

वॉशिंग्टन : वयाची शंभरी गाठणार्या किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षे जगणार्या लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य उलगडण्यात संशोधकांना आता यश आले आहे. अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठ आणि टफ्टस् मेडिकल सेंटरच्या संशोधकांनी त्यासाठी शंभर ते 119 वर्षे वयाच्या सात पुरुष आणि महिलांच्या डीएनएचा अभ्यास केला. त्यांना आढळले की अशा लोकांच्या रोगप्रतिकारक पेशींची एक अनोखी संरचना असते जी त्यांना मजबूत रोगप्रतिकारक क्षमता प्रदान करते. आजारांमधून बरे होण्याची तसेच दीर्घायुष्य जगण्याची संधी याच संरचनेमुळे त्यांना मिळत असते. केवळ संक्रमणाशीच लढणे महत्त्वाचे आहे की दीर्घायुष्य जगणार्यांची रोगप्रतिकारकता अनुवांशिक रूपानेही मजबूत असते याबाबतही आता संशोधन सुरू आहे.
संशोधकांनी उत्तर अमेरिकेतील शतायु किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या वृद्ध लोकांच्या पेरीफेलर ब्लड मोनोन्यूक्लियर पेशींचे अध्ययन केले. ही रक्तामधील रोगप्रतिकारक पेशींची एक विस्तृत श्रेणी आहे. विश्लेषणानंतर त्यांनी दीर्घायुष्यासाठी रोगप्रतिकारक यंत्रणेच्या विशिष्ट पॅटर्नची ओळख केली. सामान्य रोगप्रतिकारक शक्ती असलेले लोक संक्रमणाच्या संपर्कात येतात, त्यामधून बरे होतात आणि भविष्यात संक्रमणांशी लढण्याबाबत अनुकूल होणे शिकतात.
वय वाढत जाईल तसे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत जाते. मात्र, शतायुषी किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये ही प्रतिकारक क्षमता अधिक मजबूत आणि वेगळी असते. त्यामुळेच अशा लोकांनी जुन्या काळातील स्पॅनिश फ्लूचा तसेच सध्याच्या कोरोना महामारीचाही सामना केला. संशोधकांच्या टीमने अशा 25 विशिष्ट जनुकांची ओळख केली जी दीर्घायुषी लोकांमध्ये अधिक सक्रिय होती. ही जनुके दीर्घायुष्यासाठी अनुवंशिक पॅटर्नचा खुलासा करतात. त्यामध्ये 'एसटीके 17 ए' जनुकाचा अधिक उपयोग होतो जे क्षतिग्रस्त डीएनएची डागडुजी करण्यासाठी ओळखले जाते. अन्य एक जनुक 'एचएलए-डीपीए 1' हे शरीरातील काही संक्रमणांसाठी आवश्यक अँटिजेन बनवते. 'एस 100 ए 4' हे जनुकही दीर्घायुषी लोकांमध्ये आढळले.