

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साह शिगेला पोहोचलेला असताना 31 डिसेंबरच्या रात्री पासून 1 जानेवारीच्या पहाटे पाच वाजेपर्यंत शहरातील रेस्टॉरंट व बार खुले असणार आहे. याला शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांचं येणारं नवं वर्ष धुमधड्याक्यात साजरे होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात रेस्टॉरंट व बार पहाटे पाच वाजेपर्यंत तर वाईन, बिअर आणि देशी मद्य विक्रीची दुकाने रात्री साडेदहा ऐवजी रात्री एक वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरासह देहातील आणि राज्यातील लोकं सज्ज झाले आहेत. कोरोनामुळे गेले दोन वर्ष 31 डिसेंबरला कडक निर्बंध घालण्यात आले होते. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त आणि बिनधास्त नवीन वर्षाचं स्वागत करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. अशाच उत्साहात यंदाही नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक आतूर आहेत.
नववर्षाचे स्वागत होणार पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र 31 डिसेंबरला पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने राज्य शासनाच्या निर्णयाची योग्यरित्या अंमलबजावणी केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.