केलेल्या मार्गावर सोडण्यात येतील. भारताने हायड्रोजन आणि जैव इंधनसारख्या नवीन इंधनांचा वापर करत या माध्यमांतून कार्बन उर्त्सजन कमी करण्याच्या द़ृष्टीने पावले टाकली आहेत.
पुढील दोन दशकांत जागतिक स्तरावर निर्माण होणार्या नवीन ऊर्जेच्या मागणीत हायड्रोजनसारख्या पर्यायाचा वाटा हा 25 टक्क्यांपर्यंत असेल. 2050 पर्यंत हायड्रोजनची जागतिक मागणी सात पटीने वाढून ती 800 टनांपर्यंत पोहोचू शकते. खासगी आणि सार्वजनिक परिवहनात हरित हायड्रोजन क्रांतिकारी भूमिका वठवू शकतो. हरित हायड्रोजन पेट्रोलियम रिफाइनिंग, फर्टिलायजर प्रॉडक्शन आणि स्टील मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जीवाश्म इंधनाची जागा घेऊ शकतो.
हरित हायड्रोजन हे ऊर्जा तयार करण्यासाठी पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करते. आयओसीने दिल्ली, हरियाणा आणि यूपीतील निवडक मार्गांवर पंधरा बसेसची चाचणी करण्यासाठी शास्त्रीय आराखडा आखण्यास सुरुवात केली आहे. भारत मानक ब्यूरोने बायो फ्यूअलसाठी नऊ मानके (निकष) निश्चित केली आहेत. ते पॅराफिनिक (हरित) डिझेलसाठी मानक विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहेत. अमेरिका, ब्राझील, भारत हे बायोफ्युएलचे प्रमुख उत्पादक आणि ग्राहक आहेत. जी-20 बैठकीत या तिन्ही देशांनी जैवइंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. हे सर्व प्रयत्न देशात पर्यायी हरित ऊर्जा उत्पादन करण्यास प्रोत्साहित करणारे आहेत.
रंगनाथ कोकणे, पर्यावरण अभ्यासक