

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे प्रमुख जीतन राम मांझी यांचे पुत्र डॉ. संतोष कुमार सुमन यांनी बिहारमधील महाआघाडी सरकारच्या मंत्रीपदाचा आज (दि.१३) राजीनामा दिला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 23 जूनरोजी पाटणा येथे 18 विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. हिंदुस्थानी अवाम मोर्चा (एचएएम) मंत्र्याने बैठकीच्या 10 दिवस आधी आज बिहारच्या महाआघाडी सरकारचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांना पहिला धक्का लागल्याचे मानले जात आहे.
एचएएमचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे पुत्र डॉ. संतोष सुमन यांनी नितीश कुमार यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. डॉ. संतोष अनुसूचित जाती-जमाती कल्याण मंत्री आहेत. बिहारमध्ये त्यांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत.
राजीनामा दिल्यानंतर संतोष सुमन म्हणाले- नितीश कुमार आमचे अस्तित्व संपवू इच्छितात. त्यांना आमचा पक्ष HAM त्यांच्या पक्ष जनता दल युनायटेड (JDU) मध्ये विलीन करायचा आहे. पक्ष वाचवण्यासाठी राजीनाम्याचा पर्याय निवडला आहे. आता आम्ही महाआघाडीपासून नव्हे, तर सरकारपासून वेगळे झालो आहोत. महाआघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय लालूप्रसाद आणि नितीशकुमार घेतील. दरम्यान, मांझी एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा